December 26, 2024

खंडणीखोर वाल्मिक कराडमुळे मुंडे भाऊ-बहिण अडचणीत

बीड जिल्ह्यातील मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. या प्रकरणातील चार संशयित आरोपींना आतापर्यंत पोलिसांनी अटक केलीय. पण त्यांचा सूत्रधार अजूनही मोकाटच असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करुन त्यांना तातडीने अटक करा, अशी मागणी सर्वपक्षीय आमदारांनी विधानसभेत लावून धरलीय. त्यामुळे धनंजय मुंडेही चांगलेच अडचणीत आले आहेत. विशेषत: भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरले आहे. कोण आहे हे वाल्मिक कराड? धनंजय मुंडेंशी त्यांचा खरंच संबंध आहे का? या हत्येच्या मुद्द्यावरुन महायुतीत तणाव निर्माण झालाय का? जाणून घेऊ या… मिशन पॉलिटिक्समधून

संतोष देशमुखांचे अपहरण आणि मृतदेह…

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करुन हत्या करण्यात आली. अतिशय क्रूरपणे शरीरावर वार करुन, डोळ्यांना लायटरचे चटके देऊन अमानुषपणे त्यांचा खून करण्यात अाला. याचे कारण म्हणजे केज तालुक्यात अावादा एनर्जी कंपनीतर्फे पवनउर्जा निर्मितीचा प्रकल्प टाकला जात अाहे. या कंपनीकडे काही लोकांनी फोनवरुन २ कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली होती. हा फोन वाल्मिक कराड यांनी केल्याचा आरेाप केला जातोय. यापैकी काही रक्कम कंपनीच्या वतीने देण्यातही आले. पण उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी सुदर्शन घुले, विष्णू चाटे व अन्य काही लोक २९ नोव्हेंबर रोजी त्यांच्या कार्यालयात आले. त्यांनी कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्याकडे पैशाची मागणी केली. शिंदे यांनी पैसे देण्यास हतबलता व्यक्त केल्यानंतर या आरेापींना त्यांना हातपाय तोडण्याची धमकी दिली. तसेच तेथील सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. या प्रकारामुळे घाबरलेल्या सुरक्षा रक्षकाने मदतीसाठी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना बोलावून घेतले. त्यांनी आरेापींना तेथून पिटाळून लावले. दरम्यानच्या काळात ९ डिसेंबर रोजी देशमुख यांचे कारमधून अपहरण करण्यात आले व काही तासांनी त्यांचा मृतदेह सापडला.

वाल्मिक कराडांवर खंडणीचा गुन्हा…

आता याच आरेापींनी त्यांना जिवे मारल्याचा पोलिसांना संशय आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या अधिकाऱ्याला दोन कोटीची खंडणी मागणारे वाल्मिक कराड व विष्णू चाटे यांचाही या हत्याप्रकरणात सहभाग असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. दरम्यान, देशमुख यांच्या हत्येनंतर दोन दिवसांनी पोलिसांनी वाल्मिक कराडवर २ कोटी खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तेव्हापासून कराड फरार आहे. विरोधी पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड यांनी हे प्रकरण विधानसभेत लावून धरले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेेते अंबादास दानवे, रोहित पवार यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी मस्साजोगला जाऊन देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांच्या तोंडून थरारक हत्येचे वास्तव जाणून घेतले. आता विधानभेत हा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा मंत्री धनंजय मुंडे यांचा वरदहस्त असल्यामुळेच वाल्मिक कराड असे अनेक गुन्हे करत असल्याचा आरोप करण्यात आला. इतकेच नव्हे तर मुंडेंच्या राजकीय दबावामुळेच त्याला अद्याप अटक केली जात नसल्याचा आरोपही झाला.

वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे संबंध कसे?

विशेष म्हणजे, मुंडेंच्या शिफारशीवरुन वाल्मिक कराड याला याआधी पोलिस संरक्षणही दिले होते. दोन कॉन्स्टेबल घेऊन तो फिरत होता. पण आता खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हे संरक्षण काढून घेतले आहे. एकूणच वाल्मिक कराड याच्याविरोधात राज्यभर संताप व्यक्त केला जात असताना पोलिस यंत्रणा व प्रशासन मात्र त्याला अभय देत असल्याचा आरोप होत आहे. पण वाल्मिक कराड आहे तरी कोण? हा प्रश्न सर्वांना पडला अाहे. परळीचे माजी नगराध्यक्ष असलेले कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. गेल्या १० वर्षांपूर्वी धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडून जेव्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हापासून त्यांची परळीतील सर्व कामे कराड हेच सांभाळतात. धनंजय परळीत असतात तेव्हा त्यांच्यासोबत सावलीसारखे उभे असतात. सत्तेचा वापर करुन अनेक ठिकाणी दमदाटी केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. परळीत धनंजय मुंडे यांची किंवा त्यांच्या समर्थकांची जी काही गुत्तेदारीची कामे सुरु असतात त्यावर कराड यांची ‘नजर’ असते. त्यांची दहशत इतकी आहे की पीडित त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार करायला धजावत नसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. यापूर्वी त्यांच्यावर काही गुन्हेही दाखल आहेत. तरीही त्यांना पोलिसांनी संरक्षण कसे दिले? हा प्रश्न आहे.

धनंजय मुंडेंची विधानसभेत कोंडी…

आता खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जेव्हा कराड यांचे नाव चर्चेत आले तेव्हा ते आपले निकटवर्तीय असल्याचे सांगण्यास धनंजय मुंडे क्षणभरही कचरले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी अाता कराडच्या गुंडगिरीमागे धनंजय मुंडे यांचा आधार असल्याचे आरोप केले आहेत. या मुद्द्यावरुन बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी धनंजय मुंडे यांनाही चांगलेच घेरले आहे. शरद पवार गटाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, आष्टी- पाटोद्याचे भाजपचे आमदार सुरेश धस, केजच्या भाजप आमदार नमिता मुंदडा, गेवराईचे अजित पवार गटाचेच आमदार विजयसिंह पंडित यांनी बीड जिल्ह्यातील वाढलेली गुंडगिरी संपवा, असे मुख्यमंत्र्यांना आवाहन करुन एकप्रकारे धनंजय मुंडे यांच्याविरोधात एल्गारच पुकारलेला दिसून येतो. आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आदी नेत्यांनीही या बीड जिल्ह्यातील आमदारांना विधानसभेत साथ देऊन मुंडेंची कोंडी केलीय.

अन् धनंजय मुंडेंना मिळाले मंत्रिपद…

या प्रकरणामुळे महायुतीतही दोन गट पडल्याचे दिसते. भाजपचेच आमदार धनंजय मुंडे व त्यांच्या समर्थकांच्या गुंडगिरीविरोधात महायुतीतील आमदारच आवाज उठवत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चांगलीच कोंडी झालीय. मंत्रिमंडळ विस्ताराआधीपासून हे प्रकरण गाजत असल्यामुळे या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार नाही, असा विरोधकांचा भ्रम होता. पण देशमुख खून प्रकरण असो की कराडचे खंडणी प्रकरण,.. याचा जराही विचार न करता मुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिपद दिले. त्यामुळे त्यांच्या गुंडगिरी करणाऱ्या समर्थकांमध्ये सत्तेची मग्रुरी अजूनच वाढलेली दिसून येते. विशेष म्हणजे आपल्या समर्थकाच्या आरोपवर धनंजय मुंडे काहीही बोलत नाहीत. ‘आजकाल मर्डर सर्वच जिल्हयात होतात, त्यासाठी बीडला बदनाम का करता?’ असा त्यांचा प्रश्न आहे.

पंकजा मुंडे गप्पच…

या प्रकरणात मंत्री पंकजा मुंडे यांची मात्र चांगलीच गोची झालीय. वाल्मिक कराड काय आहे हे पंकजा यांना चांगलेच माहिती आहे. आता मुंडे बहिण- भाऊ एकत्र आल्यामुळे त्यांना याविषयी काहीच बोलता येत नाहीए. एकीकडे त्यांच्याच भाजप पक्षाचे आमदार वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांच्याविरोधात आवाज उठवत असताना पंकजा मुंडे मात्र मूग गिळून गप्प आहेत. एकीकडे आपल्या पक्षाचे आमदार तर दुसरीकडे भाऊ धनंजय मुंडे हे वेगवेगळ्या बाजूने उभे आहेत. मग साथ द्यावी कुणाला? हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. त्यामुळे त्या या विषयावर फारसे बोलत नाहीत. दिली तरी सावध प्रतिक्रिया देताना दिसतात. पण एक जबाबदार मंत्री म्हणून त्यांनी यावर भूमिका घ्यायला हवी, असे जनतेचे म्हणणे आहे. एकूणच, वाल्मिक कराडचे खंडणी प्रकरण व देशमुख खून प्रकरण धनंजय मुंडे यांना मात्र चांगलेच शेकणार असल्याची चिन्हे आहेत. खरोखरच जनतेचे सरकार असल्याची जाणीव असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने या प्रकरणात आरोपी कराडला अटक करायला हवी. त्याला पाठिंबा देणाऱ्या धनंजय मुंडे यांनाही मंत्रिमंडळातून बाजूला करायला हवे. अन्यथा गुंडगिरी करणाऱ्यांना हे सरकारही अभय देतेय, असाच संदेश लोकांमध्ये जाईल. त्यांची किंमत आज ना उद्या या सरकारलाही मोजायला लागू शकते.