छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या प्रचाराचा नारळ ५ मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जाहीर सभांनी फोडण्यात आला. जळगाव, छत्रपती संभाजीनगर येथे शाह यांनी जाहीर सभा घेतल्या. तर अकोल्यात निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन विदर्भातील सहा लोकसभा मतदारसंघातील तयारीचा आढावा घेतला. संभाजीनगरातून ‘मजलीस’ला म्हणजेच एमआयएमला उखडून फेका, असे आवाहन करुन लोकसभा निवडणूक प्रखर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवण्याचे संकेतही त्यांनी दिले. तसेच छत्रपती संभाजीनगरचा मतदारसंघ भाजपच लढवणार असल्याचे संकेतही शाह यांच्या सभेतून मिळाले आहेत.
गेल्या २५ ते ३० वर्षात संभाजीनगरची निवडणूक बाळासाहेब ठाकरे यांनी ‘बाण हवा की खाण’ या मुद्द्यावर चालवली. आता उद्धव ठाकरे मवाळ झाले आहेत. ही संधी साधून संभाजीनगरात भाजपने बाळासाहेबांचा प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला असल्याचे अमित शाह यांनी दाखवून दिले.
उद्धव ठाकरेंना म्हणाले, तुम्हाला लाज वाटली पाहिजे…
Uddhav Thackeray, “You should be ashamed
बाळासाहेब ठाकरेंचे गौरव करुन अमित शाह म्हणाले, ‘हिंदुत्ववादी विचारांमुळे बाळासाहेबांना देशात मान होता. मात्र त्यांचे पूत्र उद्धव ठाकरे यांनी त्या विचारांविरोधात बोलणाऱ्यांसोबत बसणे पसंत केले. उद्धव ठाकरेंना याची लाज वाटली पाहिजे, अशा कठोर शब्दात टीका करुन शाह यांनी उद्धव सेनेला अंगावर घेण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नसल्याचा संदेश जनतेला दिला.
अमित शाह यांचा घराणेशाहीवर कठोर प्रहार
Amit Shah hits out at nepotism
सोनिया गांधी यांना राहूल गांधी यांना पंतप्रधान बनवायचे आहे. शरद पवार यांना आपल्या मुलीला तर उद्धव ठाकरे यांना आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचे आहे. इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांमध्ये अशी घराणेशाहीची परंपरा आहे. भाजप फक्त देशहिताला प्राधान्य देते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपला साथ द्या, असे आवाहन शाह यांनी केले.
राममंदिर, ३७० कलमाचा पुनरुच्चार
Ram temple, Reaffirming Article 370
काँग्रेसने मतांसाठी ६० वर्षे प्रभू श्रीरामांना कुलूपबंद ठेवले. काश्मीरात ३७० कलम हटवले तर रक्ताचे पाट वाहतील असे राहूल गांधी म्हणायचे. मात्र आम्ही या दोन्ही गोष्टी करुन दाखवल्या. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान केल्यानंतर भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर येईल. येणारी निवडणूक २०२४ मध्ये भाजप किंवा मोदी यांना निवडून देण्यासाठी नाही तर २०४७ मध्ये आत्मनिर्भर आणि विकसित भारत घडवण्यासाठी आहे, असे आवाहनह शाह यांनी केले.
तुमच्यासाठी नरेंद्र मोदी
Narendra Modi for You
इंडिया आघाडीतील नेत्यांना आपल्या मुलांना, पुतण्यांना पंतप्रधान, मुख्यमंत्री बनवायचे आहे. पण मग तुमच्यासाठी कोण काय करणार? असा सवाल शाह यांनी जळगावच्या युवकांना केला. त्यावर गर्दीतून ‘नाही’ असा आवाज आला. मात्र शाह म्हणाले, ‘ तुमच्यासाठी नरेंद्र मोदी आहेत ना.’ हे वाक्य ऐकताच तरुणांनी एकच जल्लोष केला आणि मोदींच्या नावाच्या घोषणा दिल्या.
अजित पवारांचा उल्लेख टाळला
Avoided mentioning Ajit Pawar
जळगावच्या सभेत शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा उल्लेख केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही कौतुक केले. मात्र दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख मात्र त्यांनी केला नाही. यापूर्वी शाह यांनी शरद पवार व अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ते बूमरँग होऊ नये म्हणून शाह यांनी अजितदादांचे नाव घेणे टाळल्याचे सांगितले जाते.