मुंबई : भाजपविरोधी दंड थोपटण्याचा आव आणणाऱ्या ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या जागावाटपात अनेक अडथळे असले तरी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या (MVA) मित्रपक्षांत मात्र जागावाटपावर एकमत झाल्याचे चित्र आहे. २५ जानेवारी रोजी आघाडीच्या समन्वय समितीची मुंबईत बैठक झाली, त्यात लोकसभेच्या ४८ जागांचे आघाडीतील मित्रपक्षांना कसे वाटप करायचे याचा कच्चा आराखडा ठरला आहे. आता ३० जानेवारी रोजी आणखी एक बैठक होणार आहे, त्यात जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब केले जाईल, अशी माहिती उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली.
विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित आघाडीला मविआत घ्यायचे की नाही याबाबत गेली अनेक महिने चर्चेचे गुऱ्हाळ सुरु आहे. मात्र हा पेचही आता सुटला आहे. मविआतील तीन प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या सहीनिशी २५ जानेवारी रोजी प्रकाश आंबेडकर यांना एक पत्र पाठवण्यात आले आहे, त्यात वंचित आघाडीचा ‘मविआ’त (MVA) समावेश करण्यास आम्ही तिन्ही पक्ष उत्सुक असल्याचे म्हटले आहे. तसेच ३० जानेवारी रोजी होणाऱ्या समन्वय समितीच्या बैठकीस अॅड. आंबेडकर यांनी स्वत: किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.
उद्धव सेनाच असेल मोठा भाऊ
सूत्रांच्या माहितीनुसार, मविआतील जागावाटपात ४८ पैकी सर्वाधिक २० जागा उद्धव सेनेला (Udhav Sena) मिळू शकतात. त्या खालोखाल काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीला जागा मिळू शकतात. २०१९ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला (Shiv Sena) १८ जागी यश मिळाले होते. राष्ट्रवादीला (NCP) ४ तर काँग्रेसला केवळ १ जागा मिळाली होती. त्यामुळे यावेळी काँग्रेसच्याच पदरात सर्वात कमी जागा येतील, असे सांगितले जात होते. मात्र शिवसेना व राष्ट्रवादीत पडलेली मोठी फूट व विधान परिषद निवडणुका तसेच कसबा पेठ पोटनिवडणूक मिळालेल्या यशामुळे काँग्रेसला आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे त्यांनी सर्वाधिक जागांची मागणी केली होती. मात्र अंतिम चर्चेनुसार, काँग्रेसला उद्धव सेनेपेक्षा २ ते ४ जागा कमी मिळू शकतात. राष्ट्रवादीला मात्र ९ ते १० जागांवरच समाधान मानावे लागू शकते.
राजू शेट्टी, आंबेडकरांची जबाबदारी मित्रपक्षांची
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यासोबतच शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांचा स्वाभिमानी शेतकरी पक्षही मविआत येण्यास तयार आहे. त्यांच्या पक्षांना उद्धव सेना व काँग्रेसच्या कोट्यातून जागावाटप केले जाऊ शकते. सर्वात कमी जागा मिळाल्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यात इतर कुणीही वाटेकरी होणार नाही याची काळजी शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतली आहे.