लोकसभेला आमचं ऐका, विधानसभेला तुम्हाला जास्त जागा देऊ; अमित शहांनी शिंदे- अजितदादांना पटवलं
महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब; भाजपला ३० ते ३२ जागा, उर्वरित १६ ते १८ जागा दोन्ही मित्रपक्षांना मिळणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा महाराष्ट्र दौरा महायुतीच्या जागावाटपातील तेढ सोडवण्यासाठी फायदेशीर ठरला. महाराष्ट्रातील ४८ पैकी ३० ते ३२ जागा लढवण्याच्या निर्णयावर भाजप शेवटपर्यंत ठाम राहिले. २२ जागांची मागणी करणाऱ्या शिंदेसेनेला फार तर १२ ते १३ जागा मिळू शकतील व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ४ ते ५ जागांवरच समाधान मानावे लागेल.
४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे भाजपचे ध्येय
BJP aims to win 45 out of 48 seats
महाराष्ट्रातून यंदा ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे भाजपचे ध्येय आहे. त्यासाठी त्यांनी आधी शिवसेना व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून अनुक्रमे एकनाथ शिंदे व अजित पवार गटाला सोबत आणले, सत्तेचा वाटाही दिला. मात्र भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेक्षणात या दोन्ही बंडखोर पक्षांना लोकसभा निवडणुकीत फारसे अनुकूल वातावरण नाही. त्याउलट उद्धव ठाकरे व शरद पवार गटाकडे जनतेची सहानुभूती जास्त आहे. भाजपला मात्र मोदींच्या नावावर चांगली मते मिळू शकतात. या निष्कर्षाच्या आधारे भाजपने लोकसभेच्या सर्वाधिक ३२ जागा लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र २०१९ मध्ये शिवसेनेने २३ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी २२ जागा तर आम्हाला हव्याच असा हट्ट शिवसेनाचा होता. अजितदादा गटानेही १० जागांची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांना खूप समजावले पण शिंदे, पवार तडजोडीस तयार नव्हते. त्यामुळे महायुतीचे जागावाटप रखडले होते.
अमित शाह यांच्या तीन बैठका फलदायी
Amit Shah’s three meetings fruitful
४ मार्च रोजी रात्री अमित शाह यांचे संभाजीनगरात आगमन झाले. तिथे देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून त्यांनी तब्बल ३ तास महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघाची परिस्थिती समजावून घेतली. ‘एनडीएचे यंदा ४०० खासदार निवडून आणायचे आहेत. त्यामुळे एक-एक जागा महत्त्वाची आहे. काहीही झाले तरी लोकसभेच्या जागावाटपात तडजोड करु नका. हवे तर विधानसभेला आपण शिंदे गट व अजित पवार गट यांना जास्त जागा देऊ पण लोकसभेला आपल्या ठरल्यानुसारच मतदारसंघ घ्या. दोन्ही मित्रपक्षांना हे समजावून सांगा,’ असे निर्देश शाह यांनी या बैठकीत दिले होते.
अंतिम फॉर्म्युला असा The final formula is
भाजपला ३० ते ३२ जागा, शिंदेसेना १२ आणि अजित पवार गटाला ४ जागा असे एकूण ४८ जागांचे वाटप महायुतीत ठरले आहे. ७ मार्च रोजी केंद्रीय नेतृत्वाकडून भाजपची दुसरी यादी जाहीर होईल. त्यात महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावांचा समावेश असेल. एकदा का भाजपची दुसरी यादी जाहीर झाली की त्यानंतर शिंदे गट व अजित पवार गट हेही आपले उमेदवार जाहीर करतील. ७ मार्च रोजीच महायुतीच्या नेत्यांची मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद होऊन याबाबत घोषणा केली जाऊ शकते.