बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात रोज नवीनवीन खुलासे होऊ लागले आहेत. दोन कोटीची खंडणी व या खून प्रकरणातील सात संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून काही माहिती समोर येत आहेच. पण भाजपचे आमदार सुरेश धस हेही मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड व मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील संबंधाबाबत नवनवीन गौप्यस्फोट करत आहेत. आवादा पवनचक्की कंपनीला खंडणी मागण्याचा आराेप मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मीक कराडवर आहे. ही खंडणी मागणीची बैठक मंत्री धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील सरकारी बंगल्यावर झाल्याचा गौप्यस्फोट तारखेसह धस यांनी पुण्याच्या जाहीर सभेमधून केलाय.. त्यामुळे आता मुंडेंच्या अडचणीत वाढ झालीय आहे. या प्रकरणामुळे फडणवीस सरकारची प्रतिमा मलिन होत अाहे. त्यामुळे धनंजय मुंडेंचे मंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता प्रश्न आहे हे की नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे स्वत: राजीनामा देतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना पदच्यूत करतात.. याबाबत अधिक माहिती घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून…
एकही शब्द खोटा ठरल्यास धसांचा राजकारणातून संन्यास..!
सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षाचे आमदार असूनही सुरेश धस कुठलीही भीडभाड न ठेवता आपल्याच सरकारमधील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण व आवादा कंपनीला दोन कोटीची खंडणी मागितल्याचे प्रकरण या दोन्ही घटनांमध्ये मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मीक कराडच्या सहभागाचा संशय व्यक्त होत आहे. सध्या कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल असून तो सीआयडीच्या ताब्यात आहे. मात्र देशमुख हत्याप्रकरणात त्याच्या सहभागाचीही चौकशी केली जात आहे. कराडसह एकूण सात जण आतापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत. हे मुळ प्रकरण सुरु झाले ते आवादा कंपनीला मागितलेल्या खंडणीपासून. आधी तीन कोटींची खंडणी या कंपनीला मागण्यात आली होती, पण नंतर धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत दोन कोटीत सेटलमेंट करण्यात आली, त्यातील ५० लाख रुपये कराडला देण्यात आल्याचा गौप्यस्फोट आमदार सुरेश धस यांनी पुण्याच्या सभेत केला. विशेष म्हणजे ही बैठक १९ जून २०२४ रोजी धनंजय मुंडे यांचा मुंबईतील सरकारी बंगला ‘सातपुडा’ येथे झाल्याचा दावाही धस यांनी केलाय. धस आपल्या आरोपवर इतके ठाम आहेत की जर यातील एक शब्दही खोटा निघाला तर आपण राजकारण सोडू, असे आव्हानही त्यांनी दिले आहे. विशेष म्हणजे आमदार धस यांनी आरोप करुन २४ तास उलटले तरी अद्याप मुंडे यांच्याकडून त्यावर कुठलीही स्पष्टीकरण किंवा खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे हे आरोप खरेच आहेत की काय? अशी शंका उपस्थित करण्यास वाव आहे.
जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट…
मंत्र्यांच्या बंगल्यावरुनच असे खंडणी वसूलीच्या वाटाघाटी चालत असतील तर पारदर्शी कारभाराच्या गप्पा मारणारे फडणवीस यांचे सरकार करतंय तरी काय? गृहमंत्रीपद आपल्याकडेच ठेवून घेण्याचा हट्ट करणाऱ्या फडणवीस यांचे आपल्या सरकारमधील अशा मंत्र्यांच्या कुकृत्याकडे लक्ष आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता दुसरा गंभीर प्रकार याच गृहमंत्रालया अंतर्गत येणाऱ्या पोलिस खात्यातील आहे. सरपंच देशमुख हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी सरकारने एसआयटीची स्थापना केली. या समितीचे प्रमुख असलेले एक आयपीएस अधिकारी बाहेरगावचे आहेत. पण त्यांच्या हाताखाली काम करणारे काही अधिकारी तर बीडमधीलच आहेत. आणि या पोलिसांचे वाल्मीक कराडशी जवळचे संबंध आहेत. अगदी धनंजय मुंडेंच्या विजयी मिरवणूकीत कराड व एसआयटीतील अधिकारी महेश विघ्ने हे एकमेकावर गुलाल उधळून मुंडेंच्या विजयाचा आनंद साजरा करत असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेची छायाचित्रे प्रकाशित करुन केला आहे. तर बीड एलसीबीत १० वर्षांपासून ठाम मांडून बसलेला मनोजकुमार वाघ नावाचा पोलिस हवालदारही कराडचा समर्थक असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. एसआयटी व बीड पोलिस दलात असे वाल्मीक कराडचे समर्थक पोलिस अधिकारी व कर्मचारी असतील तर त्याच्यावर कारवाई होण्यापेक्षा त्याला अभयच मिळण्याची दाट शक्यता असल्याचा संशय आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.
अंजली दमानिया यांना खुलेआम धमक्यांचे फोन..!
आता याच प्रकरणात तिसरी एक घटना घडलीय. देशमुख हत्याकांड प्रकरणात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना खुलेआम दररोज ७०० ते ८०० धमकीचे फोन कॉल्स येऊ लागले आहेत. हे सर्व जण मुंडे यांचे समर्थक असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. मुंडेंविरोधात न बोलण्यासाठी त्यांना या धमक्या दिल्या जात आहेत. फडणवीस यांचे गृहखाते या धमक्यांच्या कॉल्सची गांभीर्याने नोंद घेणार आहे की नाही? आता तर मृत संताेष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनाही धमक्या येत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. एकूणच बीडमधील हे प्रकरण आता गंभीर वळणावर आहे. ज्यांनी देशमुख हत्याप्रकरणात आवाज उठवलाय, त्यांच्या जिवालाही धोका होऊ शकतो काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत एक पत्र पाठवून या लोकप्रतिनिधींच्या व इतर नेत्यांच्या सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी केली आहे. एवढ्या गंभीर प्रकरणात नाव येऊनही धनंजय मुंंडे स्वत:हून नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देत नाहीयत. मुख्यमंत्री फडणवीसही त्यांचा राजीनामा घेण्याचे धाडस दाखवत नाहीत. त्यामुळे आता विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने थेट राज्यपालांना साकडे घातले आहे. मुंडे मंत्रिमंडळात राहिले तर देशमुख हत्येच्या तपासात ते सत्तेचा गैरवापर करुन हस्तक्षेप करु शकतात, त्यामुळे त्यांची त्वरित हकालपट्टी करावी, अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आलीय.
फडणवीसांचे सरकार खंडणीखोरांच्या ‘आकां’ना संरक्षण देतंय?
उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यास तयार नाहीत. इतकेच काय राज्यभर आक्रोश होत असताना ते या विषयावर एक शब्दही बोलण्यास पुढे आलेले नाहीत. विधिमंडळ अधिवेशन सुरु असताना एक दिवस देशमुख यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधण्यापुरते मस्साजोगमध्ये अजित पवार गेले. मात्र तिथेही त्यांनी धनंजय मुंडेंचे नाव घेणे टाळले. तेथील ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तर देणेही टाळले. धनंजय मुंडे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा अजित पवार घेणार नाहीत. पण या प्रकारामुळे मोठ्या बहुमताने आलेल्या फडणवीस सरकारच्या प्रतिमेला मात्र तडे जात आहेत. खंडणीखोरांचे संरक्षण करणारे नेतेच जर फडणवीसांच्या मंत्रिमंडळात राहिले तर त्यांच्याकडून कायदा व सुव्यवस्थेची अपेक्षा कशी करणार? हा महाराष्ट्राला प्रश्न आहे. फडणवीस स्वत: पारदर्शी कारभार करणारे व न्यायासाठी लढणारे नेते म्हणून परिचित आहेत. त्यामुळे त्यांनी आता मित्रपक्षांच्या कुठलाही दबावाला भीक न घालता थेट धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचा आदेश द्यावा किंवा त्यांना पदमुक्त करावे. असे केले तरच या सरकारवर जनतेचा विश्वास राहिल अन्यथा फडणवीसांचे सरकार खंडणीखोरांच्या ‘आकां’ना संरक्षण देतंय, असाच मेसेज जनतेत गेल्याशिवाय राहणार नाही.