अलिबाग : ‘मोठमोठ्या प्रकल्पांच्या नावाखाली मराठी माणसांच्या जमिनी कवडीमोल दरात विकत घेतल्या जात आहेत. तुमच्याकडे जमिनीच नसतील तर तुम्ही कुठले नागरिक आहात? राज्यभरातील मराठी भूमिपूत्रांच्या जमिनीवर असे परकीय आक्रमक सुरु आहे, याबद्दल वेळीच जागे व्हावा,’ असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी १५ जानेवारी रोजी अलिबागमधून केले.
स्थानिक पदाधिकाऱ्यांशी व माध्यमांशी बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, ‘केंद्र सरकारचा एखादा प्रोजेक्ट येतो. मात्र तोपर्यंत एखादा परकीय गुंतवणूकदार १ रुपयाने तुमच्या जमिनी घेतो व हजार रुपयाने राज्य किंवा केंद्र सरकारला विकतो. भूमिपुत्रांच्या हक्काचे हे पैसे तिसरेच कुणीतरी लाटत आहे. असेच होत राहिले तर मराठी माणूस देशोधडीला लागेल. पुढच्या पिढ्यांचा विषयच संपून जाईल,’ अशी भीती राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
‘पूर्वी हिंजवडी घ्या किंवा एक्स्प्रेस वे घ्या की ट्रान्सहर्बर घ्या. तेथील लोक जमिनी विकून बर्बाद झाले. फक्त पुणे किंवा रायगड जिल्ह्यापुरते हे उदाहरण नाही. ठाणे, रत्नागिरी, पालघर अशा अनेक जिल्ह्यात हेच चित्र आहे. सर्वत्र जमिनी पोखरल्या जात आहेत,’ याकडेही राज (Raj Thackeray) यांनी लक्ष वेधले.
दलालांना इशारा
राज (Raj Thackeray) म्हणाले, ‘मला कल्पना आहे जमीन तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे. ती विकायची की नाही हा निर्णय तुमचाच आहे. पण तुम्हाला त्याचा योग्य मोबदला मिळतोय का ते पाहा? की तुमच्या जमिनी विकून परप्रांतीय गब्बर होत आहेत? हे पैसे कुणाच्या घशात जात आहेत ते मराठी माणसाने पाहावे. आज या भागात जे कुणी दलाल फिरत आहेत त्यांनाही माझे सांगणे आहे तुम्ही ज्यांच्या जमिनी घेत आहात त्या मराठी माणसांची तुम्हीही काळजी घेतली पाहिजे.