अजितदादा यांना नव्या वर्षात मोठा धक्का बसणार; कट्टर समर्थक, बडा नेता करणार ‘जय महाराष्ट्र’; ठाकरे गटात
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं. त्यांच्यासोबत 44 आमदार आले आणि अजितदादा गटाने सत्तेत सहभाग घेतला. त्यामुळे अजितदादा गटात आगामी काळात मोठी इनकमिंग होईल असा कयास वर्तवला जात होता. पण हा कयास फोल ठरताना दिसत आहे. अजितदादा सत्तेत असूनही त्यांच्याकडे नेते, कार्यकर्ते येण्याचं सोडून आता त्यांनाच नेते सोडून जात असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अजितदादा यांचे एक कट्टर समर्थक नववर्षात अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणार आहेत. अजितदादांचे हे समर्थक ठाकरे गटात जाणार असून त्यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली आहे.
अजित पवार गटाला नव्या वर्षात ठाकरे गटाकडून जोरदार झटका मिळणार आहे. अजितदादांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. संजोग वाघेरे यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन पक्षात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं आहे. उद्धव ठाकरे यांनीही संजोग यांचं जंगी स्वागत केलं आहे. त्यामुळे अजितदादा यांच्यासाठी हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.
संजोग वाघेरे ही पिंपरी चिंचवडमधील मोठं नाव आहे. वाघेरे यांनी पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. शिवाय ते अजितदादांचे खास आणि विश्वासू म्हणून ओळखले जातात. आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत वाघेरे यांनी बैठक केली. यावेळी त्यांनी आपण मावळ लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचं उद्धव ठाकरे यांना सांगितलं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी दोन चार दिवसात विचार करून निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिलं.