अजितदादांचे जनतेला पत्र…‘विकासासाठी भाजपसोबत, काकांच्या पाठीत खंजीर खुपसायचा नव्हताच’
Ajit Pawar’s Letter To Public ईडीच्या कारवाईला घाबरुन अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी बंड करुन भाजपशी हात मिळवणी करत सत्ता मिळवली, असा आरोप होत आहे. अजितदादांनी हा निर्णय घेऊन ८ महिने उलटली तरी अजूनही त्यांच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर दगाबाजीचे आरोप केले जात आहेत. यातून त्यांची प्रतिमा जनतेत मलिन होत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आपल्या बंडानंतर ८ महिन्यांनी जनतेला उद्देशून एक भावनिक पत्र लिहिले.. त्यात त्यांनी काकांच्य पाठीत खंजीर खुपसला नसल्याचा खुलासा केला आहे. दादांचे पत्र त्यांच्याच शब्दात…..
Ajit Pawar’s Letter To Public
1991 पासून मी राजकीय जीवनात ख-या अर्थाने वाटचाल करीत आहे. मला राजकारणात कोणी आणले, कोणी मला मंत्रीपद दिले, कोणी संधी दिली या बाबत अनेकदा चर्चा झाली. खर तर मला राजकारणात संधी अपघातानेच मिळाली, त्या काळी राज्यस्तरावर नेतृत्वासाठी एका युवकाची आवश्यकता होती, त्यामुळे कुटुंबिय म्हणून मला ती संधी मिळाली. त्या संधीचे सोने करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला, कष्ट व परिश्रम केले, इतर सर्व जबाबदा-यांकडे दुर्लक्ष करुन समाजकारणासाठी स्वताःला वाहून घेतले, तीन दशकांहून अधिक काळ हा प्रवास सुरु आहे. फक्त संधी मिळून चालणार नव्हते तर त्याचा लोकांची कामे होण्यासाठी कसा उपयोग करता येईल या वरच कायम माझा भर राहिला.
पहाटे पाचपासून काम सुरु करण्याची सवय लावून घेतली. कारण हातात असलेल्या वेळेत समाजोपयोगी, विधायक व विकासाची कामे वेगाने मार्गी लागावीत. ज्या मतदारांनी भरभरून प्रेम केले, विश्वास व्यक्त केला, त्यांचे जीवनमान अधिक कसे उंचावेल या साठी कायमच मी प्रयत्न केला.
पहिल्या दिवसापासून राजकारण समाजकारण करताना इतर कोणत्याही मुद्यापेक्षा विकासालाच सर्वाधिक प्राधान्य दिले, आजही आणि भविष्यातही विकास हाच कायम माझा व माझ्या सर्व सहका-यांचा एककलमी कार्यक्रम असेल.
Ajit Pawar’s Letter To Public
कामे करायची तर सत्ता हवीच
काही काळ सत्ताधारी तर काही काळ विरोधक म्हणून दिवस पाहिले. सत्तेत असताना असलेला कामाचा वेग आणि विरोधक असताना रखडलेली कामे दोन्हीचा अनुभव घेतला. जर लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचे असेल तर त्याला सत्तेची जोड हवी, ही वस्तुस्थिती नाकारुन चालत नाही.
विचारधारेशी तडजोड न करता निर्णय
विचारधारा, ध्येयधोरणे यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकासकामे वेगाने मार्गी लागावेत, याच उद्देशाने वेगळी भूमिका घेतली. यात कोणाचाही अवमान करणे, कोणाच्याही भावना दुखाविणे, कोणालाही दगा देणे किंवा पाठीत खंजीर खुपसणे असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता व कधीच नसेल.
वडिलधाऱ्यांचा कायम आदर
कायमच वडीलधा-यांविषयी आदराची भावना, समवयस्कांना सोबत घेऊन जाणे व युवकांना विविध ठिकाणी संधी देण्याचेच काम माझ्याकडून झाले आहे. आजही मी फक्त भूमिका घेतली आहे, सत्ता असेल तर मतदारसंघासह राज्यातील सर्वच विकासकामे वेगाने मार्गी लागतील ही स्वच्छ भूमिका आहे, यात कोणाचाही अनादर करण्याचा अजिबात हेतू नव्हता व नसेल.
मोदी- अमित शाह यांचे कौतुक, पण फडणवीसांचा नामाेल्लेख नाही Appreciation of Modi- Amit Shah
या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली जो विकास होतो आहे, तो मला महत्वाचा वाटला. कणखर नेतृत्व व योग्य निर्णय प्रक्रिया हे त्यांचे गुण मला भावले. माझी आणि त्यांची कार्यप्रणाली मिळतीजुळती आहे, कामावर आमचे जास्त प्रेम आहे, त्यांच्यासमवेत माझ्या भविष्यातील विकासाच्या ज्या योजना आहेत, त्या अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरविणे शक्य होईल, असे मला वाटल्याने मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. या राज्याला विकासात अग्रेसर कसे करता येईल या उद्देशाने मी ही भूमिका स्वीकारली आहे. मी सत्तेत आल्यानंतर विकासास आलेली गती आपण अनुभवली आहे.
वडीलधारी किंवा ज्येष्ठांचा अनादर करणे असा हेतू नसून भविष्यात वेगाने लोकांचे राहणीमान कसे उंचावता येईल, मुलभूत पायाभूत सुविधा अधिक सक्षम कशा करता येतील हाच विचार आहे.
या पुढील काळातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणावरही वैयक्तिक स्वरुपाची टीकाटीप्पणी टाळून विकासाची ब्ल्यू प्रिंट या राज्यातील जनतेसमोर घेऊन येईल इतकीच ग्वाही मी या निमित्ताने राज्यातील जनतेला देऊ इच्छितो. विकासाच्या या वाटेवर सर्व सन्माननीय नागरिकांनी माझ्यासोबत यावं, वडीलधारी मंडळींनी आशिर्वाद द्यावा असं विनम्र आवाहन करतो.
-
अजित पवार, उपमुख्यमंत्री