आमदाराच्या गोळीबाराने भाजप बॅकफूटवर, कल्याण लोकसभेचा नाद सोडावा लागणार
मुंबई : ठाणे जिल्ह्यातील ५० गुंठे जमिनीच्या वादावरुन (Land Controversy in Ulhasnagar) भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड (BJP MLA Ganpat Gaikwad) यांनी शिंदे सेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad Shinde sena) व इतर दोघांवर पोलिस अधिकाऱ्याच्या केबिनमध्येच गोळीबार केल्याचे प्रकरण देशभर गाजले. सुदैवाने यातून महेश गायकवाड व त्याचा सहकारी बचावला असून आमदार गायकवाड हा तुरुंगात गेला आहे. मात्र सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराने आपल्याच मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध एवढे टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. केवळ जमिनीचा वाद, आर्थिक वाद किंवा राजकीय महत्त्वाकांक्षा… याबाबत आपण माहिती घेऊ.
जमिनीच्या वादाचे कारण निमित्त
उल्हासनगर जवळील द्वारली येथील ५० गुंठे जागा आमदार गणपत गायकवाड (BJP MLA Ganpat Gaikwad) यांनी तेथील गावकऱ्यांकडून विकासासाठी घेतली होती. मात्र पूर्ण रक्कम न देताच त्यांनी ती आपल्या नावावर करुन घेतली असा गावकऱ्यांचा आरोप आहे. तसेच जागेचा ताबा घेण्यावरुन आमदार गायकवाड यांनी आम्हाला जातिवाचिक शिविगाळ केल्याचीही त्यांची तक्रार आहे. यावरुन आमदाराविरोधात अॅट्रासिटी गुन्हा दाखल झालेला आहे. ही जमीन गावकऱ्यांना मिळवून देण्यासाठी शिंदे सेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड हस्तक्षेप करत असल्याचा आमदाराचा आरोप आहे. हे प्रकरण कोर्टातही गेले होते. मात्र आमदार गायकवाडकडे सर्व कागदपत्रे असल्याने कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्यामुळे या प्रकरणात हस्तक्षेप करणाऱ्या महेश गायकवाड (Mahesh Gaikwad Shinde sena) विरोधात आमदाराचा मुलगा वैभवने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तिथे महेश गायकवाड आपल्या समर्थकांसह गेला होता. हे समजताच आमदार गायकवाडही तिथे गेले. या दोघांना सामंजस्याने प्रकरण मिटवण्याचे आवाहन करत वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी त्यांना आपल्या केबिनमध्ये बसवले. तुम्ही आपसात चर्चा करा, असे सांगून निरीक्षक बाहेर निघून गेले. मात्र आमदार गायकवाड व महेश गायकवाड यांच्यात तडजोडीची तयारी नव्हती. याच वादातून आमदार गायकवाडने पोलिस निरीक्षकाच्या केबिनमध्येच महेश व इतर दोघांवर सहा गोळ्या झाडल्या. (Firing In police station) यात महेश गंभीर जखमी झाला. त्याच्यावर शस्त्रक्रिया करुन सहा गोळ्या काढाव्या लागल्या. सुदैवाने त्याच्या जीव वाचला. मात्र या प्रकरणामुळे शिवसेना- भाजपात मात्र तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी रुग्णालयात एक तासापेक्षा जास्त वेळ तळ ठोकून परिस्थितीची माहिती घेतली. महेशच्या कुटुंबीयांना व समर्थकांना दिलासा दिला.
खरे कारण मतदारसंघावर दाव्याचे
कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे पूत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) खासदार आहेत. मात्र आता भाजपचा या मतदारसंघावर दावा आहे. भाजपचे ज्येष्ठ मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांनी आक्रमकपणे ही भावना बोलून दाखवली होती. (contravercy on Kalyan Loksabha constituency) इतकेच नव्हे तर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनीही पक्षनिरीक्षक म्हणून दोनदा या मतदारसंघात येऊन कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या होत्या. प्रकरण इतके टोकाला गेले होते की श्रीकांत शिंदे यांनी थेट राजीनाम्याची धमकीही दिली होती. भाजचपच्या या दबावावर पलटवार म्हणून कल्याणपूर्व या भाजपच्या विधानसभा मतदारसंघावर शिंदेसेनेने दावेदारी सुरु केली होती. आमदार गणपत गायकवाड (BJP MLA Ganpat Gaikwad) यांच्या या मतदारसंघात शिंदेसेनेचे महेश गायकवाड यांचे ‘भावी आमदार’ म्हणून पोस्टर लावले गेले. श्रीकांत शिंदेंकडून महेशला पाठबळ दिल्याचा आरोप भाजपकडून होत आहे. आपल्या आमदारकीत अडचणीचा ठरणाऱ्या महेशवर याच रागातून आमदार गायकवाडने गोळीबार केल्याचेही सांगितले जाते.
मुख्यमंत्र्यांमुळे मी गुन्हेगार : गायकवाड
आमदार गायकवाड याने अटकेपूर्वी माध्यमांसमोर आपला गुन्हा कबूल केला. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) त्यांनी प्रचंड रोष व्यक्त केला. ‘एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राला गुन्हेगारांचे राज्य बनवत आहेत. त्यांच्यामुळेच आज माझ्यासारख्या चांगल्या माणसाला गुन्हेगार होण्याची वेळ आली. पोलिस ठाण्याबाहेर जमलेले महेश गायकवाडचे समर्थक माझ्या मुलाला मारहाण करत होते, ते मी कसे सहन करेन? म्हणूनच मी गोळीबार केला. पोलिसांनी डेअरिंग करुन मला थांबवले नसते तर तो वाचला नसता,’ अशी प्रतिक्रिया आमदार गायकवाडने दिली. महाराष्ट्रातून गुन्हेगारी संपवायची असेल तर देवेंद्र फडणवीस व नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्रिपदावरुन राजीनामा घ्यावा,’ अशी मागणीही गायकवाडने केली. यावरुन त्यांच्या मनात मुख्यमंत्र्यांविषयी किती राग आहे हे स्पष्ट होते.
आता भाजपला घ्यावी लागेल तडजोडीची भूमिका
उद्धव ठाकरेंशी बंड करणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देऊन भाजपने त्यांच्या डोक्यावर हात ठेवला होता. इतकेच नव्हे तर शिवसेना पक्षाचे नाव व निवडणूक चिन्हही भाजपच्याच मदतीने शिंदेंना मिळाले आहे, हे आता लपून राहिलेले नाही. या उपकाराची परतफेड म्हणून लोकसभा निवडणुकीत २०१९ मध्ये शिवसेनेने जिंकलेले काही मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्याचे डावपेच भाजपने आखले होते. त्यात थेट मुख्यमंत्र्यांचा पूत्र श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघावरही भाजपने दावा सांगितला होता. तो शिंदेसेनेला पटला नाही, मात्र उपकाराच्या ओझ्याखाली असल्याने शिंदेसेनेचे नेते थेट भाजपविरोधात बोलण्यास धजावत नव्हते. मात्र आता भाजपच्या एका आमदाराने मर्यादा ओलांडून शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याने शिंदेसेनेला भाजपवर आक्रमक होण्यास ठोस निमित्त मिळाले आहे. म्हणूनच शिंदे सेनेच्या ७ मंत्र्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेऊन गणपत गायकवाड यांची आमदारकी काढून घेण्याची मागणी केली आहे. निमित्त गायकवाडवर कारवाईचे असले तरी भाजपचा वाढत जाणारा दबाव लोकसभा निवडणुकीपूर्वी झुगारुन देण्याची चालून आलेल्या संधीचा फायदा घेण्याची रणनिती शिंदेसेनेने आखली आहे. आता कल्याण मतदारसंघच नव्हे तर शिवसेनेसाठी मजबूत असलेल्या इतर कोणत्याही मतदारसंघावर भाजपला दावा करता येणार नाही, इतका दबाव शिंदेसेना वाढवेल, यात शंकाच नाही.
भाजप हायकमांडवरही दबाव
एकूणच या प्रकरणाच्या निमित्ताने आगामी लोकसभा व पुढच्या विधानसभा निवडणुकीत जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदेसेना भाजपच्या दबावाखाली झुकून न जाता आपल्या हक्कासाठी आक्रमकपणे लढताना दिसू शकते. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महायुतीत आगमनामुळे शिंदेसेनेच्या वाट्याचे जी मंत्रिपदे गेली आहेत त्याचीही भरपाई करण्यासाठी, लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठीही भाजपच्या हायकमांडवर शिंदेसेनेकडून दबाव वाढवला जाऊ शकतो.
आमदार गायकवाड यांच्या गोळीबाराचे भाजप हायकमांडही समर्थन करणार नाही. महायुतीत नाराजीच्या मिठाचा खडा पडू नये म्हणून त्यांच्याकडूनही शिंदेसेनेची समजूत काढण्याचे प्रयत्न केले जातील. यातून शिंदेसेनेच्या काही मागण्याही नाईलाजाने का होईना मान्य करण्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासमोर पर्याय नसेल.