उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’ बंगल्यावर आता चांगलाच उत्साह संचारलाय. शिवसेना फुटीनंतर गेली दोन- अडीच वर्षे ताणतणाव अनुभवलेल्या या वास्तूमध्ये आता विधानसभेच्या तोंडावर चैतन्य निर्माण झाले आहे. एकाच दिवशी कोकणातील भाजपचे राणे समर्थक नेते राजन तेली, पश्चिम महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे नेते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडचे भाजप नेते सुरेश बनकर यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून आपली उमेदवारी पक्की करुन घेतलीय. कालपर्यंत उद्धव सेनेतून आऊटगोईंगच सुरु होती, मात्र आता लोकसभेनंतर इनकमिंग सुरु झालंय. विधानसभेच्या तोंडावर त्याचा वेगही वाढलाय. त्यामुळे मातोश्री’वर चैतन्य निर्माण झालंय… कालपर्यंत गलितगात्र झालेल्या उद्धव सेनेकडे अचानक उमेदवारांचा इतका ओघ कसा काय वाढला? काय आहे यामागचे रहस्य…?
अर्ध्यावरचा डाव पूर्ण करण्याचा ठाकरेंचा निश्चय..
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडल्यामुळे पक्षातील ५६ पैकी ४० आमदार फुटले. त्यांना सत्तेची फळे चाखायला मिळाली. याच बंडखोरांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार हाेण्यास भाग पाडले. हा ठाकरेंसाठी मोठा धक्का होता. मात्र तो पचवत त्यांनी गेली दोन- अडीच वर्षे बंडखोरांशी व त्यांना फूस लावणाऱ्या महाशक्ती भाजपशी खंबीरपणे लढा सुरुच ठेवला. उद्धव ठाकरेंचे सरकार दगाफटका करुन पाडल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेच होते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांपेक्षा ठाकरेंप्रती मतदारांमध्ये मोठी सहानुभूती आहे. लोकसभेला त्याची प्रचिती आली. उद्धव ठाकरेंमुळे महाविकास आघाडीचे नशिबच उजळले. ठाकरेंनी २१ जागा लढवून त्यांचे फक्त ९ खासदार निवडून आले. मात्र ही संख्या घसरणीला लागलेल्या महाशक्ती भाजपच्या बरोबरीची होती. त्यामुळे स्वत:चे खासदार फारसे वाढले नसले तरी भाजपचे कमी करण्यात ठाकरे यशस्वी झाले. अन् ठाकरेंच्या सहानुभूतीचा अप्रत्यक्षपणे काँग्रेसला चमत्कारिकपणे फायदा झाला. त्यांचे सर्वाधिक १३ खासदार निवडून आले. शरद पवारांचा पक्षही कमी- अधिक प्रमाणात ठाकरेंच्या सहानुभूतीचा लाभार्थी ठरलाय. उद्धव सेनेला लोकसभेत तसा फारसा रस नव्हता. मात्र आता विधानसभेत त्यांनी संपूर्ण जोर लावून काम सुरु केले आहे. एक तर बंडखोरांना आस्मान दाखवायचा हा त्यांचा पहिला निर्धार आहे. आणि दुसरे म्हणजे शिंदेंच्या विश्वासघातामुळे मुख्यमंत्रिपदाचा जो अर्ध्यावरची डाव सोडण्याची वेळ आली होती, तो पुन्हा एकदा पूर्ण करण्याचा ठाकरेंचा निश्चिय आहे. नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यात आपल्या २०१९ च्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीचा व्हिडिओ जारी करुन ठाकरेंनी हा मनोदय जनतेसमोरही मांडला आहे.
ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा शब्द कोणाकडून?
महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण? यावरुन वाद होत असले तरी त्यात समेट घडवून आणण्याचे तिन्ही पक्षांचे प्रयत्न होत आहेत. लोकसभेत सक्सेस रेट चांगला असलेल्या काँग्रेसला विधानसभेला सर्वाधिक जागा देण्याची तयारी ठाकरेंनी दाखवली आहे. मात्र उद्या सत्ता आलीच तर मुख्यमंत्री मात्र आपणच राहणार हे गांधी परिवाराच्या गळी उतरवण्यात ते यशस्वी झाल्याचे सांगितले जाते. शरद पवारांचीही त्यांनी यासाठी संमती मिळवलीय. प्रदेश काँग्रेसने कितीही विरोध केला तरी मविआची सत्ता आल्यास ठाकरेच मुख्यमंत्री होणार असा शब्द गांधी परिवाराने त्यांना दिल्याचे सांगितले जाते. भलेही त्यांना मुख्यमंत्रिपद अडीच वर्षासाठी मिळू शकेल, पण ते मिळणार हे नक्कीच. ही गोपनीय खबर आता सर्वच राजकीय पक्षांमध्ये पसरली आहे. म्हणूनच भाजप, अजित पवार गटात नाराज असलेले, उमेदवारी मिळणार नसल्याची खात्री पटलेले कुंपनावरचे नेते आता उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून घेण्यास आतूर झालेले अाहेत. आपल्या मतदारसंघातील उमेदवारी फिक्स करुनच हे नेते मशाल हाती घेत आहेत. सांगोल्याचे दीपक साळुंखे शिवसेनेचे बंडखोर शहाजी बापू पाटील यांच्याशी लढणार आहेत. सिल्लोडचे सुरेश बनकर बंडखोर अब्दुल सत्तारांशी दोन हात करणार आहेत. यापूर्वी बनकर यांनी भाजपच्या तिकिटावर तीन वेळा सत्तारांशी लढा दिला पण अपयशी ठरले. यावेळी त्यांच्या मागे उद्धव ठाकरेंची ताकद असल्याने त्यांचा उत्साह वाढलाय.
शिंदे गटाच्या आमदारांसाठी मातोश्रीची दारे बंद?
तळकोकणात राणेंसोबत शिवसेना सोडून गेलेले राजन तेली १९ वर्षानंतर पुन्हा स्वगृही परतलेत. राणेंसोबत गेल्याच्या चुकीची त्यांना जाणीव झालीय. आता सावंतवाडीत बंडखोर दीपक केसरकर यांना आस्मान दाखवण्यासाठी अंगाला तेल लावून राजन मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत अजूनही बरेच नेते उद्धव सेनेत येतील. एकनाथ शिंदेंसोबत गेलेले काही बंडखोर नेतेही ‘मातोश्री’च्या आशीर्वादासाठी आसुसलेले आहेत. पण काहीही झाले तरी दगा देणाऱ्यांना जवळ करणार नाही, असे ठाकरेंनी यापूर्वीच ठणकावले आहे. त्यामुळे किमान या निवडणुकीत तरी शिंदे गटाच्या एकाही आमदाराला ठाकरे मातोश्रीची दारे उघडणार नाहीत, ही काळ्या दगडावरची रेष आहे. याउलट अडचणीच्या काळातही जे १५ आमदार ठाकरेंसोबत राहिले त्यांना उमेदवारी यादीची वाट न पाहता कामाला लागल्याचे अादेश उद्धव यांनी दिले आहेत.
आमदारांच्या निष्ठेने ठाकरेंचे बळ वाढले…
हृदयविकाराच्या त्रासामुळे उद्धव ठाकरे मध्यंतरी दोन-तीन दिवस रुग्णालयात होते. डिस्चार्जनंतरही त्यांना घरी सक्तीने आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. याकाळात निष्ठावान १५ आमदारांची आदित्य ठाकरेंनी बैठक घेऊन त्यांना एबी फॉर्मचे वाटपही केले. पण निष्ठावंत म्हणाले, उद्धव साहेब बरे झाल्यावरच एबी फॉर्म नेऊ. त्यांच्या या निष्ठेने उद्धव ठाकरेंचे बळ वाढलेय अन् चारच दिवसांत अंथरूणावरुन उठून त्यांनी पक्षप्रवेशाचा धडाका लावलाय… त्यामुळे शिंदेसेनेसह महायुतीच्या गोटात मात्र खळबळ माजलीय. बघू या उद्धव सेनेत वाढलेली ही आवक मशालीचा विधिमंडळात प्रकाश पाडण्यात कितपत यशस्वी होईल? ते २३ नोव्हेंबरला कळेलच.