राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दीड वर्षांनंतर पुन्हा एकदा राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. दीड वर्षापूर्वी त्यांनी अशीच एका निवृत्तीची घोषणा केली होती तेव्हा राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांनी त्यांना या निर्णयापासून रोखले होते. केवळ अजित पवार यांचा अपवाद वगळता बहुतांश नेते पवारच पक्षाध्यक्ष हवेत असे म्हणत होते. अजितदादांना मात्र काकांनी आता थांबावे व पण आपल्या हाती द्यावा असे वाटत होते. पण काकांच्या मनात काही वेगळेच होते. तेव्हा कार्यकर्त्यांच्या आग्रहाचे कारण पुढे करत शरद पवारांनी यू टर्न घेत निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी निवृत्तीची भाषा सुरु केलीय. काय आहे या मागचे राजकारण जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून
‘आता कुठेतरी थांबले पाहिजे…’
बारामतीत युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार यांची कांटे की टक्कर होत आहे. लोकसभेत मिळाल्या विजयामुळे शरद पवार गटात उत्साह असून नातवाला निवडून आणण्यासाठी ते स्वत: बारामतीत प्रचार सभा घेत आहेत. एका सभेत शरद पवारांनी पुन्हा निवृत्तीचा विषय बोलून दाखवला. पवार म्हणाले ‘गेली ५०-५५ वर्षे मी राजकारणात आहे. आतापर्यंत १४ निवडणूका लढल्या, मात्र बारामतीकरांनी मला एकदाही घरी पाठवलं नाही. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याने मी मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री झालो. आता मी राज्यसभेत आहे. अजून दीड वर्षे टर्म आहे. त्यानंतर पुन्हा राज्यसभेत जायचं की नाही याचाही विचार मला करावा लागेल. यापुढे मी कोणतीच निवडणूक लढवणार नाही. पण आता कुठेतरी थांबलं पाहिजे, नवी पिढी समोर आली पाहिजे. मी ३०- ३५ वर्षे बारामतीचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर इथली सगळी जबाबदारी अजित पवारांकडे दिली. गेली २५-३० वर्षे त्यांनी कारभार पाहिला. आता पुढच्या ३० वर्षांची व्यवस्था करण्याची गरज आहे. त्यामुळे युगेंद्र पवारांच्या हाती बारामतीची सूत्रे सोपवत असल्याचे पवार म्हणाले.
बारामतीने युगेंद्रचे नवे नेतृत्व स्वीकारावे व आपल्यासोबतच अजित पवारांनाही रिटायर करावे, असे संकेत पवारांनी दिलेत.
शरद पवार यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केल्याने या वेळी कुणाला फारसे आश्चर्य वाटले नाही. याचे कारण म्हणजे यापूर्वी २ मे २०२३ रोजीही पवारांनी निवृत्तीची घोषणा केली होती. पण त्यावेळी समर्थकांच्या रेट्यामुळे ७२ तासांतच त्यांनी आपला निर्णय मागे घेतला होता. अजित पवारांना मात्र त्यावेळीही साहेबांनी थांबावे व अापल्या हाती पक्ष सोपवावा, असे वाटत होते. पण शरद पवारांनी त्यांचा हा कावा ओळखला व सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष बनवून टाकले. स्वत:च पक्षाध्यक्ष राहिले. या प्रकारामुळे नाराज झालेल्या अजित पवार यांनी अखेर राष्ट्रवादीतच फूट पाडली व महायुतीत जाऊन सत्ता मिळवली. शरद पवारांचे ५४ पैकी ४० आमदार अजितदादांसोबत गेले. मग आता पुन्हा पवारांनी निवृत्तीची भाषा का केली असेल? या प्रश्न उपस्थित होत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बारामतीकरांची सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी हे डावपेच टाकले असावेत. लोकसभेत पवारांनी सुप्रिया सुळेंना निवडून आणत अजित पवारांना आस्मान दाखवले. आता विधानसभेला त्यांना नातू युगेंद्र यांना निवडून आणायचे आहे व अजित दादांना पुन्हा आस्मान दाखवायचे आहे. त्यासाठीच निवृत्तीची भाषा वापरुन ते आपल्या अखेरच्या इनिंगमध्ये बारामतीकरांनी युगेंद्रला पुढे आणावे, असे भावनिक आवाहन करत आहेत.