पूर्वी महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे, विलासराव देशमुख अशा एकापेक्षा एक अनेक फर्ड्या वक्त्यांची भाषणं एेकायला मजा यायची. यातून करमणूक तर व्हायचीच पण काही विचारही मिळायचे. पण आता त्या तोलामोलाचे वक्ते राहिलेले नाहीत. फक्त एकमेकांवर आरोपांची चिखलफेक करण्यातच ही नेतेमंडळी धन्यता मानत आहे. एकनाथ शिंदे यांचे उठावाचा इतिहास उगाळणे अजून संपलेले नाही तर उद्धव ठाकरे अजून गद्दारी व अफझलखानाच्या इतिहासातून बाहेर पडू शकलेले नाहीत. या सर्वांच्या गर्दीत फक्त एकमेव नेता असा आहे की जो वास्तवावर आधारित व जनतेच्या मनातील प्रश्नांना हात घालून भाषण देतोय, तो म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे. त्यांच्या भाषणातील मुद्दे सर्वांनाच पटतात. पण हा नेता जेवढा बोलतो त्याच्या एक टक्काही कृती करत नाही. निवडणुका संपल्या की तो पुन्हा अज्ञातवासात जाऊन रमतो, त्यामुळे राज ठाकरेंवरही अाता जनतेचा पूर्वीसारखा विश्वास राहिलेला नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान.. अशा अविर्भावात वावरणारे राज ठाकरे यांनीही कसा लोकांचा अनेकदा विश्वासघात केलाय ते जाणून घेऊ या… मिशन पॉलिटिक्समधून…
विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच प्रचार सभेत राज ठाकरे यांनी सामान्य लेाकांच्या मनात ज्या पक्ष फाटाफुटीवरुन संताप आहे त्या मुद्द्याला हात घातला. कालपर्यंत जे लोक एकमेकांवर आरोप करत होते, ते आज सत्तेत एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत हे सांगताना त्यांनी उद्धव ठाकरे- काँग्रेस, अजित पवार- भाजप अशा काही अभद्र युतींची उदाहरणे दिली. फोडाफोडीचं राजकारण आधीपासून सुरु आहे, पण प्रकरण आता पुढे गेले, पण आता पक्ष, नाव, निशाणी ताब्यात घ्यायची. असं तर मी कधी बघितलं नव्हतं, असं राज ठाकरे म्हणाले. पूर्वी गद्दारी करणारे मान खाली घालून जायचे आता या लोकांना काही वाटत नाही , असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांनी स्वत:च्या कष्टाने जो पक्ष उभारला, वाढवला तोच पक्ष व चिन्ह एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी पळवल्याचा प्रहारही राज ठाकरेंनी केला. अशा लोकांच्या तावडीतून महाराष्ट्र सोडवा आणि माझ्या ताब्यात द्या.. मी महाराष्ट्राला सुतासारखा सरळ करतो, असे राज ठाकरे आवाहन करतात. सामान्य लोकांनही ते पटते.. पण आज जे बोलतात ते राज ठाकरे उद्या कृतीत आणतील याविषयी त्यांना खात्री नाहीए.
राज ठाकरेंचे फासे पडले उलटे…
२०१९ च्या निवडणुकीत राज ठाकरेंनी मोदीविरोधी भूमिका घेतली. लाव रे तो व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी भाजप व मोदींच्या चुकलेल्या निर्णयावर प्रहार केले. त्याचा आघाडीला अप्रत्यक्ष फायदा होईल असे त्यांना वाटत होते. विशेष म्हणजे या निवडणुकीत मनसेने लोकसभेत उमेदवारही उतरवले नाहीत. मग लोकांची इच्छा असूनही त्यांनी मते द्यायची कुणाला? म्हणजे आघाडीला अप्रत्यक्ष सहकार्य करण्याची भूमिका तेव्हा राज ठाकरेंनी घेतली होती. जनतेला ते पटले नाही त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा भाजप- शिवसेना युतीला कौल मिळाला. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा पलटी मारत राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. देशाच्या विकासासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगत त्यांनी आपल्या कोलांटउडीवर पांघरुन घातले. यावेळीही त्यांनी मनसेचे उमेदवार दिले नाहीत. एकही उमेदवार देण्याची धमक नसलेल्या पक्षप्रमुखाच्या आवाहनाला जनता कितपत पाठिंबा देईल? यावेळी राज ठाकरेंचे फासे उलटे पडले. त्यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला अन् आघाडीचे जास्त खासदार निवडून आले. याचाच अर्थ राज यांच्या बोलण्यावर आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही.
भाजपशी छुपे साटेलोटे उघड…
बदललेल्या वाऱ्याची दिशा ओळखून विधानसभेला राज ठाकरेंनी स्वबळावर २२५ मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची घोषणा केली. मात्र त्यांना उमेदवार शोधण्यासाठीच धावाधावा करावी लागली. त्यातही भाजपशी छुपे साटेलोटे आता उघड होऊ लागले आहे. काही मतदारसंघात मनसेने भाजपला तर भाजपने मनसेला पाठिंबा दिलाय. मग तडजोडीच्या राजकारणावर टीका करणाऱ्या राज ठाकरेंनी कोणाला विचारुन भाजपला पाठिंबा दिला? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. टोल नाका आंदेालन असो की मराठी भाषेला राजभाषा दर्जा देण्याची मागणी असो… या मागण्या आपल्यामुळे मान्य झाल्याचे सांगत राज ठाकरे आपली पाठ थोपटून घेत असले तरी हे निर्णय महायुती सरकारने आपल्या राजकीय सोयीसाठी घेतलेले आहेत. मराठी माणसाच्या हिताच्या कायम गप्पा ठोकणारे राज ठाकरे आपल्याच भावाच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाची गोची करण्यासाठी भाजप व शिंदेसेनेला कसे अप्रत्यक्ष सहकार्य करुन ‘घरभेदी’पणा करत आहेत हेही जनतेपासून लपून राहिलेले नाही.
राज ठाकरेंवर जनतेने विश्वास का ठेवावा?
अडीच वर्षापूर्वी राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याविरोधात मोठे आंदेालन उभारले. भोंगे बंद होणार नसतील तर आम्ही हनुमान चालीसा लावू, अशी स्टंटबाजी केली. पण झाले काय. महिनाभरातच राज ठाकरेंचे आंदोलन थांबले व भोंगे मात्र अजूनही वाजणे सुरुच आहे. आता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना भोंग्याची आठवण आली. अमरावतीच्या सभेत त्यांनी तसे बोलून दाखवले. पण राज्य सरकारकडून जनतेला काय अपेक्षित आहे.. भोंगा बंदी की विकास, रोजगार… हे जाणून घेण्याची तसदीही त्यांनी कधी घेतली नाही. राजकीय नेत्यांच्या डोक्यावर बर्फ व तोंडात साखर हवी, असे म्हणतात. पण कायमच गरम असलेले डोके व फटाक्यासारखी वाजणारी वाणी यामुळे राज ठाकरे कुणालाही आपलेसे वाटत नाहीत. करमणूक म्हणून त्यांची भाषणे लोक एेकतात पण ज्या गोष्टी ते बोलतात ते कृतीत आणतीलच याचा विश्वास नसल्याने लोक त्यांना मते देण्यास धजावत नाहीत. आताही राज यांनी १५०- २०० मतदारसंघात उमेदवार उभे केले असले तरी त्यापैकी निवडून येण्याची क्षमता किती जणांमध्ये आहे? हा प्रश्न आहे. उद्धव सेनेला पराभूत करण्यासाठी राज ठाकरेंचा उपयोग करुन घेतला जात आहे, हे न कळण्याएवढे ते अडाणी नक्कीच नाहीत. मात्र याची पुरेपुर किंमत वसूलही करण्याची हुशार त्यांच्याच आहे हे लपून राहिलेले नाही. मग इतरांवर स्वार्थी राजकारणाचे आरोप करणाऱ्या राज ठाकरेंवर तरी जनतेने विश्वास का ठेवावा? हा प्रश्न आहेच.