पुणे : इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांची अॉनलाईन बैठक १३ जानेवारी रोजी पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यात सहभाग नोंदवला. इंडिया आघाडीचे नेतृत्व मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे देण्यावर बैठकीत अनेकांनी सहमती दर्शवली. तर संयोजकपदाची जबाबदारी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना देण्याची सूचनाही करण्यात आली. पण नितीश यांनी नकार दिल्याने याबाबत निर्णय झाला नाही. मात्र लवकरच लोकसभेसाठी इंडिया आघाडीचे जागावाटप करण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरले, अशी माहिती शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पवार म्हणाले की, इंडिया आघाडीची एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. पंतप्रधान पदाच्या चेहऱ्यावर मात्र तूर्त निर्णय झाला नाही. १९७७ च्या निवडणुका झाल्या तेव्हा आम्ही पंतप्रधानपदाचा चेहरा आधीच घोषित केला नव्हता. निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीत ज्या पक्षाची लोकांनी निवड केली त्या पक्षाने मोरारजी देसाई यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली. निवडणुकीपूर्वी कोणाचाही चेहरा प्रोजेक्ट केला नव्हता, तरीदेखील तेव्हा आम्ही निवडणूक जिंकलो. कारण तेव्हा लोकांमध्ये आणीबाणीविरोधात तीव्र भावना होत्या. त्या लक्षात घेऊन आम्ही मते मागितली आणि लोकांनी मतं दिली. आताही तशीच परिस्थिती आहे. आम्हाला कोणालाही प्रोजेक्ट करण्याची आवश्यकता नाही.’