महाराष्ट्रातून भाजपचा एकही उमेदवार जाहीर नाही, पण मुंबईच्या या पठ्ठ्याने मिळवले थेट उत्तर प्रदेशातून तिकिट

काँग्रेसमधून भाजपात आलेल्या कृपाशंकर सिंह यांना जौनपूरमधून उमेदवारी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह १९५ जणांच्या लोकसभा उमेदवारांची यादी BJP Lok Sabha Candidate भाजपने नुकतीच जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पाच वेळा निवडून आलेले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रितम किंवा पंकजा मुंडे, २०१९ मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्यांनी निवडून आलेले गोपाळ शेट्टी आदी दिग्गज उमेदवारांची नावे कुठे अडली, याचा शोध राजकीय विश्लेषक घेत आहेत. असे असताना काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या मुंबईच्या एका नेत्याने मात्र थेट उत्तर प्रदेशातून उमेदवारी मिळवली आहे, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या ज्येष्ठ नेत्याचे नाव आहे कृपाशंकर सिंह. काँग्रेसच्या काळात गृह राज्यमंत्रिपदावर राहिलेल्या कृपाशंकर यांना आता भाजपने जौनपूर या त्यांच्या मुळ गाव असलेल्या मतदारसंघातून तिकिट दिले आहे.
कृपाशंकर सिंह हे मुंबई काँग्रेसमधील एकेकाळचे बडे प्रस्थ. सुमारे ४० वर्षे त्यांनी काँग्रेसमध्ये विविध पदावर काम केले. मुंबईतील उत्तर भारतीयांचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय अशीही त्यांची ओळख होती. मात्र मधल्या काळात बेनामी संपत्तीच्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या केसमध्ये ते चांगलेच अडकले होते. यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना भाजपात प्रवेश हाच एकमेव मार्ग दिसत होता. त्याच भाजपने काश्मीरातील ३७० कलम हटवल्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला राहूल गांधींनी विरोध केल्याचे निमित्त करुन कृपाशंकर यांनी त्यांच्याविरोधी मत प्रदर्शित केले. याच मतभेदाचे कारण पुढे करत कृपाशंकर यांनी भाजपचा रस्ता धरला.
भाजपात प्रवेश केल्यापासून त्यांच्यावर फारशी मोठी जबाबदारी देण्यात आली नव्हती. मात्र आता लोकसभा निवडणुकीत त्यांना त्यांचे मुळ गाव असलेल्या जौनपूर (उत्तर प्रदेश) मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. गेली ५० हून अनेक वर्षे मुंबईत स्थायिक असलेल्या कृपाशंकर यांना गावाकडून तिकिट मिळाल्याचा खूप आनंद झाला आहे. आपल्या मातृभूमीची सेवा करण्याची संधी या निमित्ताने भाजपने आपल्याला दिली असल्याचे ते सांगतात.

भाजपला का हवीय कृपाशंकरांची साथ
Why BJP needs Kripashankar’s support

  •  मुंबईत मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय मतदार आहेत. आतापर्यंत ते काँग्रेसशी एकनिष्ठ होते. मात्र गेल्या १० वर्षात काँग्रेसची पडझड झाल्यानंतर हा समाज हळूहळू काँग्रेसपासून दुरावला आहे. त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.
  • लोकसभा, विधानसभा निवडणुकीसोबतच मुंबई मनपा ताब्यात घेण्याचेही भाजपचे ध्येय आहे. कृपाशंकर यांना पुढे करुन ही उत्तर भारतीय मतदारांची व्होटबँक भाजप आपल्याकडे खेचून आणण्यासाठी धडपड करत आहे.
  • मुंबईत भाजपच्या वाट्याला तीन किंवा चार लोकसभा मतदारसंघ येऊ शकतात. तिथे उमेदवारीसाठी निष्ठावंत नेत्यांमध्येच खूप स्पर्धा आहे. त्यांना डावलून कृपाशंकर यांना उमेदवारी दिल्यास पक्षात नाराजी वाढू शकते.
  • राज ठाकरेंचा मनसे पक्षाची भाजपशी जवळीक वाढत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी दोन हात करण्यासाठी भाजप मनसेचा ‘बी’ टीम म्हणून वापर करु पाहते. मात्र मनसेचा उत्तर भारतीयांना विरोध आहे. अशातच कृपाशंकर यांना मुंबईतून उमेदवारी दिली तर मनसेकडून विरोध होऊ शकतो. शिवसेनेकडूनही या मुद्द्याचे भांडवल केले जाऊ शकते. म्हणून कृपाशंकर यांना भाजपने मुंबईतून उमेदवारी दिली नाही.

    गेल्यावेळी गमावलेल्या जागेवर कृपाशंकर यांना भाजपने मैदानात उतरवले

    BJP fielded Kripashankar from the seat he lost last time

  • कृपाशंकरसारखा नेता सोबत हवा असल्याने अखेर मधला मार्ग काढत भाजपने त्यांना उत्तर प्रदेशातून त्यांच्या मुळ गावातून उमेदवारी दिली. उत्तर प्रदेशात भाजपचे चांगले वर्चस्व आहे. २०१९ मध्ये भाजपने ८० पैकी ६२ जागा त्या राज्यात जिंकल्या होत्या. मात्र जौनपूर मतदारसंघात त्यांना बसपाकडून पराभव पत्कारावा लागला होता. म्हणून गेल्यावेळी गमावलेल्या या जागेवर स्थानिक कृपाशंकर यांना भाजपने मैदानात उतरवले आहे.

https://missionpolitics.com/kripa-shankar-singh-gets-lok-sabha-ticket-bjp-jaunpur/

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics