शिंदे सेना, उद्धव सेनेच्या उमेदवारांमुळे अमित ठाकरे अडचणीत

लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभेला मात्र वेगळी चूल मांडलीय. ही निवडणूक ते स्वबळावर लढवत आहेत. त्यासाठी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच ४५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात राज ठाकरेंचे पूत्र अमित यांचाही समावेश आहे. ते माहिम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. दुसरीकडे शिंदे सेना व उद्धव सेनेनेही या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे तिरंगी लढतीत अमित ठाकरेंच्या विजयाची कितपत शक्यता आहे.

अमित यांचे नाव जाहीर…

राज ठाकरे यांच्या मनसेचा २०१९ मध्ये फक्त एकच आमदार निवडून आला होता. गेल्या दोन लोकसभेच्या निवडणुका हा पक्ष लढलेलाच नाही. त्यामुळे मनसैनिकांतील उत्साह हळूहळू कमी हाेत आहे. आता मात्र विधानसभेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याची घोषणा राज ठाकरेंनी केलीय. त्यादृष्टीने ते कामालाही लागले आहेत. पहिल्या यादीत त्यांनी दोन उमेदवारांची घोषणा केली होती. आता दुसऱ्या यादीत ४५ नावे जाहीर केली. यात अमित राज ठाकरे हे एक लक्षवेधी नाव आहे. म्हणजे अमित यांच्या रुपाने ठाकरे घराण्यातील दुसरा नातू थेट लोकांमधून निवडणूक लढवत आहे. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यात कधीच निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली होती. पण त्यांनी आपल्या या प्रतिज्ञेत कुटुंबीयांना कधीच अडकवून ठेवले नव्हते. त्यामुळे २०१९ मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री हेाण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी बाळासाहेबांच्या प्रतिज्ञेच्या बंधनात न अडकता सक्रीय राजकारणात येऊन राज्याचे प्रमुखपद स्वीकारणे पसंत केले. विधिमंडळाच्या नियमानुसार सहा महिन्यात त्यांना विधानसभा किंवा विधान परिषद यापैकी एका सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक होते. ठाकरेंसाठी अनेक आमदार विधानसभेचा राजीनामा द्यायला तयार होते. पण उद्धव यांनी विधान परिषदेवर थेट जाणे पसंत केले.

उद्धव सेनेच्या तुलनेत मनसेची ताकद किती…

तत्पूर्वी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे घराण्यातील पहिला उमेदवार म्हणून आदित्य यांनी वरळीतून निवडणूक लढवण्याचे धाडस दाखवले. त्यांच्यासाठी उद्धव यांनी अनेक तडजोडी केल्या, बेरजेचे राजकारण केले व आदित्य यांना निवडून आणले. मंत्रीही केले. त्यावेळी मनसेनेही आदित्य यांच्याविरोधात उमेदवार उभा केला नव्हता. आता राज ठाकरेंचे पूत्र अमित माहिम मतदारसंघातून विधानसभा लढवणार आहेत. उद्धव सेनेच्या तुलनेत मनसेची ताकद फारच तोकडी, पण तरीही राज यांनी आपल्या मुलाला मैदानात उतरवण्याचे धाडस केले आहे. अर्थात त्यासाठी त्यांनी पडद्याआड काही तरी तडजोडी केल्या असतील यात शंकाच नाही. सध्या माहिम मतदारसंघात शिवसेनेचे सदा सरवणकर हे आमदार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यावर त्यांनी शिंदे गटात जाणे पसंत केले. शिंदेसेनेने आता त्यांनाही उमेदवारी जाहीर केलीय. म्हणजे माहिममध्ये सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे यांची लढत होणार अशी शक्यता आहे.

माहिममध्ये तिरंगी लढत?

अमित यांच्याविरोधात उद्धव ठाकरे उमेदवार देणार का? २०१९ मध्ये राज यांनी आदित्य ठाकरेंना जे सहकार्य केले त्याची परतफेड उद्धव करणार का? असे प्रश्न विचारले जात होते.या संदर्भात खासदार संजय राऊतांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी, माहिम हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला अाहे. त्यामुळे आम्ही उमेदवार देणारच असे ठणकावून सांगितले आहे. त्याच वेळी दादर – माहीमचे विभागप्रमुख महेश सावंत यांना उद्धव सेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता माहिममध्ये तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले अाहे. यात अमित समोर मोठे आव्हान आहे. पण उद्धव ठाकरे अखेरच्या क्षणी काय निर्णय घेतात ते महत्वाचे आहे. जर एकनाथ शिंदे अमित यांच्याविरोधातील सदा सरवणकर यांना माघार घेण्यास राजी झाले तरच अमित व उद्धव सेनेत लढत होऊ शकते. शिंदेसेनेची ताकद पाठीशी असल्याने अमित यांचा मार्ग सुकर होऊ शकताे. मात्र सदा सरवणकर व महेश सावंत दोघेही मैदानात राहिले तर मात्र अमित यांच्यासमोर मोठे आव्हान असेल.

महायुतीचे नेते अमित यांचा मार्ग सुकर करणार?

शिंदे व राज ठाकरे यांचे संबंध पाहता महायुतीचे नेते अमित यांचा मार्ग सुकर करतील याविषयी शंका नाहीच. पण उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे त्यांचेही लक्ष असेल. २०१९ मध्ये मनसेने जसे आदित्य यांना पाठिंबा दिला तसाच पाठिंबा उद्धव काका आपले पुतणे अमित यांना देतात की भाऊबंदकीचा रोष मनात ठेऊन अमित यांना पराभवाचा धडा शिकवतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पत्रकार परिषदेत अमित ठाकरे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. ते म्हणाले, ‘साहेबांना मी स्वत: सांगितलं की माझ्यासाठी जागांची तडजोड करू नका. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या. राज ठाकरे ठाम भूमिका घेतात. ती उपकाराची भावना नसते. राज साहेबांनी लोकसभेच्या वेळी काही उमेदवारांसाठी सभा घेतल्या, पण त्यांनी परतफेड करावी अशी आमची इच्छा नाही …असे सांगून अमित यांनी कुणाकडूनही बिनशर्थ पाठिंब्याच्या उपकाराची गरज नसल्याचे संकेत दिले.