नाशिकमध्ये झिका व्हायरसचा धोका वाढला; कोरानानंतर नवीन व्हेरियंटमुळे प्रशासन खडबडून जागे

नाशिकच्या भारतनगरमध्ये “झिका” रुग्ण आढळल्यानंतर प्रत्येक घरात शोधमोहिम सुरू आहे. जवळपास तीन किलोमीटरच्या परिघात शोध घेतल्यानंतर ५ गर्भवती महिला आढळल्या असून, पुणे येथील प्रयोगशाळेत रक्त चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे.

झिका हा डांसामार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार

कोरोनापाठोपाठ झिका; आजाराने तोंड वर काढले आहे. कर्नाटक राज्यात डासामध्ये या आजाराच्या विषाणूंचे अवशेष आढळले. झिका हा डांसामार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. झिका विषाणू रोग हा मुख्यतः एडीस डांसाद्वारे प्रसारित होणाऱ्या विषाणूंमुळे होतो, जो दिवसा चावतो. झिकाविषाणू हा फलॅव्हीव्हायरस प्रजातीचा असून, तो एडिस डांसामार्फत पसरतो. झिका आजाराची लक्षणे सर्वसाधारण डेंगीसारखीच असतात.

वैद्यकीय यंत्रणा सतर्क

ताप, अंगावर रॅश उमटणे, डोळे येणे, सांधे व स्नायूदुखी, थकवा, डोकेदुखी यांचा सामावेश होतो. ही लक्षणे सर्वसाधारण सौम्य स्वरूपाची असतात आणि ती २ ते ७ दिवसांपर्यंत राहतात. दरम्यान, नाशिक शहरात झिकाचा पहिला रुग्ण भारतनगर भागात आढळून आला. त्यामुळे महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सतर्क झाली.

वैद्यकीय अधिकारी, नर्सेसवर जबाबदारी

गर्भधारणेदरम्यान झिका विषाणूंच्या संसर्गामुळे शिशू मायक्रोसेफली आणि इतर जन्मजात विकृतीसह जन्माला येऊ शकते. गरोदरपणामध्ये झिका विषाणूंचा बाधा झाल्यास होणाऱ्या अर्भकाचा डोक्याचा घेर कमी होतो. त्यामुळे ज्या भागात झिका रुग्ण आढळला, त्या भागातील गर्भवती महिलांचा शोध घेऊन त्यांचे रक्त नमुने तपासणीसाठी पुणे येथील कार्यशाळेत पाठविले जातात.

भारतनगर येथे झिका रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी, नर्सेस आदींना गर्भवती महिलांचा शोध घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. परंतु किती किलोमीटरपर्यंत गर्भवती महिलांचा शोध घ्यावा, याबाबत स्पष्ट मार्गदर्शन नसल्याने तीन किलोमीटर परिसर पिंजून काढताना वैद्यकीय अधिकाऱ्यांची दमछाक झाली. तीन दिवसांपासूनच्या शोधमोहिमेत पाच गर्भवती महिला आढळल्या.
झिकावर उपाय
या आजारावर औषध, लस उपलब्ध नाही.
रुग्णाने पुरेशी विश्रांती घ्यावी.
पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थाचे सेवन करावे.
तापाकरीता पॅरासिटमॉल औषध वापरावे.
ॲस्पिरीन व या प्रकारातील औषधांचा वापर करू नये.
पाणी साठे वाहते करावे.
गप्पी मासे किंवा टेमिफोस या अळीनांशाचा वापर करावा.
भारतनगर परिसरात गर्भवती महिलांचा शोध घेतल्यानंतर पाच महिला आढळून आल्या. त्यांचे रक्त नमुने पुणे येथील प्रयोग शाळेत चाचणीसाठी पाठविण्यात आले.डॉ. तानाजी चव्हाण, वैद्यकीय अधिक्षक, महापालिका.