नवीन पक्ष, नवीन चिन्ह घेऊन शरद पवार पुन्हा गाजवणार महाराष्ट्राचे मैदान

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार ajit pawar यांचा गटच अधिकृत राष्ट्रवादी पक्ष असल्याचे नमूद करत त्यांना घड्याळ हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली. तर शरद पवारांचा sharad pawar गट आता ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ या नावाने नवीन पक्ष व नवीन चिन्ह घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीत जनतेसमोर जाणार आहे. पक्ष, चिन्ह गेले तर हार न मानता महाराष्ट्रभर पुन्हा एकदा प्रचार सभांचा झंझावात सुरु करण्याचा निश्चिय ८३ वर्षीय शरद पवारांनी केला आहे. १५ फेब्रुवारीपासून ते राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात करणार असून पहिली सभा आपले होमग्राउंड बारामतीत करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणुका लोकशाही पद्धतीने होत नसल्याचा ठपका अजित पवार गटाने शरद पवारांवर ठेवला होता. तो ग्राह्य मानून निवडणूक आयोगाने या पक्षाची घटना मान्य करण्यास नकार दिला होता. तसेच लाेकप्रतिनिधींचे संख्याबळ अजित पवार गटाकडे असल्याने त्यांना राष्ट्रवादी पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता.

पवारांना वर्षभरापूर्वीच होती कल्पना
शिवसेने फूट पडल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२३ रोजी निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधींच्या बहुमताच्या जोरावर एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष व धनुष्यबाण निवडणूक चिन्ह दिले होते. तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे- शिवसेना’ हे नाव मशाल चिन्ह दिले होते. त्यावेळी शरद पवार यांनी ‘पक्षाचे नाव चिन्ह गेले तर काही फरक पडत नसतो. आपले काम जनतेला पटले तर मतदार नवीन चिन्ह असले तरीही तुमच्या पाठीशी उभे राहत असतात’ असे वक्तव्य करुन केवळ ठाकरेंनाच दिलासा दिला नव्हता तर भविष्यात आपल्या पक्षाच्या बाबतीत काही झाले तर त्याची फारशी चिंता करत नसल्याचे संकेतही पवारांनी दिले होते.

पवारांना हवे ‘वडाचे झाड’ चिन्ह
राष्ट्रवादीच्या बाबतीत निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर त्यावर फारसे भाष्य करण्याची तसदी शरद पवारांनी घेतली नाही. नवीन पक्षाचे नाव ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ हे त्यांना मिळाले आहे. तसेच ‘वडाचे झाड’ हे चिन्ह त्यांनी निवडणूक आयोगाकडे मागितले आहे. मात्र तूर्त त्यावर निर्णय झालेला नाही. इतर कुठल्याही पक्षाकडे हे चिन्ह नसेल तर पवारांना ते मिळूनही जाईल. लवकरच त्याबाबत निर्णय होऊ शकतो. त्यामुळे शरद पवार आता नवीन पक्षाचे नाव व चिन्ह घेऊन जनतेच्या कोर्टात दाद मागण्यासाठी जाणार आहेत.