मुंडेंचे मंत्रिपद काढण्याची धमक फडणवीसांत आहे का?

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात आता मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव येत आहे. केवळ विरोधी पक्षाच्याच नव्हे तर आता सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादीच्या आमदारांनीही प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे विधिमंडळात तसा उंगलीनिर्देश केला आहे. या घटनेची एसआयटीमार्फत व न्यायालयीन चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत खरे, पण वाल्मिक कराड यांना पाठीशी घालणारे धनंजय मुंडे यांचे मंत्री जोपर्यंत सरकारमध्ये असतील तोपर्यंत त्यांच्यामार्फत होणारी चौकशी निष्पक्षपणे होईल का? याविषयी शंका आहे. म्हणूनच चौकशी होईपर्यंत तरी धनंजय मुंडे यांना सरकारमधून बाहेर काढा, त्यांचे मंत्रिपद काढून घ्या अशी मागणी बीड जिल्ह्यातील आमदार, जनता व पीडित कुटुंबीयांकडून होत आहे. हे जनतेचे सरकार असल्याचा दावा करणारे फडणवीस धनंजय मुंडेंचे मंत्रिपद काढण्याचे धाडस दाखवू शकतात का? हा खरा प्रश्न आहे. याबाबत जाणून घेऊ या.. मिशन पॉलिटिक्समधून

प्रमुख संशयित वाल्मिक कराड अजूनही फरार…

बीड जिल्ह्यात आवाद कंपनीतर्फे पवनचक्की प्रकल्प उभारला जात आहे. त्या कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरुन वाल्मिक कराड यांच्यासह अन्य काही लोकांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. याच कंपनीच्या लोकांना मारहाण करणाऱ्यांमध्ये या खंडणीखोरांपैकी काहींचा समावेश आहे. त्यांना वाचवण्यासाठी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आले होेत. ६ डिसेंबरला हा मारहाणीचा प्रकार झाला, तर ९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची अपहरण करुन निर्घृण हत्या करण्यात आली. त्यामुळे या हत्येमागे खंडणीखोरच असल्याचा पोलिसांना व जनतेला संशय आहे. यातील चार आरेापींना पोलिसांनी अटकही केली अाहे. पण त्यातील प्रमुख संशयित असलेले वाल्मिक कराड हे अजून फरारच आहेत. त्यांचा खंडणी प्रकरणात सहभाग असल्याचा गुन्हा दाखल झालाय, पण खून प्रकरणात सहभाग आहे का? हे अजून सिद्ध व्हायचंय…

धनंजय मुंडेंचे मंत्रिपद काढून घेण्याची मागणी…

पण वाल्मिक कराड यांच्या आदेशावरुनच संतोष देशमुख यांच्या हत्या करण्यात आल्याचा आरोप बीड जिल्ह्यातील आमदार संदीप क्षीरसागर हे करत आहेत. तर आष्टीचे आमदार सुरेश धस, गेवराईचे अामदार विजयसिंह पंडित, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनीही या हत्याकांडाचा प्रश्न उपस्थित करुन दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. एकीकडे सर्व लोकप्रतिनिधी आक्रमक झालेले असताना मंत्री धनंजय मुंडे हे मात्र वाल्मिक कराड हे आपले निकटवर्तीय असल्याचे अभिमानने सांगत फिरत अाहेत. याचा जनतेत मोठ्या प्रमाणावर राग आहे. २१ डिसेंबर रोजी स्वत: शरद पवार यांनी मस्साजोगमध्ये जाऊन मयत देशमुख यांच्या कुटुंबीयांचे भेट घेतील. मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या भावना समजावून घेतल्या. देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारीही स्वीकारली. तेथील ग्रामस्थांनी बीड जिल्ह्यातील वाढत्या गुंडगिरीबद्दल चिंता व्यक्त करताना वाल्मिक कराडवर तातडीने कारवाई करा, तसेच धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढून घ्या अशी मागणी केली. जोपर्यंत मुंडेंचे मंत्रिपद काढले जात नाही तोपर्यंत देशमुखांच्या हत्येची निष्पक्षपणे चौकशी होणार नाही, असे गावकऱ्यांचे मत आहे. कारण आताही वाल्मिक कराड व इतर आरोपींवर कारवाई करतान पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचे जाणवत आहे. हा दबाव धनंजय मुंडे टाकत असल्याचेही लोक व पोलिसही खासगीत बोलताना सांगतात.

अजित दादा धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरुन काढणार का?

धनंजय मुंडे हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. केवळ आमदारांच्या आरोपावरुन अजित पवार धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढणार नाहीत. मस्साजोगमध्ये शरद पवार येणार असल्याचे आधीच कळाल्यामुळे अजित पवारांनीही २१ डिसेंबर रोजी सकाळी शरद पवारांच्या आधी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत आपण शांत बसणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. पण तेथील गावकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची किंवा त्यांच्या भावना एेकून घेण्याचे धाडस अजित पवार दाखवू शकले नाहीत. कारण प्रत्येकाच्या तोंडी धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांच्या गुंडगिरीच्या तक्रारी होत्या. त्या एेकल्या असत्या तर अजित पवारांना मान खाली घालावी लागली असती. म्हणूनच तर या गावात अजित पवारांनी धनंजय मुंडेंचे नावही घेतले नाही. गावातून निघून जात असताना गावकऱ्यांनी अजित पवारांच्या कारला अक्षरश: घेराव घातला हेाता. ‘दादा आमचं म्हणणं एेका, धनंजय मुंडेला मंत्रिपदावरुन काढा’ अशी विनंती गावकरी करत होते. पण त्याकडे दुर्लक्ष करुन अजितदादा निघून गेले.

अंबादास दानवेंचा गंभीर आरोप…

संतोष देशमुख खून प्रकरणात धनंजय मुंडे यांचे पाय खाेलात जात आहेत. त्यामुळे केवळ मुंडेंचीच नव्हे तर फडणवीस सरकारचीही बदनामी होत आहे. या हत्याप्रकरणात अटक केलेले काही आरेापी ओबीसी समाजातील आहेत. तर मृत देशमुख हे मराठा समाजातील आहेत. त्यामुळे या प्रकरणाला मराठा विरुद्ध ओबीसी असा रंग देण्याचाही प्रयत्न काही राजकारणी करत आहेत. पण जातीय राजकारणापेक्षा संतोष देशमुख यांची ज्या निर्घृण पद्धतीने, अमानवी हत्या करण्यात आली त्याचा सोक्षमोक्ष लागणे गरजेचे आहे. त्यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षांनी विधिमंडळात आवाज उठवला. वाल्मिक कराड नागपुरातच लपून बसला आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. बीड जिल्ह्यातील जनतेतही आरेापींविरोधात प्रचंड राग आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी व न्यायालयीन अशी दुहेरी चौकशी करण्याचे आश्वासन विधानसभेत दिले आहे.

देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार?

जोपर्यंत वाल्मिक कराडसारख्या संशयित आरोपींना पाठीशी घालणारे धनंजय मुंडे यांच्यासारखे मंत्री सरकारमध्ये आहेत तोपर्यंत सरकारच्या निष्पक्षपाती चौकशीवर जनतेचा व पीडित कुटुंबीयांचा विश्वास राहिल कसा? त्यामुळे खरे तर नैतिक जबाबदारी स्वीकारुन धनंजय मुंडे यांनी चौकशी होईपर्यंत तरी मंत्रिपदापासून दूर राहण्याची गरज आहे. नेत्यांमध्ये पद सोडण्याची नैतिकता असेल, याविषयी शंकाच आहे. पण अशा वेळी पारदर्शी व जनतेचे सरकार असल्याचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या राज्याच्या प्रमुखांनी तरी कुठलाही मुलाहिजा न बाळगता धनंजय मुंडे यांच्यासारख्या मंत्र्याला सत्तेबाहेर ठेवणे आवश्यक आहे, तरच या सरकारची प्रतिमा स्वच्छ राहिल. अन्यथा देशमुखांच्या खूनात ज्या अारोपींचे हात रक्ताने माखलेले आहेत त्यांना फडणवीसांचे हे सरकार अभय देतंय, अशी भावना जनतेत निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. २०१४ मध्ये एका जमीन घोटाळ्यात नाव आल्यामुळे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे मंत्रिपद घेणाारे देवेंद्र फडणवीस हे खंडणी व हत्यप्रकरणातील संशयित आरोपीची पाठराखण करणाऱ्या धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरुन पायउतार करण्याचे धाडस दाखवतात का?, याकडे बीड जिल्ह्यातील जनतेेचे लक्ष लागले आहे.