December 26, 2024

कोल्हापूर : राजघराण्याची माघार आता बंडखोरावरच काँग्रेसची मदार

लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीने सर्वसंमतीने शाहू महाराज छत्रपती यांना कोल्हापुरातून उमेदवारी दिली. खरं तर ही जागा उद्धव सेनेची. पण लढेल तर काँग्रेसकडूनच असा शाहू महाराजांचा आग्रह असल्याने उद्धव सेनेने तो मान्य केला. छत्रपती राजघराण्याचे वलय असल्याने शाहू महाराज विजयी झाले. त्यांच्या रुपाने महाविकास आघाडीला यश मिळाले. आता विधानसभेतही राजघराण्याला उमेदवारी देऊन यश मिळवण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला खरा. पण याच राजघराण्याने एेनवेळी माघार घेऊन काँग्रेसला तोंडघशी पाडले आहे. काय आहे या मागचे राजकारण… जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून..

महायुतीला टक्कर देण्यासाठी राजघराण्याचा उमेदवार…

उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात काँग्रेसने आधी राजेश लाटकर या कार्यकर्त्याला संधी दिली होती. उमेदवारांच्या यादीत त्यांचे नावही जाहीर झाले. मात्र महायुतीला टक्कर द्यायची असेल तर राजघराण्यातील उमेदवारच पाहिजे, असा सूर काँग्रेसमधून उमटला. त्यामुळे दुसऱ्या यादीत लाटकर यांची उमेदवारी रद्द करुन मालोजीराव छत्रपती यांच्या पत्नी मधुरिमाराजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. लोकसभेत शाहू महाराजांना खासदारकी मिळाल्याने आता त्यांच्या प्रभावमुळे आमदारकीही काँग्रेस पक्षच जिंकेल, असा पक्षाचा आत्मविश्वास होता. मात्र राजघराण्यात या उमेदवारीवरुन बरेच वाद निर्माण झाले.

अन् कोल्हापूरात घडले राजकीय नाट्य…

काही जणांच्या मते, आपल्या घरात एक खासदारकी असताना दुसरे पद कशाला घ्यायचे? असा प्रश्न उपस्थित करुन शाहू महाराजांनी आपल्या सुनेच्याच उमेदवारीला विरोध केला होता. मात्र तरीही मालोजीराजेंनी पत्नी मधुरिमा राजे यांच्यासाठी उमेदवारी स्वीकारलीच. इकडे एेनवेळी आपले नाव कापल्यामुळे नाराज झालेल्या राजेश लाटकर यांनी अपक्ष अर्ज भरुन बंडखोरी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांना हा उमेदवार बदल फारसा रुचलेला नव्हता. मात्र पक्षादेश मानून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. राजेश लाटकर यांनी माघार घ्यावी, यासाठीही खूप प्रयत्न झाले. पण लाटकर उमेदवारीवर ठाम राहिले. मात्र उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी कोल्हापूरात एक नाट्य घडले. छत्रपती शाहू महाराज आपल्या सुनबाई मधुरिमा राजे व मुलगा मालोजीराजे यांच्यासह निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयात आले व त्यांनी कुणालाही काहीही कल्पना न देता थेट उमेदवारीच मागे घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीकडे आता अधिकृत उमेदवारच राहिलेला नाही. हा प्रकार कळताच सतेज पाटील खूपच भडकले. त्यांनी थेट निवडणूक अधिकाऱ्याच्या कक्षातच छत्रपती शाहू महाराजांसमोर आपला संताप व्यक्त केला.

कोल्हापूरकर काँग्रेसच्या अपक्ष उमेदवाराला साथ देणार?

‘जर लढण्याचा दमच नव्हता तर उमेदवारी घेतली कशाला? हा माझा विश्वासघात आहे,’ अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला. तेव्हा शाहू महाराजांना गप्प बसून राहणे पसंत केले. मधुरिमाराजेंना नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला, एवढेच त्यांनी पत्रकारांना सांगितले. मालोजीराजेंनी आपण बोलण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे सांगून काढता पाय घेतला. इकडे राजेश लाटकर यांच्यावर अर्ज मागे घेण्यासाठी दोन दिवसांपासूनच काँग्रेस नेत्यांचा दबाव होता. त्यामुळे अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी ते फोन बंद करुन अज्ञातवासात गेले होते. मधुरिमाराजे यांनी माघार घेतल्यानंतर आता काँग्रेसकडे बंडखोर राजेश लाटकर यांनाच अधिकृत उमेदवारीचा दर्जा देण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. मग काँग्रेस नेत्यांनी लाटकर यांना समोर आणून आता हेच आमचे उमेदवार असतील असे जाहीर केले. बंडखोरी कायम ठेवण्याचा निर्णय लाटकरांना फायदेशीर ठरला. आता ते बंडखोर राहिले नसून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार झाले आहेत. अर्थात त्यांना पक्षाने एबी फॉर्म दिलेला नसल्यामुळे उमेदवार काँग्रेसचे असले तरी त्यांना पक्षाचे ‘हाताचा पंजा’ हे चिन्ह काही मिळणार नाही. अपक्ष उमेदवार म्हणून जे चिन्ह मिळेल त्यावरच त्यांना लढावे लागेल. फक्त महाविकास आघाडीला लाटकर हेच आमचे अधिकृत उमेदवार आहेत हे सांगत फिरावे लागेल. काँग्रेसची ही माघार शिंदेसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या मात्र पथ्यावर पडली अाहे. आता लोकसभेला काँग्रेसला कौल देणारे कोल्हापूरकर आता काँग्रेसच्या अपक्ष उमेदवाराला कितपत साथ देतात ते २३ नाेव्हेंबरला कळेलच. पण या घडामोडीमुळे महायुतीत मात्र आनंदाचे वातावरण आहे.