युवकांना राजकारणात येण्याचे निमंत्रण देऊन मोदींचे तरुणांना उमेदवारीचे संकेत

नाशिक  : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी १२ जानेवारी रोजी नाशिकमध्ये युवक मेळाव्याच्या निमित्ताने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगूलच फुंकला. गेल्या १० वर्षात भारताला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण काय काय केले, याची उजळणी करताना मोदींनी आता देशाला महाशक्ती बनवण्यासाठी युवकांना साद घातली. राजकारणातील घराणेशाही संपवायची असेल तर युवकांनी मोठ्या संख्येने राजकारणात यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यातूनच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात युवा चेहऱ्यांना उमेदवारी देण्यास भाजपतर्फे प्राधान्य दिले जाईल असे संकेत मोदींनी (Narendra Modi) दिल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

राममंदिर.. अयोध्या ते नाशिक

सध्या अयोध्येतील राम मंदिर जगभर चर्चेत आहे. २२ जानेवारी रोजी तिथे पंतप्रधान मोदींच्या हस्ते श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी देशभर वातावरण निर्मिती करण्यात भाजपला यश आले आहे. मात्र एवढ्यावरच न थांबता महाराष्ट्रात अप्रत्यक्ष प्रचाराची सुरुवात करण्यासाठी मोदींनी (Narendra Modi) प्रभू श्रीराम यांच्या सहवासाने पावन झालेल्या नाशिकभूमीचीच निवड केली. येथील एेतिहासिक काळाराम मंदिरात येऊन मोदींनी अभिषेक, पूजपाठ केला. भजनी मंडळींसोबत भजन गायले, टाळही वाजवला. एकूणच संपूर्ण धार्मिक वातावरण निर्माण झालेले असताना मोदींनी प्रभू श्रीरामचंद्रांसमोर ‘अखंड भारता’चा संकल्प करुन सर्व भारतवासियांच्या देशभक्तीच्या भावनेलाही हवा दिली. इतकेच नव्हे तर २२ जानेवारी प्राणप्रतिष्ठेपर्यंत ११ दिवसांचे अनुष्ठान करण्याचा निर्णयही मोदींनी (Narendra Modi) नाशिकच्या मंदिरातून जाहीर करत सर्व रामभक्तांचे लक्ष वेधले.