गेली ५ वर्षे भाजपशी नाराज असूनही महायुतीत बळजबरीने मुक्काम ठोकलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी अखेर महायुतीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व २८८ जागा स्वबळावर लढवण्याची घोषणा जानकरांनी केलीय. आता जानकरांना २८८ उमेदवार मिळतील की नाही? याची चिंता इतरांनी करायची गरज नाही. काहीतरी विचार करुनच त्यांनी निर्णय घेतला असेलच ना… पण जानकरांच्या या निर्णयामागे खरंच स्वबळाची ताकद आजमावण्याचा हेतू आहे का, की आघाडीकडे वळणारी मते फोडण्यासाठी भाजपनेच रचलेला हा बी प्लॅन आहे.
आमची ताकद आम्ही आजमावणार..!
महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आलेली असताना महादेव जानकर यांनी आपला रासप पक्ष महायुतीतून बाहेर पडून २८८ जागा स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली. ते म्हणतात….‘आम्ही रासपसाठी महायुतीकडे 40 ते 50 जागांची मागणी केली होती. मात्र त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मी कुणावर नाराज नाही. महायुतीवरही नाही आणि महाविकास आघाडीवरही नाही. आमचा पक्ष देशात मोठा झाला पाहिजे. त्यासाठी आम्ही स्वतंत्र लढणार असल्याचे जानकर यांनी म्हटले आहे. काँग्रेस आणि भाजपच्या लायकीत राष्ट्रीय समाज पक्ष आला पाहिजे. आमची ताकद आम्ही आजमावणार आहोत. आम्ही सर्वच्या सर्व 288 जागा लढवू.
भाजपच्या कृपेने झाले होते आमदार…
सध्या जानकरांच्या पक्षाचा महाराष्ट्र विधानसभेत फक्त एक आमदार आहे, ते म्हणजे गंगाखेडचे रत्नाकर गुट्टे. निवडणूक लढवतानाही ते तुरुंगातच होते. अनेक वर्षे त्यांनी तुरुंगातूनच आमदारकी उपभोगली. शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्जे उचलून कोट्यवधी रुपये लाटल्याच्या आरोपावरुन या रासपच्या एकमेव आमदाराला न्यायालयाने तुरुंगवास घडवला. पण जनतेने याच नेत्याला तुरुंगात असताना निवडून आणले, अशी ही आपली लोकशाही…असो.. तर रासपाचा विधानसभेत एकमेव आमदार आहे. विधान परिषदेत स्वत: पक्षप्रमुख महादेव जानकर हे भाजपच्या कृपेने आमदार झाले होते. फडणवीस यांच्या काळात त्यांना अल्प काळ का होईना मंत्रिपदही मिळाले. पण विधान परिषदेचा कार्यकाळ संपल्यावर भाजपने त्यांना पुन्हा संधी दिली नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना परभणीतून महायुतीच्या तिकिटावर उभे केले खरे, पण जानकर पराभूत झाले. त्यांचे विधानसभेचील एकमेव आमदारही आता रासपमध्ये राहण्याच्या मन:स्थितीत नाहीत. अशा स्थितीत जानकरांनी आपल्या पक्षाचे २८८ उमेदवार उभे करण्याचे जे धाडस दाखवले आहे. ते खरोखरच सलाम करण्याच्या पात्रतेचे आहे.
भाजपचाच प्लॅन असू शकतो का?
पण या धाडसामागे भाजपचा प्लॅन असल्याचा संशय काही लोकांना येऊ लागलाय. याचे कारण आपण जाणून घेऊ या…महादेव जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत. हा समाज अनुसुचित जमातीतून म्हणजेच एसटीतून आरक्षण मिळवण्यासाठी सरकार दरबारी भांडतोय. पण सरकार काही त्यांच्या मागण्या पूर्ण करु शकलेली नाही. त्यामुळे हा समाज महायुती सरकारवर नाराज आहे. आपले जानकर नेते युतीत असले तरी लोकसभा निवडणुकीत धनगर समाजाने कुणाचीच भीडभाड न ठेवता युतीविरोधात मतदान करुन रोष व्यक्त केला. आता विधानसभेलाही हेच चित्र अाहे. कारण या समाजाची आरक्षणाची मागणी अजूनही आश्वासनात खितपत पडलीय.
जानकरांच्या भूमिकेमागे असे आडाखे?
दुसरीकडे, राज्यात विधानसभेचे ५० ते ६० मतदारसंघ असे अाहेत की जिथे धनगर समाजाने ज्याला एकगठ्ठा मतदान केले तो उमेदवार निवडून येतो. लोकसभेत हीच ताकद धनगर समाजाने युतीविरोधात म्हणजे महाविकास आघाडीच्या पाठीशी उभी केली. त्यामुळे आघाडीचे जास्त खासदार निवडून येऊ शकले. आता विधानसभेपूर्वी या समाजाचा रोष कमी करणे सरकारला शक्य झालेले नाही. त्यामुळे हा समाज महायुतीला मतदान करण्याची शक्यता कमीच असल्याचे सरकारही जाणतेय. पण त्यांचे मतदान लोकसभेप्रमाणे आघाडीला एकगठ्ठा जाऊ नये, अशी व्यवस्था सत्ताधाऱ्यांनी करुन ठेवलीय. जानकरांची स्वबळावर २८८ जागा लढवण्याची घोषणा हा त्याच बी प्लॅनचा भाग असल्याचे राजकीय तज्ञांना वाटते.जानकर २८८ म्हणत असले तरी धनगरबहुल मतदारसंघात ५० ते ६० ठिकाणी ते आवर्जुन उमेदवार उभे करतील. तिथे सत्ताधाऱ्यांविरोधातील मतदान महाआघाडी व रासप असे विभागले जाईल. सध्या राज्यात जातीच्या उमेदवाराला मतदान करण्याचा ट्रेंड रुढ झालाय. त्यामुळे बहुतांश मतदार जानकरांच्या रासपला मते देतील, असे भाजपला वाटते. त्यामुळे आपसुकच महाआघाडीचे मताधिक्य कमी होईल व युतीच्या विजयाचा मार्ग मोकळा होईल, असे आडाखे जानकरांच्या भूमिकेमागे लावले जात आहेत.