अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सामील होणार शरद पवार गट?

लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे ८ खासदार निवडून आले. त्यामुळे विधानसभेलाही त्यांना मेाठे यश मिळेल व अजित पवारांचे बहुतांश आमदार पुन्हा शरद पवारांकडे येतील, अशा अटकळी बांधल्या जात होत्या. पण झाले उलटेच. शरद पवारांचे फक्त १० आमदार निवडून आले व अजित पवारांचे ४१. त्यामुळे आता उलटे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. पुढील पाच वर्षे सत्तेविना राहण्यापेक्षा आपला संपूर्ण पक्षच मुळ राष्ट्रवादीत सामील करु व सत्तेचा आस्वाद घेत राहू, असा प्रस्ताव ‘तुतारी’च्या काही आमदार, खासदाांनी शरद पवारांसमोर ठेवला आहे. आता बघूया शरद पवार याबाबत काय निर्णय घेतात ते… जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून

शरद पवार गटाचे आमदार सत्तेत शिरण्याची संधी शोधतायत?

लोकसभेत सपाटून मार खालेल्या अजित पवार गटाने विधानसभेत मात्र चमत्कार केला. महायुतीची लाट, लाडक्या बहिणींच्या आधारामुळे अजित पवारांचे ५५ पैकी ४१ आमदार निवडून आले. तर शरद पवार गटाचा सपशेल पराभव झाला. ६० ते ७० आमदार निवडून येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शरद पवारांच्या गटाला अवघ्या १० जागांवर समाधान मानावे लागले. आता राज्यात महायुतीचे प्रचंड बहुमताचे सरकार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांना पुढील ५ वर्षे विरोधातच बसावे लागेल, यात शंकाच नाही. काँग्रेस व उद्धव सेनेने हे वास्तव मान्य केले आहे. आता त्यांची लढाई विरोधी पक्षनेतेपद तरी मिळावे यासाठी आहे. पण शरद पवार गटाचे आमदार सत्तेत शिरण्याची संधी शोधू लागले आहेत. अजित पवार यांच्याकडे सध्या मूळ राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ हे चिन्ह आहे. वादविवाद खूप झाले, आता शरद पवारांच्या १० आमदारांनीही अजित पवारांच्या गटात सामील व्हावे व सत्तेची फळे चाखावीत, असा प्रस्ताव काही आमदार व खासदारांनी शरद पवारांकडे मांडला आहे.

शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम राहणार?

८,९ जानेवारीला होणाऱ्या शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत होत आहेत. त्यात या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. शरद पवार ते लगेच पक्ष विलिनकरणाच्या मन:स्थितीत नाहीत. पण सर्वच आमदार- खासदारांनी तसा जोर लावला तर मात्र त्यांचाही नाईलाज होऊ शकतो. आणि शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम राहिले तर मात्र त्यांचा पक्ष पुन्हा एकदा फुटून यातील काही आमदार अजित पवारांकडे जाऊ शकतात. शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवारांचे कट्टर विरोधक असलेले आमदार जितेंद्र आव्हाड, राेहित पाटील आणि उत्तम जानकर या तिघांचा मात्र पक्ष विलिनीकरणाला विरोध आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली या राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व कायम ठेवावे आणि विरोधी पक्षाची भूमिका बजावावी, असे त्यांना वाटत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शरद पवार गटाला नवे प्रदेशाध्यक्ष मिळणार?

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात ८ जानेवारीला या बैठकीला प्रारंभ होईल. स्वत: शरद पवार या बैठकीला उपस्थित राहाणार असून पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात महत्त्वाची चर्चा आणि निर्णय होणार असल्याने या बैठकीला अवश्य यावे, असे निरोप पक्षाचे आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार आणि पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना देण्यात आले आहेत. ८ जानेवारीला पक्षसंघटन, त्यात बदलाची आवश्यकता आणि पुढील वाटचाल या संदर्भात प्रमुख नेते आपले विचार मांडतील. त्यात पदाधिकाऱ्यांचे चेहरे बदलण्याचाही निर्णय होऊ शकतो. जयंत पाटील यांच्याऐवजी नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड होऊ शकते. ९ जानेवारीच्या बैठकीत पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा होणार आहे.

शरद पवारांनी विलिनीकरणाला मंजुरी देण्याचा आग्रह…

पुढची पाच वर्षे विरोधात राहून सत्ताधाऱ्यांचा रोष पत्करायची बहुतांश आमदार आणि खासदारांची तयारी नाही. म्हणूनच त्यांना अजित पवारांसोबत जाण्याची घाई झाली आहे. पण शरद पवार हे प्रस्ताव मान्य करतील याबाबत आमदारांना खात्री नाही. त्यामुळे आधी सुप्रिया सुळे व रोहित पवार या पवार कुटुंबातील सदस्यांना राजी करायचे व त्यांच्यामार्फत शरद पवारांकडे आग्रह करायचा असे डावपेचही आखले जात आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही भाजपात जाणार असल्याची नेहमीच चर्चा होती. पण उरलेला पक्ष फुटू नये असे वाटत असेल तर शरद पवारांनी विलिनीकरणाला मंजुरी द्यावी, यासाठी आग्रह केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता शरद पवार काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. एक मात्र खरे की नवीन वर्षात राष्ट्रवादी पक्षात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. एक तर पवारांचे दोन्ही गट एकत्र होतील किंवा तसे झाले नाही तर शरद पवारांचा गट पुन्हा एकदा फुटेल, हेही तितकेच खरे.