मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपप्रमाणेच काँग्रेसनेही आघाडी घेतली आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नागपूरातून प्रचाराचा शुभारंभ केल्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कर्नाटक, तेलंगणात सत्ता आल्याने, कसाब पेठची निवडणूक जिंकल्याने कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झालाय. दुसरीकडे वरिष्ठ नेते मात्र पक्षफुटीच्या भीतीने चिंताग्रस्त आहेत. नुकतेच मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे वडिल मुरली देवरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. सुमारे ५२ वर्षांपासून देवरा कुटुंबीय गांधी घराण्याशी एकनिष्ठ होते. मात्र हे ५ दशकांचे नाते मिलिंद यांनी एकाच रात्रीत तोडले. लोकसभेत दोनदा पराभव झाल्यानंतर पक्षाने आपल्याला राज्यसभेत संधी दिली नाही, हा त्यांचा राग होता. देवरांपाठोपाठ अजून किती नेते जाणार, ही धास्ती काँग्रेसला वाटतेय.
गेल्या वर्ष- दीड वर्षात भाजपने शिवसेना व राष्ट्रवादीत मोठी फूट पाडून महाराष्ट्रात सत्ता काबिज केली. आता लोकसभा निवडणुकीपूर्वी अजुन एक भूकंप होणार, असे भाकित भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी नुकतेच वर्तवले आहे. त्यामुळे आता काँग्रेसचाच नंबर, अशी चर्चा सुरु झालीय. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), माजी मंत्री सतेज पाटील (Satej Patil) हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या वावड्या अनेक महिन्यांपासून उठवत आहेत. हे नेते मात्र त्याचे खंडन करतात. त्यातच चार दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी आपल्याला व मुलगी आमदार प्रणिती (Praniti Shinde) यांना भाजपमधून ऑफर होती, असा गौप्यस्फोट केल्यामुळे अजूनही ‘फोडाफोडी’च्या (Split in Maharashtra Congress) हालचाली थांबलेल्या नसल्याचे स्पष्ट होते. किंबहुना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्या अधिक गतिमान होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच काँग्रेस हायकमांड व राज्यातील नेतृत्व चिंतेत आहे.
एकमेकांवर वाढतोय संशय (Distrust In Congress leaders)
महाराष्ट्र काँग्रेसचे नूतन प्रभारी रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) हे विदर्भ दौऱ्यावर असताना पक्षातील हालचालींची माहिती त्यांना देण्यात आली. त्यावर ‘ज्यांना पक्ष सोडून जायचे आहे त्यांनी लगेच जावे’ असा इशारा देऊन चेन्निथला यांनी कुंपनावरील नेत्यांना अलर्ट करण्याचा प्रयत्न केला. या वातावरणामुळे पक्षांतरासाठी कायम चर्चेत असलेले अशोक चव्हाणांसारख्या ज्येष्ठ नेत्यांकडे पुन्हा सगळे जण संशयाने पाहू लागले आहेत. मात्र खरंच अशी ज्येष्ठ नेतेमंडळी भाजपकडे गेली तर गेल्या वेळी महाराष्ट्रात फक्त एकच खासदार निवडून आणू शकलेल्या काँग्रेसवर आणखी किती नामुष्की ओढावू शकते हे पक्षनेतृत्वही जाणून आहे. त्यामुळे प्रभारींनी कडक इशारे देण्यापेक्षा या अस्वस्थ नेत्यांच्या भावना समूजन घेणे गरजेचे आहे, असे कार्यकर्त्यांना वाटते.
पक्षांतर्गत वाद बंडाळीचे कारण (Disput in congress)
२०१४ च्या निवडणुकांपासून काँग्रेस देशातच गलितगात्र झाली. महाराष्ट्रही त्याला अपवाद नव्हता. मात्र २०१९ मध्ये मविआचे सरकार अडीच वर्षे का होईना सत्तारुढ झाल्याने मरगळलेल्या काँग्रेसला पुन्हा उभारी मिळाली. गेल्या वर्षी राहुल गांधी यांच्या यात्रेमुळे महाराष्ट्रात काही प्रमाणात काँग्रेसमय वातावरण निर्मिती झाली. पण हा टेम्पो वर्षभर टिकवून ठेवण्यात प्रदेश नेत्यांना यश आलेले नाही. याचे कारण म्हणजे पक्षांतर्गत वाद. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (NaNa Patole) यांचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Waddettiwar) यांच्याशी जमत नाही. अशोक चव्हाण (Ashok Chavan), बाळासाहेब थोरात (Balasahe Thorat) या ज्येष्ठ नेत्यांचाही पक्षात सवता सुभा आहे. परखड बोलणारे पृथ्वीराज चव्हाणांपासून (Pruthviraj Chaavan) स्वपक्षीय नेते चार हात दूर राहणेच पसंत करतात. बाळासाहेब थोरातही पटोलेंवर नाराज आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघातून विजयाची शंभर टक्के खात्री असणारा त्यांचा भाचा सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना उमेदवारी देणे पटोलेंनी जाणीवपूर्वक टाळले. त्यामुळे थोरात नाराज झाले. सत्यजित अपक्ष म्हणून उभे राहिले व निवडूनही आले. मात्र पटोलेंच्या हट्टापायी काँग्रेसचा विधान परिषदेत एक आमदार वाढू शकला नाही. तांबे यांचे मोठ्या संख्येने फॅन फॉलोअर्स आहेत. किमान आता लोकसभेच्या तोंडावर तरी पूर्वीचे राग- लोक विसरुन काँग्रेस श्रेष्ठींनी अशा तरुण नेत्यांची मजबूत फळी तयार करुन त्यांना प्रचाराच्या मैदानात उतरवण्याची गरज आहे. तरच लोकसभेत महाराष्ट्रात पक्षाचे अस्तित्व राहिल अन्यथा शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढावू शकते.