ज्याने मोदींचे मंदिर बांधले, त्यानेच भाजपला ठोकला रामराम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देश- विदेशात प्रचंड लोकप्रियता आहे. त्यांची कार्यपद्धती व अमोघ वक्तृत्वाचा विरोधकही आदर करतात. मोदींच्या व्यक्तीमत्वाने प्रभावित झालेल्या पुण्यातील अशाच एका कार्यकर्त्याने तीन वर्षांपूर्वी चक्क त्यांचे मंदिर उभारले होते. मात्र दरम्यानच्या काळात मोदीच्या नावाने मोठ्या झालेल्या भाजपात मात्र आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची घुसमट होत असल्याची जाणीव या कार्यकर्त्याला झाली व त्याने भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देऊन मोकळा श्वास घेतला. मोदींवर मात्र अापली निष्ठा आजही कायम असल्याचे तो सांगताे. कोण आहे हा पुण्यातील कायर्कर्ता, काय आहे त्याची खंत… जाणून घेऊया मिशन पॉलिटिक्समधून…

भाजपचा मुळ कार्यकर्ता दुर्लक्षित..!

गेली १० वर्षे केंद्रात, साडेसात वर्षे महाराष्ट्रात सत्तेत असलेला भाजप देशातील सर्वात भक्कम, सर्वाधिक सदस्य संख्या असलेला राजकीय पक्ष बनला आहे. विशेषत: मोदी पर्व सुरु झाल्यापासून या पक्षाची लोकप्रियता व जनमाणसातील स्थान अधिक बळकट झालंय. २०१४,२०१९ आणि आता २०२४ मध्ये देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांना सलग तीन वेळा पंतप्रधानपदी विराजमान केले आहे. मोदीही वेळोवेळी या यशाचे श्रेय आपले सर्वसामान्य, तळागाळातील कार्यकर्ते व मतदारांना देत असतात. पण भाजपला हे यश सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी जेवढा लाखो मतदारांचा विश्वास या पक्षाने मिळवलाय तेवढ्याच राजकीय डावपेचांची खेळीही त्यांना करावी लागलीय. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतर पक्षातील नेते, कार्यकर्त्यांना भाजपात आणणे ही खेळी. मात्र त्यामुळे झालंय काय.. की इतर पक्षातून लोक आणायचे म्हणजे त्यांना पदांची लालूच दाखवावी लागते. केंद्रात व राज्यात सत्ता असल्यामुळे छोट्या- मोठ्या पदांवर आयात नेत्यांची वर्णी भाजपला लावावी लागली. यामुळे भाजपचा मुळ निष्ठावान कार्यकर्ता मात्र दुर्लक्षित राहिलाय.

भाजपला एका राजीनाम्याने फरक पडेल का?

२०२२ मध्ये शिवसेना फोडून भाजप जेव्हा पुन्हा सत्तेवर आला तेव्हाही अनेक निष्ठावंत आमदारांना सत्तेचा वाटा, मंत्रिपदे मिळू शकली नाहीत. नंतर तर २०२३ मध्ये अजित पवार गटही भाजपने फोडला, त्यांचे ९ नेत्यांना मंत्रिपदे दिली. त्यामुळे भाजपच्या वाट्याची ही पदे निष्ठावंतांना गमवावी लागली. या उपरही १२- १३ मंत्रिपदे शिल्लक असताना भाजपने ती भरु दिली नाहीत. महामंडळांचे वाटपही शेवटच्या टप्प्यापर्यंत केले नाही. अशा अडवणुकीच्या व आयात नेत्यांना धार्जिण असणाऱ्या भाजपच्या राजकारणामुळे त्यांचा निष्ठावंत कार्यकर्ता दुखावला गेलाय. पुण्यातील अशाच एका निष्ठावंत कार्यकर्त्याने भाजपात आता ‘ठेकेदारशाही’ सुरु असल्याची खंत व्यक्त करत आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आता लाखोंची सदस्य संख्या असलेल्या भाजपमधून एखादा सदस्य गेला तर पक्षाला काय फरक पडणार आहे? असा प्रश्न तुम्हाला पडेल. पण या सदस्याची खासियत काही वेगळीच आहे… जाणून घेऊ या आपण कोण आहे हा चर्चेतील सदस्य.

मोदीभक्त कार्यकर्त्याचा भाजपवरील विश्वास उडाला!

मयूर मुंढे असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. २०२१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे औंध भागात मंदिर बांधल्यामुळे तो चर्चेत आला होता. सुमारे दीड लाख रुपये खर्च करुन व जयपूरहून खास लाल दगड मागवून या मोदींच्या चाहत्याने आपल्या लाडक्या नेत्याचे मंदिर उभारले होते. मोदी आरतीही गायला सुरुवात केली होती. त्यामुळे हा कार्यकर्ता देशभर चर्चेत आला. ‘मी मोदींचा पाठिराखा, समर्थक आहे. मी त्यांची पूजा करतो, त्यांचा आशीर्वाद घेतो. या मंदिरामुळे त्यांच्या इतर भक्तांनादेखील आशीर्वाद घेता येईल,’ अशा भावना त्यावेळी मुंढेंनी व्यक्त केल्या होत्या. मात्र याच मोदीभक्त कार्यकर्त्याचा आता आपल्या पक्षावरील विश्वास उडाल्याने त्याने तडकाफडकी पक्ष सदस्याचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे पत्राद्वारे पाठवला आहे.

मुंढेंनी मांडली व्यथा…

या पत्रात मोदीभक्त मयूर मुंढे लिहितात…’ आजवर भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी काम केलं. औंधचा वॉर्ड अध्यक्ष ते शिवाजीनगर युवा मोर्चाचा उपाध्यक्ष या प्रवासात मी पक्षासाठी राबलो. पण आता पक्षात प्रामाणिक कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत आहे. बाहेरुन आलेल्यांना पक्षात अधिक महत्त्व दिलं जात आहे…..आमचे आमदार त्यांच्या मर्जीतील लोकांच्या नियुक्त्या करत आहेत. पक्षाच्या वाढीकडे त्यांचं लक्ष नाही. प्रामाणिक कार्यकर्त्यांना पक्षात बाजूला सारलं जात आहे. बाहेरुन आलेल्यांना संधी दिली जात आहे. माजी पदाधिकाऱ्यांचे अपमान होत आहेत. त्यांना बैठकांना बोलावण्यात येत नाहीत. त्यांची मतं विचारलीही जात नाहीत. निवडणूक प्रचारातून त्यांना वगळलं जात आहे. अन्य पक्षातून आलेल्यांना निधी दिला जात आहे,’ अशा अनेक तक्रारींचा पाढा मुंढे यांनी पत्रातून मांडला आहे. आता या सामान्य कार्यकर्त्यांच्या तक्रारीची भाजप पक्ष कितपत दखल घेतो की त्यांना वाऱ्यावर सोडून देतो याकडे मुंढेंसारख्या उपेक्षित व दुर्लक्षित राहिलेल्या शेकडो कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.