छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालीय. १५ मार्चपर्यंत कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार फायनल करायला सुरुवात केली आहे. भाजपने आठ दिवसांपूर्वीच पहिली यादी जाहीर केली, मात्र त्यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नाही. महाराष्ट्रात भाजपची शिंदेंची शिवसेना व अजित दादा यांच्या राष्ट्रवादीशी युती आहे. या महायुतीचे अद्याप जागावाटपच निश्चित झालेले नसल्यामुळे तिन्ही पक्षांनी अजून एकाही उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही.
युतीत जागा शिवसेनेकडेच Shiv Sena claims seat in alliance
महाराष्ट्रात यंदा ज्या मतदारसंघांच्या निवडणूक खूपच चर्चेच्या किंवा लक्षवेधी होणार आहेत त्यात मराठवाड्यातील राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचा समावेश आहे. शिवसेना- भाजप युती आकाराला आल्यापासून म्हणजेच गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून पूर्वाश्रमीच्या या औरंगाबाद मतदारसंघाची जागा युतीत शिवसेनेकडेच आहे. या पक्षाचे चंद्रकांत खैरे तब्बल ४ वेळा येथील खासदार राहिले होते. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तिहेरी लढतीमुळे मोदी लाटेतील या मतदारसंघात शिवसेनेचा पराभव झाला व एमआयएमचे डॉ. इम्तियाज जलील निवडून आले.
संभाजीनगरसाठी शिंदे सेनाही आग्रही Shinde Sena insists on Sambhajinagar
आता २०२४ मध्ये मात्र फारच वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना व भाजप यांची युती तुटलीय. दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत होते. मात्र त्यातच २०२२ मध्ये भाजपने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा एक गट फोडून आपल्यासोबत आणला. त्यांच्या साथीने महाराष्ट्राची सत्ताही मिळवली. त्यामुळे युतीत पुन्हा हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहिल, मात्र ही शिवसेना एकनाथ शिंदेंची असेल असा अंदाज बांधला जाऊ लागला. शिंदेसेनेचे नेते तसे दावाही करु लागले. मात्र भाजपच्या मनात काही वेगळेच होते. आता युतीत ‘थोरल्या भावा’च्या भूमिकेत आलेल्या भाजपने संभाजीनगर हा मतदारसंघच आपल्याकडे खेचून घेण्याचे डावपेच काही महिन्यांपासून सुरु केले होते. त्यात त्यांना बऱ्यापैकी यश आलेले दिसते.
जागा भाजपच लढणार BJP to contest seat
महायुतीचे जागावाटप अद्याप जाहीर करण्यात आलेले नसले तरी संभाजीनगर मतदारसंघ भाजपच लढवणार हे मात्र निश्चित झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतीच संभाजीनगरात जाहीर सभा घेऊन तशी घोषणा केल्याने त्याबाबत आता कुठलीही शंका राहिलेली नाही.
आपल्या विद्यमान खासदारांच्या जागा वाचवण्यासाठी धडपड कराव्या लागणाऱ्या शिंदेसेनेचाही संभाजीनगरची जागा आपल्याकडे घेण्यासाठी फारसा रस दिसत नाही. त्यांनीही इथून भाजपचाच उमेदवार लढणार हे मान्य केले आहे. बरं… आता मतदारसंघ भाजप लढवणार हे निश्चित झाले असले तरी उमेदवार कोण असे? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.
डॉ, भागवत कराड यांच्या नावाची चर्चा
Dr Bhagwat Karad’s name discussed
राज्यसभा खासदार व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नावाची सुरुवातीपासून चर्चा आहे. मोदी सरकारच्या सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यात व संभाजीनगरसाठीच्या विविध विकास कामांसाठी आजवर त्यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून आले. ओबीसी चेहरा, सर्वांना सहज उपलब्ध होईल असे व्यक्तीमत्व व एकेकाळी संभाजीनगरच दोनदा महापौरपद भूषविलेले असल्याने त्यांना शहराची नस चांगली माहिती आहे. त्यामुळे डॉ. कराड यांना उमेदवारी मिळेल असेच दावा आतापर्यंत केले जात होते. अगदी काल- परवा झालेल्या अमित शाह यांच्या सभेतही व्यासपीठावर डॉ. कराड यांना भाषणाची संधी मिळाल्यामुळे त्यांचेच नाव चर्चेत होते. मात्र भाजपचे निर्णय केवळ दिखावूपणावर होत नाहीत. भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेक्षणात डॉ. कराड यांचा चेहरा विजयश्री मिळवण्यासाठी सक्षम नसल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. त्यामुळे हा पक्ष इतर पर्यायी उमेदवारांच्या नावाचीही चाचपणी करत आहे.
अतुल सावे यांच्या नावाचा सकारात्मक विचार
Atul Save’s name also considered
संभाजीनगर पूर्व मतदारसंघाचे आमदार व राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या नावाचा पक्ष सकारात्मक विचार करत आहे. सावे यांचे वडील मोरेश्वर सावे हेही खासदार होते. त्यांच्यामुळे सावे घराण्याचा जनसंपर्क जिल्ह्यात चांगला आहे. सावे स्वत: उद्योजक आहेत, त्यामुळे उद्योग वर्तुळातही त्यांना चांगला मान- सन्मान आहे. विशेष म्हणजे सावे हेही ओबीसी समाजातून येणारे असल्यामुळे भाजपची हक्काची व्होटबँक असलेला ओबीसी समाज त्यांच्या पाठीमागे सक्षमपणे उभा राहिल, अशी अपेक्षा पक्षाला वाटते. पण भाजपच्या सर्वेक्षणात अतुल सावे यांचा मितभाषीपणा हा दोष ठळकपणे नमूद करण्यात आला आहे. सावे १० वर्षांपासून आमदार आहेत. मतदारसंघातील अनेक कामे त्यांनी केली आहेत. त्यांना दोनदा मंत्रिपदाचीही संधी मिळाली. मात्र तरीही मतदारसंघात, जिल्ह्यात व मंत्रिमंडळात किंवा विधानसभेत ते अपेक्षित कामगिरी करु शकले नाहीत. एक मंत्री म्हणून त्यांच्या कामगिरीवर पक्ष समाधानी नाही. त्यामुळे सावेंनाही उमेदवारी द्यावी की नाही या संभ्रमात भाजप आहे.
विनोद पाटील ठरु शकतो हुकमी एक्का
Vinod Patil can be a hooker
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी नुकतीच लोकसभा लढवण्याची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणासाठी गेली १० वर्षे न्यायालयीन लढा देणाऱ्या विनोद पाटील यांनी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणूक लढवणार नसल्याची शपथ घेतली होती. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांची राजकीय कारकिर्द सुरु झाली. मात्र मराठा आरक्षणाच्या लढाईत उतरल्यानंतर त्यांचे नेतृत्व केवळ संभाजीनगर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर चर्चिले गेले. कोणत्याही राजकीय पक्षापासून दूर राहून त्यांनी हा लढा लढला, याचे कौतुकच झाले. मराठा क्रांती मोर्चामध्येही त्यांचा सक्रीय सहभाग होता. मराठा आरक्षणाची लढाई थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढणारे विनोद पाटील यांचा कायद्याचा अभ्यासही चांगला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक आंदोलनत मात्र ते फारसे सक्रीय दिसले नाहीत.
मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण
10% separate reservation for Maratha community
आता शिंदे सरकारने मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण लागू केले आहे. त्यामुळे विनोद पाटील यांची शपथ पूर्ण झाली. नुकत्याच एका कार्यक्रमात त्यांनी आता मराठा समाजाच्या हितासाठी निवडणूक लढवण्यास तयार असल्याची घोषणा केली. मराठा आंदोलकांकडून व समाजाकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. पण विनोद पाटील यांना उमेदवारी कोणत्या पक्षाकडून मिळेल याबाबत तर्क- वितर्क सुरु आहेत.
भाजप देऊ शकतो उमेदवारी
Vinod Patil to be BJP’s candidate
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे किंवा अंबादास दानवे या दोघांपैकी एकाची उमेदवारी निश्चित मानली जाते. उमेदवारी निश्चितबाबत भाजप अजूनही संभ्रमात आहे. या परिस्थितीत एक सक्षम मराठा उमेदवार म्हणून विनोद पाटील यांनाही आपल्या पक्षाकडून उभे करण्याचे प्रयत्न भाजपच्या एका गटाकडून सुरु आहेत. त्यात एका केंद्रीय मंत्र्याचा जास्त सहभाग असल्याचे सूत्रांनी सांगितले. विनोद पाटील यांना उमेदवारी देण्यामागे प्रामुख्याने ही कारणे सांगितले जातात…
एक म्हणजे, मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे राज्यात विशेषत: मराठवाड्यात मराठा व ओबीसी या दोन समाजात मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यातही ओबीसी समाज भाजपच्या बाजूने एकगठ्ठा मते देऊ शकतो. तर मनोज जरांगे पाटील यांची ओबीसीतून आरक्षणाची मागणी मान्य न झाल्याने मराठा समाजाचा एक गट सरकारवर नाराज आहे. तर विनोद पाटील यांना मानणारा वर्ग १० % आरक्षणावरही समाधानी आहे. त्यामुळे ओबीसींची एकगठ्ठा मते तर भाजपला मिळणारच आहेत. पण नाराज मराठा समाजाची मते आपल्याकडे वळण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय असलेला विनोद पाटील सारखा उमेदवार जर आपण दिला तर आपला विजय कोणीही रोखू शकत नाही, असे भाजपच्या धुरिणांना वाटते.
मराठा फॅक्टरमुळेच गेल्यावेळी युतीचा पराभव
Maratha factor led to the alliance’s defeat last time
संभाजीनगर मतदार संघात मराठा समाजाची मते निर्णायक आहेत. २०१९ च्या निवडणुकीत युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे व अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या तुल्यबळ लढत झाल्यामुळे हिंदू व्होटबँकेचे मोठे विभाजन झाले. त्याचाच फायदा घेऊन दलित व मुस्लिम मतांच्या जोरावर एमआयएम- वंचित आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील निवडून अाले. देशभर मोदी लाट असतानाही युतीचा उमेदवार तेही संभाजीनगरात कसा पराभूत झाला? याविषयी सर्वत्र चर्चा झाली. त्यावेळीही मराठा आंदोलन मराठवाड्यात तेजीत होते. हर्षवर्धन जाधव हे अपक्ष उमेदवार असले तरी मराठा मते त्यांच्याकडे मोठ्या संख्येने आकर्षित झाली. त्यातच निवडून आलो तर मी मोदींनाच पाठिंबा देणार, अशी घोषणा जाधव यांनी केली होती. त्यामुळे ‘आपला माणूस निवडून आणू व मोदींची हात बळकट करु’ असा प्रचार त्यावेळी संपूर्ण मतदारसंघात विशेषत: मराठा समाजात झाला. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांना पावणेतीन लाखांपर्यंत मते पडली. एकेकाळी शिवसेनेला मानणारा मराठा समाज त्यांच्यापासून दूर गेल्याने चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला. हा धोका भाजपला टाळायचा आहे.
चंद्रकांत खैरे उद्वव सेनेचे उमेदवार
Chandrakant Khaire udhav Sena candidate
मराठा आंदोलनामुळे मराठा समाजात सरकारची जी काही प्रतिम मलिन झाली आहे, त्याचा फटका लोकसभेला बसू नये म्हणून मराठा उमेदवारच मैदानात उतरवण्याची तयारी भाजपकडून केली जात आहे. मराठा समाजाची ५० ते ६० टक्के मते व ओबीसींसह इतर हिंदू समाजाची एकगठ्ठा मते घेऊन संभाजीनगरात भाजपचा पहिला खासदार निवडून आणायचा असे डावपेच आखले जात आहेत. त्यात आता विनोद पाटील भाजपची उमेदवार घेण्यास तयार झाले तर भाजपची ही खेळी यशस्वी होऊ शकते. अन्यथा डॉ. कराड किंवा अतुल सावे या पैकी कोणालाही उमेदवारी दिली तरी चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात त्यांना निवडून आणण्यासाठी भाजपला अपार मेहनत घ्यावी लागेल, यात शंका नाही.