शरद पवार कृषिमंत्री असताना शेतकरी पॅकेजमध्ये व्हायची लूट : पंतप्रधान मोदींचा आरोप

यवतमाळमधील काही निवडक महिला लाभार्थ्यांना मेादींच्या हस्ते आयुष्यमान भारत योजनेच्या कार्डचे वाटप करण्यात आले.

यवतमाळ : ‘यूपीए सरकारच्या काळात दिल्लीतून शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर व्हायचे, मात्र त्याची मध्येच लूट व्हायची. तेव्हा तर कृषिमंत्री महाराष्ट्राचे होते. आज मात्र मी एक बटन दाबल्यानंतर २१ हजार कोटी रुपये ९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले. गरिबांचा पैसा थेट त्यांच्या खात्यात हीच तर मोदींची गॅरंटी आहे. पूर्वी दिल्लीतून शेतकऱ्यांसाठी एक रुपया निघाला तर प्रत्यक्षात केवळ १५ पैसे पोहोचत होते. आता जर काँग्रेसचे सरकार असते तर २१ हजार कोटींपैकी १८ हजार कोटींची लूट झाली असती’, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर २८ फेब्रुवारी रोजी यवतमाळमध्ये आयोजित महिला बचत गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज्यपाल रमेश बैस, आदी उपस्थित होते. मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीला जय भवानी, जय शिवाजी, जय सेवालाल, जय बिरसा अशा घोषणा दिल्या. त्यानंतर आपल्या सर्वांना माझा नमस्कार अशी मराठीतून सुरुवात केली.
मोदी म्हणाले की, दहा वर्षांपूर्वी चाय पे चर्चा या निमित्ताने यवतमाळात आलो होतो. त्यावेळी यवतमाळकरांसह संपूर्ण देशाने आशीर्वाद दिले. तेव्हा एनडीए ३०० पार गेले होते. त्यानंतर २०१९ मध्ये निवडणुकांपूर्वी पुन्हा यवतमाळला आलो. त्यावेळीसुद्धा तुम्ही भरभरून प्रेम दिले. त्यामुळे लोकसभेत एनडीएने ३५० पार केले. आता २०२४ च्या निवडणुकीपूर्वी विकास कामांच्या लोकार्पणासाठी यवतमाळात आलो तर, आता अबकी बार चारशे पार, अशी गर्जना सर्वत्र ऐकू येत आहे. यवतमाळ, वाशीम, चंद्रपूरसह पूर्ण विदर्भाचा आशीर्वाद मिळत आहे.’

मोदीची डबल गॅरंटी Modi’s double guarantee

महाराष्ट्रात सध्या डबल इंजिनचे सरकार असल्याने येथे मोदींची डबल गॅरंटी आहे. राज्यात शेतकऱ्यांना डबल पैसे मिळत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यात आज ९०० कोटी रुपये येत आहेत. हे पैसे लहान शेतकऱ्यांच्या कामी येत आहेत. विकसित भारतासाठी ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी गेल्या १० वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. २०१४ पूर्वी देशात अनेक ठिकाणी पाण्यासाठीही मारामार होती. १०० पैकी १५ घरात पाइपने पाणी यायचे त्यासाठी हर घर जलची गॅरंटी दिली होती. ४-५ वर्षांतच १०० पैकी ७५ घरात पाइपने पाणी येत आहे. लखपती दीदीची गॅरंटी दिली होती, अाज १ कोटी दीदी लखपती झाल्या आहेत. येत्या काळात ३ कोटी दीदी लखपती करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांना कोणी विचारले नाही, त्यांना मोदींने विचारले सांगत त्यांनी केलेल्या कामांची माहिती दिली. येत्या ५ वर्षात यापेक्षाही वेगाने विकास होतील, असे त्यांनी सांगितले.

निवडणुका आल्या की मोदींना आठवले यवतमाळ When elections came, Modi remembered Yavatmal

  1. यापूर्वी २०१४, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीही मोदींनी यवतमाळमध्ये येऊन महाराष्ट्रात प्रचाराचा प्रारंभ केला होता. २०१४ मध्ये मोदींची भाजपने पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून निवड केली होती. तेव्हा यवतमाळमध्ये येऊन ‘चाय पे चर्चा’ केली. यात त्यांनी शेतकरी आत्महत्या, कापसाला हमी भाव आदी विषय उपस्थित करुन तत्कालिन यूपीए सरकारवर टीका केली होती. मात्र नंतर मोदींच्या १० वर्षांच्या काळात ना कापसाला अपेक्षित भाव मिळाला ना विदर्भातील शेतकरी आत्महत्या थांबल्या.
  2.  फेब्रुवारी २०१९ मध्ये पंतप्रधान असताना लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोदींनी पांढरकवडा येथे महिला बचत गटाचा मेळावा घेऊन महिलांसाठी विशेष योजनांची घोषणा केली होती. त्या योजनांही अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत.
  3.  फेब्रुवारी २०२४ मध्ये मोदींनी पुन्हा लोकसभेपूर्वीच यवतमाळमध्ये महिला बचत गटाचा मेळावा घेतला. शेतकरी, महिलांसाठी केलेल्या मदतीची घोषणा केली. तसेच आता शेतकरी महिलांना ड्रोन देण्याची व ते चालवण्याचे प्रशिक्षण देण्याचीही घोषणा केली.

    Rally of Modi.. Chairs of Rahul Gandhi

  4. सभा मोदींनी, पण खुर्च्यांवर स्टिकर राहूल गांधींचे

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांची २८ डिसेंबर २०२३ रोजी नागपुरात सभा झाली होती. त्या वेळी सभेतील खुर्च्यांच्या पाठीमागे राहुल गांधी यांचा फोटो असलेले स्टिकर व पक्षनिधी गोळा करण्यासाठी काँग्रेसने क्यूआर कोड लावला होता. योगायोगाने बुधवारी मोदींच्या सभेच्या तयारीचे काम त्याच ठेकेदाराला देण्यात आले होते. त्याने आणलेल्या काही खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर तसेच होते. ही बातमी व्हायरल झाली. त्यानंतर मात्र धावपळ करत ठेकेदाराने स्टिकर्स काढले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, ‘मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधी यांचे फोटो लावून जनतेने योग्य तो संदेश दिलाय.’