राजकारण्यांप्रमाणे शंकराचार्यांचा यू टर्न; आधी म्हणाले शिंदे विश्वासघातकी, आता म्हणतात ते तर सनातन धर्मरक्षक

राजकारणी लोक आज जे काही बोलतील, त्यावर उद्या ठाम राहतील याची कुणीच गॅरंटी देऊ शकत नाही. आज एका पक्षात असताना केलेली टीका किंवा दिलेली आश्वासने उद्या पक्ष बदलला की लगेच ते विसरुन जातात. त्यामुळे अापल्या देशात आता ना कुणाचा राजकारण्यांवर विश्वास राहिलाय ना श्रद्धा. मात्र शंकराचार्यांसारख्या श्रद्धास्थानाच्या पदावर असलेल्या व्यक्ती जेव्हा राजकारणांसारखी भाषा बोलायला लागतात तेव्हा मात्र सर्वसामान्य नागरिकांचा त्यांच्यावरील विश्वासही उडू लागतो. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्याबाबतीत असाच अनुभव महाराष्ट्राने घेतलाय. अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी सुरु असताना सर्व हिंदू साधू- संतांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु होता. मात्र त्याचवेळी बद्रीनाथ ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मात्र मोदींच्या भूमिकेवर बोट ठेवून त्यांच्यावर कठोर टीका केली होती. त्यामुळे तेव्हा स्वामी अविमुक्तेश्वरानंद हे नाव देशभर चर्चेत आले. किंबहुना मोठ्या प्रमाणावर ट्रोलही झाले. मात्र त्याची तमा अविमुक्तेश्वरानंद यांनी बाळगली नाही, ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. मोदी विरोधकांनी त्यांंच्या भूमिकेचे स्वागत केले होते. हा प्रकार जानेवारीत झाला होता.

ठाकरे कुटुंबीयांच्या वतीने पाद्यपूजा…

त्यानंतर सहा महिन्यांनी म्हणजे साधारण १५ जुलैच्या दरम्यान स्वामी अविमुक्तेश्वरानंद मुंबईत आले होते. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी ठाकरे कुटुंबीयांच्या वतीने त्यांची पाद्यपूजा करण्यात आली. यावेळी स्वामींनी उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा आशीर्वाद दिला होता. तसेच शिवसेेनेतील बंडाचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कठोर शब्दात टीका केली होती. तेव्हा शंकराचार्य म्हणाले होते.. ‘उद्धव ठाकरेंबरोबर सर्वात मोठा विश्वासघात झाल्याचे दुःख वाटते. मात्र ते लवकरच पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होवोत, अशी आपली इच्छा आहे. आम्ही हिंदू धर्म, सनातन धर्माचे पालन करणारे लोक आहोत. आपल्या धर्मात पूण्य-पापाची कल्पना मांडली आहे. पापामध्ये घात ही संकल्पना आहे. तर विश्वासघात हा सर्वात मोठा घात असल्याचे बोलले गेले आहे. उद्धव ठाकरेंबरोबर सर्वात मोठा विश्वासघात झालेला आहे. याचे दुःख अनेक लोकांच्या मनात आहे. आम्हीही या विश्वासघातासाठी सहवेदना व्यक्त केल्या. जोपर्यंत तुम्ही पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसत नाही. तोपर्यंत आमच्या मनातील दुःख दूर होणार नाही”, अशी भावनाही शंकराचार्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती.

शिंदेंना ताम्रपट देऊन हिंदूरक्षक उपाधी बहाल…

“कुणाचे हिंदुत्व अस्सल आहे आणि कुणाचे नकली हे जाणून घ्यावे लागेल. जो विश्वासघात करतो, तो हिंदू असू शकत नाही. जो विश्वासघात सहन करतो, तो हिंदूच असणार. कारण त्याच्याशी विश्वासघात झाला आहे, अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे व बंडखोर करणाऱ्या आमदारांची नावे न घेता कठोर शब्दात प्रहार केला होता. शंकराचार्यांना मातोश्रीवर बोलावून उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर जे लोक हिंदुविरोधी असल्याचा आरोप करत होते त्यांना चोख प्रत्त्युत्तर देण्याचाही प्रयत्न केला होता. शंकराचार्यांच्या या भेटीची चर्चाही खूप झाली. दोन- अडीच महिन्यांपूर्वीच्या या घटनेची पुन्हा आठवण करण्याचे कारण म्हणजे हेच शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद एका धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबईत आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आपल्या ‘वर्षा’ या निवासस्थानी बोलावून त्यांचे पाद्यपूजन केले. तसेच त्यांना चांदीचा धनुष्यबाण भेटही दिला. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रात गाईला राज्यमातेचा दर्जा देण्यात आल्याचा जो निर्णय शिंदेंच्या सरकारने घेतला त्याच्या जीआरची कॉपीही शंकराचार्यांकडे सुपूर्द केली. त्यामुळे शंकराचार्य अक्षरश: भारावून गेले. त्यांनी शिंदे यांचा उल्लेख सीएम म्हणजेच ‘कॉऊज मॅन’ असा केला. इतकेच नव्हे तर शिंदेंना ताम्रपट देऊन सनातन धर्मरक्षक तथा हिंदूरक्षक ही उपाधीही बहाल केली.

शिंदेंचा उल्लेख गोमातेचा पुत्र…

शिंदेंबद्दल बोलताना शंकराचार्य म्हणाले.. ‘देश स्वतंत्र होऊन ७७ वर्षे उलटली तरी गोमातेला आजपर्यंत असा दर्जा कुणीही दिला नव्हता. शिंदेंनी हा निर्णय घेतला त्यामुळे त्यांचा उल्लेख यापुढे ‘गोमातेचा पूत्र’ म्हणून केला जाईल. काही दिवसांपूर्वी मी त्यांच्यावर टीका केली होती. तेव्हा शिंदे यांनी माझ्याशी संपर्क साधून आपण विश्वासघातकी नसून सनातन धर्माचा आदर करणारा असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. त्यांनी आपले म्हणणे खरे करुन दाखवले आहे,’ असे गौरवोद‌्गारही काढले. दोन- अडीच महिन्यातच शंकराचार्यांच्या भूमिकेत झालेल्या या बदलाने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. आता काही दिवसांनी हेच शंकराचार्य पंतप्रधान मोदींचे कौतुकही करताना दिसतील, अशी टोलेबाजी सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे.