विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागला. महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला प्रचंड बहुमत दिले, तरी त्यांना मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री निवडीसाठी ५ डिसेंबर उजाडला. आता त्यानंतरही मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची निवड करण्यासाठी आणखी १० दिवस गेले. आता कुठे १५ डिसेंबरला नागपुरात शपथविधी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. एवढे बहुमत असतानाही महायुतीच्या नेत्यांना मंत्रिमंडळ ठरवायला इतका उशिर का लागतोय? आधी मुंबईत शपथविधीची तयारी झाली, मग ऐनवेळी नागपूरचे ठिकाण का ठरवण्यात अाले? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या… मिशन पॉलिटिक्समधून
फडणवीसांची गोल गोल उत्तरं..
मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार ? या प्रश्नाचे उत्तर देताना शिंदेसेनेचे प्रवक्ते व एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले आमदार संजय शिरसाट व आमदार भरतसेठ गोगावले यांनी आधी ११ किंवा १२ डिसेंबर तारीख सांगितली होती. नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १४ डिसेंबर रोजी मुंबईत कार्यक्रम होणार असल्याचे सांगितले होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे इतर नेते मात्र यावर गोलगोल उत्तरे देत होते. कुठेही ठोस उत्तर देणे ते टाळत होते. मुंबईत शपथविधीची तयारी सुरू असताना आता एेनवेळी नागपुरात १५ डिसेंबर रेाजी हा सोहळा होणार असल्याचे सांगण्यात अाले. याचा अर्थ सत्ताधारी मित्रपक्षांनाही नेमका हा सोहळा कधी होणार हे माहिती नव्हते. किंवा याबाबतचा निर्णय घेताना भाजप मित्रपक्षांना विश्वासात न घेताच परस्पर सर्व काही ठरवत असल्याचे यातून दिसून येते.
त्यामुळेच मुंबईऐवजी नागपूरची निवड..
सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले होते तेव्हा भाजप हायकमांडकडून १४ डिसेंबरची तारीख शपथविधीसाठी सांगण्यात आली होती. पण भाजप व मित्रपक्षांनी तयार केलेल्या मंत्रिमंडळातील सदस्यांची यादीला अजून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अंतिम मान्यता मिळालेली नव्हती. पंतप्रधान संसद अधिवेशन व इतर कार्यक्रमात इतके बिझी हेाते की त्यांना मंत्रिमंडळाची यादी मंजूर करण्यासही वेळ नव्हता. त्यामुळे नाईलाजास्तव भाजपला १४ डिसेंबरएेवजी १५ डिसेंबर ही तारीख शपथविधीसाठी जाहीर करावी लागली. आता १६ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरु होत आहे. त्यासाठी राज्यपाल व सर्वच आमदार एक दिवस आधी नागपुरात दाखल होणे अपेक्षित असते. मग जर मोदींमुळे १५ तारखेला शपथविधी घ्यायची वेळ आली तर मुंबईत कोणीच हजर नसेल? त्यामुळे स्थळ मुंबईएेवजी नागपूर हे ठरवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
तब्बल ३३ वर्षानंतर नागपुरात शपथविधी..
यानिमित्ताने ३३ वर्षानंतर नागपुरात मंत्र्यांच्या शपथविधी साेहळ्याचा योग जुळून आला आहे. तसे तर दरवर्षीच हिवाळी अधिवेशन नागपुरात हेात असते, पण मंत्रिमंडळ शपथविधीचा योग यापूर्वी १९९१ मध्ये आला होता. छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली काही आमदारांनी शिवसेनेत फूट पाडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, तेव्हा भुजबळ यांच्यासह ७ मंत्र्यांचा शपथविधी हिवाळी अधिवेशनावेळी नागपुरात गडबडीत उरकण्यात आला होता. यात छगन भुजबळ, बुलडाण्याचे डॉ. राजेंद्र गोडे, अमरावतीच्या वसुधाताई देशमुख, आमगावचे भरत बाहेकर, ठाण्याचे शंकर नम, बीडचे जयदत्त क्षीरसागर व धुळ्याच्या शालिनी बोरसे यांनी २१ डिसेंबर १९९१ रोजी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. काँग्रेसचे नेते सुधाकरराव नाईक हे तेव्हा मुख्यमंत्री होते. त्यानंतर ३३ वर्षांनी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचा योग जुळून आला आहे. विशेष म्हणजे १९९१ मध्येही मुख्यमंत्री नाईक हे विदर्भातीलच होते, व आताही फडणवीस हेही खुद्द नागपूरचे लोकप्रतिनिधी अाहेत. विदर्भपूत्रांच्या कार्यकाळातच नागपूरला दोन्ही वेळेस हा मान मिळाल्याचा योगायोग यानिमित्ताने जुळून आला आहे.