भारतासारख्या बलाढ्य व सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाचे सलग तीन टर्म पंतप्रधान होण्याचा मान नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे. पंतप्रधान हे देशातील सर्वोच्च मोठे पद. त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते. त्यातही पुन्हा मोदींसारखा महत्त्वाकांक्षी नेता या पदावर आल्यापासून पंतप्रधान कार्यालयाची म्हणजेच पीएमओची कार्यपद्धती फारच चर्चेत आली आहे. या टीम मोदीमध्ये अनेक दिग्गज अधिकारी कार्यरत आहेत. त्यात आता एका महिलेची भर पडली आहे, निधी तिवारी असे त्यांचे नाव. कोण आहेत निधी तयारी, मोदींनी त्यांच्यावर कोणती नवीन जबाबदारी दिली आहे… जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून….
अजित डोभाल यांचे नाव नेहमीच चर्चत…

पक्षसंघटना असो की प्रशासकीय कामकाज, पंतप्रधान नरेंद्र मोदी या टीममध्ये प्रत्येक माणूस बारकाईन तपासून निवडतात. म्हणूनच २०१४, २०१९ व २०२४ अशा पंतप्रधान पदाच्या तिन्ही टर्ममध्ये टीम मोदींमधील अधिकाऱ्यांची नेहमीच चर्चा होत असते. यात गेल्या १०- ११ वर्षांपासून सर्वात चर्चेत नाव होते ते म्हणजे पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचे. २०१४ पासून आतापर्यंत सर्वाधिक काळ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. डोभाल हे 1968 मध्ये आयपीएस अधिकारी म्हणून केरळ कॅडरमध्ये रुजू झाले होते. 2004-05 मध्ये ते इंटेलिजन्स ब्युरो (गुप्तहेर संस्था)चे संचालक होते. देशात व विदेशात भारतसंबंध काय हालचाली सुरू आहेत याची खडान्खडा माहिती डोभाल यांच्यामार्फत मोदींपर्यंत पोहोचत असते.
रिझर्व्ह बँकेंचे माजी गव्हर्नरदेखील मोदींच्या टीममध्ये…

पंतप्रधान कार्यालयातील दुसरे अधिकारी आहेत ते म्हणजे डॉ.पी.के.मिश्रा. ते पंतप्रधानांचे मुख्य सचिव आहेत. पीके मिश्रा गुजरात कॅडरचे 1972 च्या बॅचचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, 2001 ते 2004 दरम्यान डॉ. प्रमोद कुमार मोदींचे मुख्य सचिव होते. मात्र पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी मिश्रांना पुन्हा दिल्लीत आपल्यासोबत आणले. या टीममधील आणखी एक नाव म्हणजे शक्तिकांता दास. फेब्रुवारी 2025 मध्ये त्यांच्याकडे पीएमओतील मुख्य सचिव-2 पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांचा जन्म ओडिशात झाला होता. ते 1980 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. रिझर्व्ह बँकेचे सहा वर्ष गव्हर्नर राहिलेले दास आर्थिक घडामोडींचे अभ्यासक आहेत. निवृत्तीनंतर मोदींनी त्यांना आपल्या टीममध्ये रुजू करुन घेतले. याशिवाय विवेक कुमार (आयएफएस 2004) आणि हार्दिक शाह, पंतप्रधान कार्यालयात खासगी सचिव म्हणून कार्यरत आहेत. शाह 2010 च्या बॅचचे गुजरात कॅडरचे अधिकारी आहेत.
पंतप्रधानांच्या खाजगी सचिव म्हणून निधी तिवारींची नियुक्ती…

आता या नावांमध्ये आणखी एका महिला अधिकाऱ्यांची भर पडली आहे, त्या आहेत आयएफएस अधिकारी निधी तिवारी. पंतप्रधान मोदींच्या खासगी सचिव म्हणून नुकतीच त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. निधी तिवारी या आतापर्यंत पंतप्रधान कार्यालयात डेप्युटी सेक्रेटरी म्हणून कार्यरत होत्या. त्या परराष्ट्र आणि संरक्षणाशी संबंधित प्रमुख विभागांचे काम सांभाळत होत्या. आता त्यांच्यावरील जबाबदारी आणखी वाढवण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजाचं नियोजन, त्यांच्या शेड्यूलचं व्यवस्थापन करणं, धोरण आणि प्रशासकीय समन्वय आणि कम्युनिकेशन इत्यादी कामे तिवारी करतील. निधी तिवारी 2014 बॅचच्या आयएफएस अधिकारी आहेत. त्यांना 2013 च्या सिव्हिल सेवा परीक्षेत 96 वा रँक किंवा क्रमांक मिळाला होता. नव्या पदावर नियुक्ती होण्यापूर्वी जवळपास अडीच वर्षांपासून निधी तिवारी पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) कार्यरत होत्या. त्याआधी नोव्हेंबर, 2022 मध्ये त्यांची पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) अंडर सेक्रेटरी या पदावर नियुक्ती झाली होती.
निधी तिवारींचा आजवरचा प्रवास…

2013 मध्ये सिव्हिल सेवा परीक्षा पास होण्यापूर्वी त्यांनी वाराणसीत सहाय्यक आयुक्त (वाणिज्य कर) म्हणून काम केले. मुळच्या उत्तर प्रदेशातील लखनौच्या रहिवाशी असलेल्या निधी त्यांचे पती सुशील जायसवाल हे डॉक्टर आहेत. वाराणसीत त्यांचं हॉस्पिटल आहे. निधी यांचे बी.एस्सीपर्यंत शिक्षण लखनौतच झाले. त्यांनी पदव्युत्तर पदवी बनारस हिंदू विद्यापीठातून (बीएचयू) पूर्ण केली आहे. 2006 मध्ये त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून बायोकेमिस्ट्रीचं शिक्षण पूर्ण केलं. तिथे त्यांना सुवर्णपदक मिळालं होतं. त्यानंतर भाभा अणुसंशोधन केंद्रात निधी यांची वैज्ञानिक म्हणून निवड झाली. 2008 मध्ये त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आणि यूपीएससीची तयारी सुरू केली. याच काळात त्यांची उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगात निवड झाली होती. 2008 मध्ये त्या शिक्षण अधिकारी झाल्या होत्या.””तर 2009 मध्ये सेल्स टॅक्सच्या सहाय्यक आयुक्त म्हणूनही त्यांची निवड झाली. त्यानंतर 2014 मध्ये त्या यूपीएससी परीक्षेत 96 रँकने पास झाल्या. आता पंतप्रधान मोदी यांच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजाचं नियोजन, त्यांच्या शेड्यूलचं व्यवस्थापन करणं, धोरण आणि प्रशासकीय समन्वय आणि कम्युनिकेशन इत्यादी कामे तिवारी करतील. एक महिला अधिकारी म्हणून तिवारी निश्चितच आपल्या कामाची छाप पाडतील, यात शंकाच नाही.