December 26, 2024

जरांगेंचा गनीमी कावा, पुन्हा पाडापाडीच करणार

लोकसभा निवडणुकीत पाडापाडीचे राजकारण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत मात्र उमेदवार देण्याची घोषणा केली होती. त्याची तयारीही त्यांनी भरपूर केली. इच्छूक उमेदवारांचे अर्ज मागवले, मुलाखती घेतल्या. त्यांना अर्जही दाखल करायला सांगितले. मात्र अचानक अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी अापण निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर करुन आपल्या सर्व उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यास सांगितले. आता जरांगेंचे समर्थक लोकसभेप्रमाणेच पुन्हा पाडापाडीचे राजकारण करतील. पण मनेाज जरांगेंनी अचानक माघार का घेतली? की हा त्यांचा गनिमीकावा होता? जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून

निवडणूकीच्या मैदानात उतरण्याची जोरदार तयारी…

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या सव्वा ते दीड वर्षातील आपले सहावे आमरण उपोषण आंतरवली सराटी येथे केले होते. मात्र यावेळी सरकारने त्यांच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. जरांगेंची प्रकृती ढासळत होती. त्यामुळे गावकरी व मराठा बांधवांनी आग्रह करुन जरांगे यांना उपोषण मागे घ्यायला लावले. त्यावेळी जरांगेंनी आता उपोषण करुन चालणार नाही तर निवडणूक लढवून आपले सरकार आणावे लागेल, अशी घोषणा केली होती. त्याला समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मग जरांगेंनी निवडणूक लढवायची असे संकेत देत पुढील बैठका, रणनिती ठरवणे सुरु केले. सुमारे १५०० हून अधिक इच्छूकांनी त्यांच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दाखल केले. या सर्वांशी जरांगेंनी दोन- तीन टप्प्यात चर्चा केली. दसऱ्याला जरांगेंनी नारायण गडावर मोठा मेळावा घेतला. त्यातही त्यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. अर्थात जरांगे स्वत: निवडणूक लढवणार नव्हते तर त्यांच्या समर्थकांना मैदानात उतरवणार होते. आचारसंहिता लागतच त्यांनी सर्व इच्छूकांना अर्ज भरण्यास सांगितले. अर्ज माघारीच्या दिवशी मात्र प्रत्येक मतदारसंघात सर्वानुमते एकच नाव ठरवले जाईल, त्यांनीच अर्ज ठेवायचा बाकीच्यांनी माघार घ्यायची, असे ठरवण्यात आले होते.

माघार घेण्याचे हेच कारण..?

दरम्यानच्या काळात राज्यातील अनेक मतदारसंघातील प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार व अपक्ष उमेदवारांची जरांगेंना भेटण्यासाठी अक्षरश: रिघ लागली होती. जरांगेंनी आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी त्यांची अपेक्षा होती. कारण जरांगेंची ताकद काय आहे हे सर्वांनी लोकसभेत अनुभवले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठा बांधवांनी महायुतीचे २३ हून अधिक उमेदवार पाडले होते. त्यामुळे विधानसभेला त्यांचे समर्थक आपल्याला मिळावे यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांची धडपड होती. पण जरांगे स्वत:चे उमेदवार देण्यावर ठाम होते. पण एका जातीच्या ताकदीवर निवडणूक जिंकणे सोपे नाही, हे जरांगे वारंवार सांगायचे. म्हणूनच गेल्या आठवड्यात दिवाळीपूर्वी त्यांनी मुस्लिम धर्मगुरू सय्यद सोमाणी, आंबेडकरी चळवळीचे नेते आनंदराज आंबेडकर, राजरत्न आंबेडकर यांच्याशी चर्चा करुन मराठा, मुस्लिम व दलित समाजाची ताकद एकत्र करुन उमेदवार देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ४ नोव्हेंबरपर्यंत म्हणजे अर्ज माघारीच्या दिवशीपर्यंत मुस्लिम व दलित उमेदवारांची यादी वरील नेत्यांकडून जरांगेंना मिळणे अपेक्षित होती. पण वाटाघाटी सफल झाल्या नाहीत व त्यांनी यादीच पाठवली नाही, मग एकट्या मराठा जातीच्या ताकदीवर कसे लढणार? असा प्रश्न उपस्थित करुन जरांगे यांनी आता अापल्या सर्व उमेदवारांनीही अर्ज माघारी घ्यावेत, असे आवाहन करत निवडणूक रिंगणातून माघार घेत असल्याचे जाहीर केले.

तुम्हाला ज्याला पाडायचंय त्याला पाडा…

खरे तर ३ नाेव्हेंबर रोजीपर्यंत जरांगे निवडणूक लढवण्यावर ठाम होते. त्यांनी स्वत: २० मतदारसंघात आपले उमेदवार लढतील व इतर मतदारसंघाबाबत एक दिवसात निर्णय होईल, असे पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. मग अचानक २४ तासात त्यांचा निर्णय का बदलला? असा प्रश्न उपस्थित होते आहे. पण.. राजकीय तज्ञांच्या मते.. जरांगे निवडणूक लढवणार नव्हतेच. त्यांनी फक्त महायुतीच्या नेत्यांना गाफील ठेवण्यासाठी हा गनिमी कावा खेळल्याचे सांगितले जाते. याचे कारण म्हणजे लोकसभेला जरांगे पॅटर्नमुळे महायुतीला मोठा फटका बसला. आता तो धोका नको म्हणून भाजप व महायुतीच्या नेत्यांनी जरांगेंच्या चळवळीत फूट पाडायला सुरुवात केली होती. त्यामुळे जरांगेंनी ही नवी चाल खेळली. आपण उमेदवार उभे करणार म्हटल्यावर महायुतीचे नेते निश्चिंत राहिले. कारण जरांगेंच्या उमेदवारामुळे मराठा मतांचे युती, आघाडी व जरांगेंचे उमेदवार असे तीन ठिकाणी विभाजन होणार व ओबीसी आणि इतर समाज आपल्या पाठीशी येतील. म्हणून विजय आपलाच अशा अविर्भावात महायुतीचे नेते होते. त्यामुळे त्यांनी जरांगेंच्या चळवळीला सुरुंग लावण्याचे डावपेच थांबवले. जरांगेंनी शेवटपर्यंत उमेदवार देणारच हे सांगत महायुतीला संभ्रमात ठेवले. मात्र एेनवेळी माघार घेऊन ‘तुम्हाला ज्याला पाडायचंय त्याला पाडा’ असे आवाहन मराठा समाजाला केले.

जरांगेंचे आवाहन…

“कुठल्याही अपक्षाला आमचा पाठिंबा नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला आमचा पाठिंबा नाही. माझी इच्छा नाही याला पाड आणि त्याला पाड म्हणायची. आपल्यासाठी आंदोलन महत्त्वाचं आहे, महाराष्ट्रातील सगळ्या बांधवांनी नाराज न होता काम नये. कुठल्याही अपक्षाला आमचा पाठिंबा नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला आमचा पाठिंबा नाही. लोक ज्याला पाडायचं ते त्याला बरोबर पाडतात. गेल्यावेळी मी असेच म्हटलो होतो. फक्त एवढंच सांगेन की, मराठ्यांनी गुपचूप मतदानाला जायचं, बटण दाबायचं आणि गुपचूप पाडायचं. मराठ्यांना त्रास देणाऱ्यांना पाडणार….. असे आवाहन जरांगेंनी केले आहे.

अन् भुजबळांचे अंदाज ठरले खरे…

आता मराठा समाजाचा खरा रोष आहे तो सत्ताधाऱ्यांवरच. त्यातही अजित पवार व एकनाथ शिंदे हे मराठा नेतृत्व असल्याने त्यांच्यावर रोष कमी व देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व असलेल्या भाजपवर मराठा समाजाचा जास्त राग आहे. म्हणून आता एेनवेळी जरांगेंनी घेतलेली माघार ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात व महाविकास अाघाडीच्या पथ्यावर पडणार असल्याचा अंदाज लावला जात आहे.नओबीसींचे नेते प्रा.लक्ष्मण हाके व मंत्री छगन भुजबळ मात्र जरांगेंचे हे डावपेच ओळखून होते. जरांगेंनी कितीही उमेदवार देण्याच्या घोषणा केल्या तरी ते एकही उमेदवार देणार नाहीत असे प्रा.हाके छातीठोकपणे सांगत होते. भुजबळही तेच सांगायचे. या दोघांचे अंदाज खरे ठरले आहेत. जरांगे बारामतीची स्क्रिप्ट वाचतात, असा हाके यांचा आरोप आहे. पण जरांगेंच्या घूमजाव भूमिकेमुळे मराठा समाजातही संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आता लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही मराठा समाज सत्ताधाऱ्यांविरोधात एकगठ्ठा मतदान करतोय की वेगवेगळ्या पक्षाकडे विखुरला जातोय, हे विधानसभेच्या निकालानंतरच कळेल. जरांगेंचे डावपेच यशस्वी झाले का फसले हेही तेव्हाच स्पष्ट होईल.