जरांगेंचं ठरलंय… विधानसभेलाही उलथापालथ करणारच, सत्ताधाऱ्यांना धसका

महाराष्ट्रात आता ५ दसरा मेळावे सुरु झाले आहेत. मात्र यावर्षी सर्वात लक्षवेधी होता तो बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नारायण गड येथे नव्याने सुरु झालेला मेळावा. मराठा आरक्षणाचे लढवय्ये नेते मनोज जरांगे पाटील यांनी यावर्षीपासूनच या मेळाव्याची परंपरा सुरु केलीय. विचारांचे सोने लुटण्यासाठी हे मेळावे घेतले जातात, असे दावा आयोजक करतात. पण यातून राजकीय संदेश देण्याचे त्यांचे मनसूबे कधीच लपून राहिलेले नाही. किंबहुना लाखोंच्या संख्येने येणाऱ्या गर्दीलाही हेच अपेक्षित असते. त्यानुसार मनोज जरांगे पाटील यांनी राज्याच्या राजकारणात उलथापालथ घडवून आणण्याचा संदेश नारायण गडावरुन दिलाय. म्हणजेच लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखवलाय. पण त्यामागची रणनिती काय हे अजून त्यांनी उघड केलेले नाही. जरांगे आपले उमेदवार उभे करणार की पुन्हा आघाडीलाच अप्रत्यक्ष फायदा पोहोचवणार..? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्सच्या विश्लेषणातून.

जरांगेंचा मराठा आरक्षणासाठी लढा…

मनोज जरांगे पाटील. १४ महिन्यांपूर्वी त्यांना बीड व जालना जिल्ह्यातील काही मोजक्या लोकांशिवाय अन्य कुणीही ओळखत नव्हते. मात्र गेल्या वर्षी त्यांनी मराठा आरक्षणासाठी सुरु केलेले आमरण उपोषण, रास्ता रोको आंदोलन व त्यावर पोलिसांनी केलेला लाठीमार या घटनांमुळे जरांगे पाटील हे नाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर पोहोचले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, या मागणीसाठी त्यांनी आतापर्यंत सात उपोषण केले. सुरुवातीच्या दोन- चार उपोषणाची सरकारनेही गांभीर्याने दखल घेतली, काही आश्वासनेही दिली. पण जोपर्यंत निर्णय हाती पडत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, या निर्णयावर जरांगे ठाम आहेत. त्यामुळे आता सरकारनेही त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केलीय. पण दिलेली आश्वासने न पाळल्याची मोठी किंमत सत्ताधारी महायुतीला लोकसभा निवडणुकीत मोजावी लागली. मराठ्यांवर अन्याय करणाऱ्यांना पाडा, असे संदेशच त्यावेळी जरांगे यांनी दिला अन‌् महायुतीची खासदार संख्या ४१ वरुन थेट १७ पर्यंत घसरली. तेव्हा कुठे सरकारला जरांगेंच्या ताकदीचा अंदाज आला. गेल्या वर्षभरात मराठा आरक्षणासाठी जरांगे यांनी राज्यभर अनेक सभा घेतल्या, त्याला लाखोंच्या संख्येेने मराठा बांधवही उपस्थित होत होते. पण ही गर्दी जरांगेंचे एेकून सत्ताधाऱ्यांविरोधात एकगठ्ठा मतदान करेल याची खात्री सत्ताधाऱ्यांना नव्हती. मात्र त्यांच्या भ्रमाचा भोपळा लोकसभेत फुटला. आता विधानसभेलाही जरांगेंनी सरकारला जेरीस अाणण्याची रणनिती आखली आहे. श्रीक्षेत्र नारायण गडावर घेतलेला दसरा मेळावा हा त्याचाच एक भाग म्हणावा लागेल.

जरांगे महाविकास आघाडीला पाठिंबा देणार?

या मेळाव्याला लाखोंच्या संख्येने लोक आले होते. त्यातील बहुतांश मराठा बांधवच होते. त्यांच्यासमोर बोलताना जरांगे यांनी सरकारला शेवटचा अल्टीमेटम दिलाय. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी आम्हाला आरक्षण द्या नाही तर उलथापालथ करु, असे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याचा इशारा दिलाय. जरांगे यांनी यापूर्वीही विधानसभेला आपले उमेदवार उभे करण्याचा मनोदय बोलून दाखवला होता. पण आताचा त्यांच्या भाषणाचा टोन पाहता जरांगे उमेदवार उभे न करता पुन्हा महाविकास आघाडीच्याच उमेदवारांना पाठिंबा देऊ शकतात, अशीच चिन्हे दिसत आहेत. कारण जरांगेंनी उमेदवार उभा केला की सत्ताधाऱ्यांविरोधातील मतांचे आघाडी व जरांगेंच्या उमेदवाराला मिळणाऱ्या मतात विभाजन होेईल, त्याचा सत्ताधाऱ्यांनाचा फायदा होईल. सत्ताधाऱ्यांनाच तर हेच हवे आहे. मात्र ती संधी त्यांना जरांगे मिळू देणार नाहीत. म्हणूनच दसरा मेळाव्यात त्यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केली नाही. काही पत्ते अजूनही गुपित ठेवलेत.

अन् जरांगेंनी ठेवला सस्पेन्सच…

आचारसंहिता लागू झाल्यानंतर बैठक घेऊन पुढची रणनिती समाजाला सांगू असे त्यांनी सांगितले. पण त्यांचे सर्व डावपेच हे सत्ताधाऱ्यांविरोधातच असतील हेे लपून राहिलेले नाही. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही सत्ताधाऱ्यांना जरांगेंचा धसका बसल्याशिवाय राहणार नाही. लाखोंच्या गर्दीसमोर भावनिक होऊन जरांगे म्हणाले, ‘मला संपवण्याचे षड््यंत्र केले जात आहे. मला चारही बाजूंनी घेरले आहे. मी असो अथवा नसो समाजाची एकी ठेवा. समाजाची मुलं मोठी करा, समाज संपू देऊ नका. तुमच्या लेकरांना गुलाल लावा’ असे सांगत त्यांनी आपल्याच म्हणजे मराठा समाजाच्याच उमेदवारांना विजयी करण्याचा अप्रत्यक्ष कानमंत्रच दिला. समजणारे लोक हा संदेश समजून गेले व पुढे काय करायचे याची चर्चाही घरी परतताना गर्दीमध्ये सुुरु होती. लोक गर्दीतून म्हणत होते, निवडणूकीची भूमिका जाहीर करा. पण जरांगेंनी तो विषय सस्पेन्सच ठेवला. ‘आचारसंहिता सुरु झाल्यानंतर बैठक घेऊन मी पुढील भूमिका स्पष्ट करेल. मात्र मी जे करेल ते समाजाच्या हितासाठी असेल. समाजाला न्याय मिळावा यासाठी असेल. त्यामुळे या भूमिकेसोबत तुम्ही राहा’ असे सांगून जरांगेंनी सर्वांचीच उत्सुकता वाढवली. आता निवडणूका जाहीर झाल्यावर जरांगे प्रत्यक्ष काही भूमिका घेतात की फक्त पाडापाडीचेच संदेश फिरवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.