महाराष्ट्राचे राजकारण घराणेशाहीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. खान्देशातील नंदूरबार जिल्ह्यातही अशाच एका गावित घराण्याचे वर्चस्व आहे. या आदिवासीबहुल जिल्ह्यात विधानसभेचे चारच मतदारसंघ आहेत. पण या चारही मतदारसंघात मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्याच घरातले उमेदवार वेगवेगळ्या पक्षाकडून लढत आहेत. म्हणजे सत्ता कुणाचीही आली तरी आपलच्या घरात कशी राहिल याची पुरेपूर काळजी गावित घराण्याने घेतलेली आहे. आता सहा प्रमुख पक्षांच्या स्पर्धेत व बंडखोरांच्या गर्दीत नंदूरबारकर गावित घराण्याला कसा कौल देतात याबाबत खान्देशला उत्सुकता आहे. आपण मिशन पॉलिटिक्समधून जाणून घेऊ या एकाच घराण्यातले कुठे कुठे आहेत हे गावितांचे उमेदवार..
आदिवासी बहुल जिल्ह्याच्या राजकारणात गावितांचा प्रभाव…
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील सर्व चारही विधानसभा मतदारसंघात भाजपचे नेते, विद्यमान कॅबिनेट मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या कुटुंबातील तब्बल चार उमेदवार वेगवेगळ्या चार मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. यात दोन जण भाजपचे तर दोघे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत. तर दोघे अपक्ष म्हणून लढत आहेत. गावित कुटुंबातील एकुण ९ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले हाेते. त्यापैकी पाच जणांची माघार घेतली तरी चौघे जण चार मतदारसंघात कायम आहेत. त्यामुळे या आदिवासी बहुल जिल्ह्याचे राजकारण गावित कुटुंबाभाेवती फिरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
उमेदवारीसाठी धरला पंजाचा हात…
नंदुरबार विधानसभा मतदारसंघात मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे भाजपचे उमेदवार आहेत. गावित हे पूर्वी राष्ट्रवादीत होते. २०१४ च्या दरम्यान त्यांनी भाजपात प्रवेश करुन सत्ता कायम राखली. ते पुन्हा नंदूरबारमधून लढत आहेत. शहादा-तळाेदा या मतदारसंघात काँग्रेसने डॉ. गावित यांचे बंधू राजेंद्रकुमार गावितांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारीसाठी राजेंद्र यांनी भाजपचा त्याग करुन ‘पंजा’चा हात धरलाय. मंत्री डॉ.गावितांचे दुसरे बंधू तथा माजी आमदार शरद गावित हे नवापूरमधून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. डाॅ.गावितांच्या कन्या तथा भाजपच्या माजी खासदार राहिलेल्या डाॅ.हिना गावित यांनी अक्कलकुवा मतदारसंघातून बंडखाेरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.
म्हणून चंद्रकांत रघुवंशींनी गावितांच्या विरुद्ध बंड पुकारले…
खरे तर भाजपने हिना यांना दोन वेळा खासदार केले. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र मित्रपक्ष शिंदेसेनेने आपले काम न केल्यामुळेच पराभवाचे तोंड पाहावे लागले, असा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे शिंदेसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याविरोधात हिना गावित यांनी बंड पुकारले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची अनेकदा समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण हिना गावित काही एेकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. त्यांनी थेट भाजपलाच रामराम करत बंड कायम ठेवले आहे. त्यामुळे आता पक्ष त्यांच्या वडिलांवर काही कारवाई करण्याचे धाडस दाखवतो का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे नंदूरबार जिल्ह्यातील ४ मतदारसंघात गावितांच्या घरातील तीन भाऊ व एक मुलगी नशिब आजमावत आहे. आता मतदार या घराण्याला पुन्हा कौल देतात की नव्या चेहऱ्यांना संधी देतात ते २३ नोव्हेंबरलाच कळेल.