महाराष्ट्रात सध्या चर्चेत असलेले एकमेव नेते म्हणजे बीड जिल्ह्यातील आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण त्यांनी ज्या आक्रमक पद्धतीने विधानसभेत व विधिमंडळाबाहेर लावून धरले आहे, त्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुकच होत आहे. देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी या भाजप आमदाराने सत्ताधारी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे एक मंत्री व त्या पक्षाचे प्रमुख असलेल्या अजित पवारांचे अतिशय निकटवर्तीय असलेल्या धनंजय मुंडे यांच्यावरच थेट शरसंधान करण्याचे धाडस दाखवले आहे. एकाच सरकारमध्ये असून भाजप एक आमदार आपल्याच मित्रपक्षातील एका मंत्र्यावर इतके खुलेआम आरोप करतोय, या मागे नक्कीच सरकारच्या प्रमुखांचा पाठिंबा आहे का? असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. कोण आहेत हे आमदार सुरेश धस.. इतक्या आक्रमक पद्धतीने धनंजय मुंडेंविरोधात भूमिका घेण्याचे त्यांचे काय अाहे कारण? जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून
आक्रमक वक्तृत्व शैलीमुळे अल्पावधीत परिचित…
सुरेश धस यांचे व्यक्तिमत्व म्हणजे एक रांगडा राजकारणी अशीच करावी लागेल. आपल्या ग्रामीण ढंगातील वक्तृत्वाने त्यांनी केवळ मतदारसंघावरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावर गारुड निर्माण केले आहे. १९९५ च्या काळापासून त्यांची राजकीय कारकिर्द खऱ्या अर्थाने समोर आली. त्या काळी आष्टी- पाटोद्यातून काँग्रेसचे नेते साहेबराव दरेकर हे अपक्ष उभे होते. दिवंगत भाजप नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या मदतीने दरेकर आमदार झाले, त्यांनी तत्कालिन युती सरकारला पाठिंबाही दिला. त्या काळात दरेकरांचे एक निकटवर्तीय पदाधिकारी, कार्यकर्ता म्हणून सुरेश धस काम पाहात होते. या तरुण नेत्यातील चमक गोपीनाथरावांनी ओळखली. नंतरच्या निवडणुकीत म्हणजे १९९९ मध्ये त्यांनी थेट सुरेश धस यांनाच भाजपात घेऊन दरेकर यांच्याविरोधात निवडणूक लढवायला लावली. यावेळी दरेकरांना शिष्याकडूनच पराभूत व्हावे लागले. सुरेश धस पहिल्यांदा आमदार झाले अन् त्यांनी आपल्या ग्रामीण ढंगातील वक्तृत्वाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आक्रमक भाषण शैलीमुळे ते अल्पावधीत महाराष्ट्राला परिचित झाले. सुमारे १० वर्षे त्यांनी भाजपात काढले. मात्र नंतर भाजप सत्तेत येण्याची चिन्हे कमी दिसू लागल्यामुळे अखेर २००९ मध्ये सुरेश धस यांनी राष्ट्रवादीची वाट धरली.
अन् धसांची गोपीनाथ मुंडेंविरुद्धच्या राजकारणाला सुरुवात…
अजित पवार यांनी त्यांना पक्षात घेऊन नंतर मंत्रिपदही दिले. मग या काळात सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यात थेट गोपीनाथराव मुंडे यांच्याविरोधात राजकारण करायला सुरुवात केली. पण त्यावेळी धस यांची ताकद गोपीनाथरावांसमोर थिटी पडत होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत धस यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्याविरोधात निवडणूकही लढवली, पण धस पराभूत झाले. ज्या मुंडेंनी धस यांना आमदार केले, ताकद दिली त्यांच्याविरोधातच धस निवडणूक लढवत असल्याने मुंडे समर्थकांमध्ये धस यांच्याविरोधात चिड निर्माण झाली होती. तो राग अजूनही काही प्रमाणात कायम आहे. दरम्यानच्या काळात २०१४ मध्ये गोपीनाथरावांचे अपघाती निधन झाले. नंतर बीड जिल्ह्यातील राजकारणही बदलू लागले. २०१४ ते २०१९ या काळात राज्यात पुन्हा भाजपचे सरकार आले होते. या भाजप लाटेवर स्वार होण्यासाठी सुरेश धस यांनी पुन्हा २०१९ मध्ये भाजपची कमळ हाती धरले. मात्र भाजपच्या नेत्या व तत्कालिन मंत्री पंकजा मुंडे यांच्याविरोधी धस यांचे राजकारण सुरूच होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडेंना शह देण्यासाठीच धस यांना भाजपात आणल्याचीही चर्चा तेव्हा रंगली होती. भाजपकडून धस बीड- उस्मानाबाद- लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेवर ६ वर्षे पुन्हा आमदारही होते. आता २०२४ च्या निवडणुकीतही आष्टी- पाटोद्यातून धस पुन्हा विजयी झाले आहेत.
मराठा समाजाचा सुरेश धसांना पाठिंबा…
या काळात पंकजा मुंडे यांनी आपल्याला पाडण्यासाठी प्रयत्न केले, असा आरोप विजयानंतरच्या पहिल्या भाषणात धस यांनी केला होता. तेव्हापासून धस यांनी मुंडे यांच्याविरोधाची धार आणखी तीव्र केल्याचे दिसून येते. याला ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षाची किनारही असल्याचे दिसते. मुंडे हे ओबीसी नेते आहेत तर धस मराठा समाजाचे नेते. अलिकडेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बीड जिल्ह्यात या दोन्ही समाजात मोठ्या प्रमावर संघर्ष निर्माण झाला आहे. त्यामुळे ओबीसींचे नेतृत्व पुढे येऊ नये म्हणून बीड जिल्ह्यातील सर्व मराठा आमदार धस यांच्या पाठीशी असल्याचेही दिसून येत आहे. दरम्यानच्या काळात मस्साजोग येथील संतोष देशमुख यांचे प्रकरण उचलून धरत धस यांनी पुन्हा एकदा मुंडे बंधू- भगिनींना अडचणीत आणले आहे. या मुद्द्यावरही सर्वपक्षीय मराठा आमदारांनी धनंजय मुंडेंविरोधात मोहिम उघडली आहे. त्याचे नेतृत्व सुरेश धस करत आहेत. छोटा आका वाल्मीक कराड, मोठा आका धनंजय मुंडे असे आरोप करत त्यांनी देशमुखच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचा प्रत्यक्ष तर धनंजय मुंडेंचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचेही सांगितले. एकूणच धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढावे यासाठी त्यांनी सर्वपक्षीय आमदारांची मोट बांधून सरकारवर दबाव वाढवण्याचे काम केले आहे. देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या अन्यायावर गप्प असणाऱ्या पंकजा मुंडेंनाही धस यांनी अनेकदा खडे बोल सुनावले आहेत. एकूणच धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढून घेणे व पंकजा मुंडे यांनाही बीडचे पालकमंत्रिपद मिळू नये, यासाठी धस यांचे प्रयत्न सुरु आहेत.
मुंडे हटाव मोहिमेला फडणवीसांचा पाठिंबा?
विशेष म्हणजे, धस यांची ही राजकीय खेळी असली तरी धनंजय देशमुख यांच्या हत्येचे भावनिक प्रकरण त्यांनी उचलून धरल्यामुळे त्यांच्या मागे बीड जिल्ह्यातही जनताही मोठ्या संख्येने उभी राहिली आहे. भाजप, राष्ट्रवादी या सत्ताधारी पक्षाचे आमदारही एकाच व्यासपीठावर येऊन धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करु लागले आहेत. केवळ बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर शेजारच्या लातूर जिल्ह्यातील औशाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार हेही बीडच्या मोर्चात सहभागी झाले होते. यातून सरकारवर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अखेर वाल्मीक कराडला शरण येण्यास सरकारने भाग पाडले. आता तरी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीचा जोर कमी होईल, अशी अपेक्षा होती. पण धस यांनी ती मागणी अजूनही सोडलेली नाही. एकूणच भाजपचे आमदार असूनही धस यांनी एका मंत्र्याविरोधात सुरु केलेली मोहिम व त्याला सत्ताधारी आमदारांकडूनच मिळत असलेले बळ पाहता धनंजय मुंडे हटाव मोहिमेला सरकारचे प्रमुख असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच पाठबळ मिळत असल्याचा संशयही व्यक्त होत आहे. औशाचे आमदार अभिमन्यू पवार हे एकेकाळी फडणवीस यांचे स्वीय्य सहायक होते. फडणवीस यांच्यामुळेच पवार दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. अशा फडणवीसांच्या विश्वासू नेत्याचा बीडच्या मोर्चातील सहभाग व धनंजय मुंडे हटाव मोहिमेला पाठिंबा हे या लढ्यामागे देवेंद्र फडणवीस यांचेच पाठबळ असल्याचे दर्शवते.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मौन…
उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र या विषयावर अजून तरी जाहीरपणे काहीही बोलत नाहीत. सध्या ते परदेशात गेले आहेत. पण या सर्व प्रकरणावर त्यांचे लक्ष्य आहे. भाजपमधील नेत्यांनी मिळून धनंजय मुंडेंना कसे टार्गेट केले आहे, हे त्यांच्या लक्षात आले आहे. पण धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असलेला वाल्मीक कराड हा थेट खंडणी व खूनाच्या प्रकरणात संशयित असल्यामुळे अजित पवार जाहीरपणे धनंजय यांची बाजू घेऊ शकत नाहीत. मात्र धनंजय यांना मंत्रिमंडळातून काढण्यास ते तयार नाहीत. आज ना उद्या या विषयावर मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात खडाजंगी होणार यात शंकाच नाही. एकीकडे मंत्रिमंडळातील एक एक सदस्य निवडताना भाजप हायकमांड पारदर्शी कारभार व स्वच्छ प्रतिमेचा निकष लावत असताना धनंजय मुंडेंवर इतके गंभीर आरोप होत असताना त्यांना फडणवीस मंत्रिमंडळात का ठेवत आहेत, हा प्रश्न आता सामान्य जनताही विचारु लागली आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बीडचे पालकत्व स्वीकारणार…
देशमुख खून प्रकरणातील अजून तीन आरोपी फरार आहेत. ते वाल्मीक कराडचे निकटवर्तीय आहेत, म्हणजेच पर्यायाने धनंजय मुंडे यांचे समर्थकच अाहेत, असा आरोप होत आहे. या तिघांच्या अटकेसाठी सीआयडी जंगजंग पछाडत आहे. हे तिघे हाती लागले तर खऱ्या अर्थाने छोटा आका कोण? मोठा आका कोण? हे समोर येईल. पण त्याआधी नैतिकेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अशी भाजपमधून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र ते मंत्रिपद न सोडण्यावर ठाम राहिले तर नाईलाजाने त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले जाऊ शकते. उद्या धनंजय मुंडेंचे मंत्रिपद गेले तर पंकजा मुंडे या कॅबिनेट मंत्री या नात्याने बीडच्या पालकमंत्री होऊ शकतात. आमदार सुरेश धस यांना तेही नको आहे. म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडचे पालकत्व स्वीकारावे, अशी मागणी ते सातत्याने करत आहेत. एका मंत्र्याविरोधात धस जाहीरपणे भूमिका घेत असताना सत्तेतील भाजपचे नेते त्यांना इतकी मोकळीक देत आहेत, याचाच अर्थ धनंजय मुंडे हटाव मोहिम धस यांना भाजपमधून पाठबळ मिळत आहे हे आता लपून राहिलेले नाही.
मुंडेंचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न?
बीड जिल्ह्याच्या राजकारणातून मुंडे घराण्याचे वर्चस्व कमी करण्याचा हा धस यांचा प्रयत्न आहे. बघूया त्यांना यात यश येते की नाही ते? पण जर धनंजय मुंडे व पंकजा मुंडे मंत्रिपदावर कायम राहिल्या तर मात्र धस आणि मुंडे यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तेज होत जाईल, यात शंकाच नाही. कारण आपल्याला त्रास देणाऱ्यांना मुंडे कधी सोडत नाहीत. पालकमंत्रीपद मुंडेंकडे आले तर ते पदोपदी आमदार धस यांची अडवणूक करतील, त्यांची काही प्रकरणेही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाईल. यातून केवळ धस आणि मुंडेच नव्हे तर राष्ट्रवादी व भाजप यांच्यातही दुही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.