मुंबई
महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले भाजपचे मातब्बर नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या जागावाटपाचा प्रश्न मार्गी लावला. भाजपला ३२, शिंदे गटाला १२ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ४ जागा देण्याचे त्यांनी ठरवले. शिंदे १८ तर पवार १० जागांसाठी आग्रही होते. मात्र अमित शाह यांनी ‘लोकसभेला आमचे एेका, विधानसभेला तुमची भरपाई करू’ असे सांगून त्यांची समजूत काढली. अखेर नाईलाजाने शिंदे, अजितदादांना हा प्रस्ताव स्वीकारावा लागला.
तरीही महायुतीचे जागावाटप जाहीर करण्यास मात्र अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. अमित शाह यांची मुंबईतील बैठक संपताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार आशिष शेलार यांच्यासह काही नेते तातडीने दिल्लीला रवाना झाले. तिथे त्यांनी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा केली.
सूत्रांच्या माहितीनुसार, ठरलेल्या जागावाटपानुसार भाजपच्या उमेदवारांची नावे फडणवीस यांनी शहा यांच्यासह भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे सादर केली. ८ मार्च रोजी या समितीची बैठक होणार आहे. त्यात प्रदेश भाजपने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या यादीवर अंतिम शिक्कामोर्तब होईल व त्यानंतर या नावांची दिल्लीतून अधिकृत घोषणा केली जाईल. तोपर्यंत तिकिटासाठी इच्छूक उमेदवार देव पाण्यात घालून बसले आहेत.
https://missionpolitics.com/seat-sharing-of-mahayuti-was-decided/
भाजपच्या दडपशाहीला रामदास कदम, भुजबळांचा विरोध
Ramdas Kadam, Bhujbal oppose BJP’s repression
अमित शाह यांच्या आदेशानुसार ठरवलेले जागावाटप एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी मान्य केले असले तरी या दोघांच्याही पक्षातून त्याला विरोध होत आहे. शिंदे सेनेचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांनी भाजपच्या या दडपशाहीविरोधात आवाज उठवला आहे. ‘जिथे आमचे खासदार आहेत तेथील जागांवर भाजप कशी काय दावा करु शकते? शिवसेनेचे उमेदवार पाडण्याचे काम महाराष्ट्रातील काही भाजपचे नेते गेल्या निवडणुकीपासून करत आहेत. अमित शाह, मोदी यांनी यात लक्ष घालावे. त्यांच्यावर विश्वास ठेऊन आम्ही युतीत आलो. त्यांनी महाराष्ट्रातील या नेत्यांचे कान टोचावेत. मित्रांचा कुणी केसाने गळा कापू नये एवढेच,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अजितदादा गटाचे मंत्री छगन भुजबळही म्हणाले, ‘शिंदे गटाला जेवढ्या जागा दिल्या जातील तेवढ्याच राष्ट्रवादीलाही मिळाव्यात. भाजप आम्हाला दिलेला शब्द पाळेल असा विश्वास आहे.’
महाविकास आघाडीत उद्धव सेनाच मोठा भाऊ, पण वंचितमुळे अडले जागावाटप Uddhav Sena big brother in Maha Vikas Aghadi
महाविकास आघाडीतील तीन पक्षांचे जागावाटप निश्चित झाले आहे. त्यात उद्धव सेनेला २३, काँग्रेसला १५ व राष्ट्रवादीला १० जागा देण्याचे ठरले आहे. फक्त प्रकाश आंबेडकर यांच्या समावेशाबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. वंचित आघाडीने ७ जागा मागितल्या आहेत तर मविआ त्यांना ठाकरेंच्या कोट्यातून ३ जागा देण्यास तयार आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत मविआची बैठक झाली. त्यात शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, प्रकाश आंबेडकर सहभागी झाले होते. मात्र निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे आंबेडकर बैठकीतून निघून गेले. आताा ९ मार्च रोजी मविआची पुन्हा बैठक होणार आहे. त्यात आंबेडकरांच्या प्रस्तावावर पुन्हा चर्चा होणार असल्याचे समजते.
prakash ambedkar
आमच्या प्रस्तावावर मविआत चर्चाच झाली नाही : सिद्धार्थ मोकळे
वंचित आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले, ‘मविआच्या बैठकीत वंचितच्या प्रस्तावाबाबत व आम्हाला किती जागा द्यायच्या याबाबत चर्चाच झाली नाही. तिन्ही पक्षांची नेत्यांनी त्यासाठी वेळ मागवून घेतली आहे. त्यामुळे पुढील बैठकीत काही गोष्ट स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
जरांगेंबाबत भूमिका स्पष्ट करा
Clarify your position on Jarange
ओबीसींना १५ व मुस्लिमांना ३ जागा द्या. भाजपशी समझोता करणार नाही, अशी लेखी हमी मविआतील सर्व घटकपक्षांनी द्यावी, मनोज जरांगेंच्या आंदोलनाविषयी मविआची भूमिका काय आहे, या आमच्या प्रस्तावावर मविआतील तिन्ही पक्षांनी अजून उत्तर दिलेले नाही. ९ मार्चच्या बैठकीत त्यावर सकारात्मक चर्चा होणे अपेक्षित असल्याचे सिद्धार्थ मोकळे म्हणाले.
उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत व राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मात्र प्रकाश आंबेडकरांशी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले.