परळीत पुन्हा जरांगे फॅक्टर, मुंडेविरुद्ध मराठा संघर्ष

लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे विरुद्ध शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे ही अतिशय चुरशीची लढत झाली. यात उमेदवार कोण यापेक्षा कोणत्या जातीचा यावर जास्त प्रचार झाला. मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर भाजपवर वरचढ ठरला व पंकजा मुंडे ६ हजार मतांनी पराभूत झाल्या. आता पुन्हा परळीत मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध हाच डाव टाकण्यात अाला आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष यांना शरद पवार गटात प्रवेश देऊन मुंडेविरोधात परळी विधानसभेसाठी मैदानात उतरवले आहे. मनोज जरांगेंचे ताकदही त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले जाते. आता मराठा विरुद्ध ओबीसीच्या संघर्षाच्या दुसऱ्या लढाईत कोण जिंकेल? या लढाईमागचे राजकारण जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून

अन् २०१४ मध्ये धनंजय मुंडेंचेच आव्हान…

परळी विधानसभा मतदारसंघ हा दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा बालेकिल्ला मानला जातो. स्वत: गोपीनाथराव हा मतदारसंघातून कधी लढले नाहीत, कारण हा मतदारसंघ मुळाच अस्तित्वात आला तो २००९ मध्ये. त्यापूर्वी शेजारच्या रेणापूरमधून मुंडे लढायचे व जिंकूनही यायचे. तेव्हा परळीकर रेणापूरसाठी मतदान करायचे. आता २००९ पासून मुंडेंच्या कन्या पंकजा या मतदारसंघात उभा राहात होत्या. २००९ मध्ये व २०१४ मध्ये त्या विजयी झाल्या. २०१४ मध्ये तर भाऊ धनंजय मुंडे यांचेच त्यांना आव्हान होते, तरी पंकजा विजयी झाल्या. २०१९ मध्ये मात्र उलटफेर झाला व धनंजय विजयी झाले अन‌् पंकजा पराभूत झाल्या. आता सुदैवाने मुंडे परिवारातील वाद मिटले असून धनंजय व पंकजा हे भाऊ- बहिण एकत्र आले आहेत. त्यामुळे परळीतून उभे कोण राहणार? हा प्रश्न होता. पण भाजपने पंकजा यांना विधान परिषद दिली तर धनंजय यांच्यासाठी विधानसभा सोडली होती. म्हणजे दोन्ही भाऊ- बहिणींना आमदारकीचा मार्ग मोकळा झाल्याने त्यांच्यात वादाला पुन्हा नवे कारण राहिले नाही. पंकजा तर सहज आमदार झाल्या. त्यांच्या पाठिंब्यावर धनंजयही पुन्हा विजयी होतील, अशा अटकळी बांधल्या जात होत्या. पण शरद पवारांना धोका देणाऱ्या धनंजय यांना पाडायचेच असा चंग पवार गटाने बांधला असल्याने ते तगड्या उमेदवाराच्या शोधात होते. सुरुवातीला धनंजय यांच्याविरोधात वेगवेगळी नावे पुढे केली जात होती. ५०० गाड‌्यांचा ताफा घेऊन शरद पवार गटात प्रवेश करणारे बबन गिते, संजय दौंड, फुलचंद कराड, राजाभाऊ फड अशी अनेक नावे चर्चेत होती. पण शरद पवारांच्या मनात काही वेगळेच होते. त्यांनी अचानक राजेसाहेब देशमुख यांचे नाव जाहीर करुन सर्वांनाच धक्का दिला.

जरांगेंचा धनंजय मुंडेंवर राग…

राजेसाहेब देशमुख हे काँग्रसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष होते. मात्र शरद पवारांनी त्यांना आपल्या पक्षात घेऊन थेट मुंडेंविरोधात लढण्याची संधी दिली. देशमुख हे मराठा आहेत. बीड जिल्हा परिषद शिक्षण आणि आरोग्य सभापती पद सांभाळले आहे. अंबाजोगाई- परळी परिसरात त्यांचा चांगले वर्चस्व आहे. देशमुख यांच्या उमेदवारीमुळे परळीत पुन्हा ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष रंगणार आहे. बीड लोकसभेत मुंडे भाऊ- बहिणी एकत्र असूनही नवख्या बजरंग सोनवणे यांनी त्यांना धूळ चारली. भाजप व अजित पवार गटाचे आमदार ज्या मतदारसंघात अाहेत तिथूनही सोनवणेंना मतदान झाले. मनोज जरांगे पाटील यांनी भाजपला पाडा, हा कानमंत्र दिल्याचा हा परिणाम होता. मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवरील राग अजूनही कायम आहे. विशेषत: मंत्री धनंजय मुंडेंवर त्यांचा तितकाच राग आहे. मध्यंतरी बीडच्या नांदूरघाटमध्ये दोन गटात दगडफेक झाली होती, त्यामागे मुंडेंचाच हात असल्याचा जरांगेंना संशय आहे.

मुंडे विरुद्ध देशमुख संघर्ष पेटणार?

‘मुंडे बंधू-भगिनींचे कार्यकर्ते मला जिवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. दोघेही आपापल्या कार्यकर्त्यांना माझ्याविरोधात समाज माध्यमांवर पोस्ट टाकायला सांगत आहेत. मला त्या कार्यकर्त्यांना सांगायचं आहे की तुमच्या नेत्यांनाही महाराष्ट्रभर फिरायचं आहे हे लक्षात ठेवा..’ अशी धमकी जरांगे यांनी दिली होती. मध्यंतरी धनंजय मंुंडे रात्री उशिरा एकदा आंतरवली सराटी येथे जाऊन जरांगे यांना भेटले होते. त्यानंतर जरांगे यांचे मंुंडेविषयीचा राग काहीसा शांत झाल्याचे मुंडे समर्थकांचे म्हणणे आहे. पण प्रत्यक्षात तसे दिसत नाही. आता राजेसाहेब देशमुख हा मराठा उमेदवार परळीतून जाहीर झाल्याने तिथे मुंडे विरुद्ध देशमुख हा संघर्ष पेटणार यात शंकाच नाही. परळी मतदारसंघात वंजारी समाजासह ओबीसीचे वर्चस्व आहे. पण मराठा समाजाचीही १ लाखाहून जास्त मते आहेत. दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्याबरोबरच वंजारी समाजातून अजून एखाद- दुसरा वंजारी समाजाचा उमेदवार उभ्या करण्याच्या हालचाली सुरु आहेत. जेणेकरुन ओबीसी मतांचे विभाजन व्हावे. मराठा समाजाची एकगठ्ठा मते जर देशमुख यांना पडली तर मात्र धनंजय मुंडेंना आमदारकी राखणे कठीण होणे आहे.