अबू आझमी- नवाब मलिकांना चीतपट करणार शिंदेंचा पठ्ठ्या

महाराष्ट्रातील मुस्लिमबहुल मतदारसंघांपैकी एक महत्त्वाचा मतदारसंघ असलेला मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघात यंदा समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व चार वेळा विजयी झालेले आमदार आबू आझमी यंदा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्याशी त्यांची अटीतटीची लढत होत आहे. या शिवाय शिंदेसेना व एमआयएम या दोन पक्षाचे प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवारही या मतदारसंघात चर्चेत आहेत. या चौरंगी लढतीत व मुस्लिम बहूल मतदारसंघात मुस्लिम मतांचे विभाजन होऊन चक्क शिंदेसेनेचा उमेदवार ‘चमत्कार’ घडवू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. काय आहे या मतदारसंघाचे समीकरण जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून….

अबू आझमींचे मतदारसंघावर वर्चस्व…

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी शिवाजीनगर- मानखुर्द मतदारसंघातून २० वर्षांपासून आमदार म्हणून निवडून येत आहेत. या मतदारसंघावर त्यांचे चांगले वर्चस्व आहे. मात्र यंदा शेजारच्या अणुशक्तीनगर मतदारसंघातून इकडे स्थलांतरीत झालेले अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांचे अाझमी यांच्यासमोर कडवे आव्हान आहे. या मतदारसंघात ५० टक्क्यांहून अधिक मुस्लीम मतदार आहेत. त्यामुळे हे मतदार अबू आझमी यांनाच पुन्हा संधी देतात की नवाब मलिक यांच्या रुपाने आपल्या मतदारसंघासाठी नवीन चेहरा निवडतात हे महत्त्वाचे आहे. मात्र दोघांपुरतीच ही लढत मर्यादित राहिलेली नाही. कारण एमआयएम पक्षाचे अतीक अहमद खान हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेचे शिंदेसेनेचे नेते सुरेश पाटील हे एकमेव प्रमुख हिंदु उमेदवार इथे तीन मुस्लिम उमेदवारांविरोधात उभे आहेत. मुस्लिमांशिवाय असलेल्या ४५ ते ५० टक्के हिंदू व इतर जाती- धर्माच्या मतांवर सुरेश पाटील यांची भिस्त आहे. मुस्लिम समाजातील मतदान तीन प्रमुख उमेदवारात विभाजन झाले तर आपला मार्ग सुकर असल्याचे पाटील यांना वाटते.

प्रतिस्पर्धींची एकाच पक्षातून कारकिर्द सुरु…

एमआयएम पक्षाचे अतीक अहमद खान हे स्थानिक उमेदवारही त्यांच्याश सहमत आहेत. यावेळी मुस्लीम मतदारांमध्ये फूट पडण्याची शक्यता असून शिवसेनेचा उमेदवार जिंकण्याची शक्यता त्यांनाही वाटते. विशेष म्हणजे भाजपने नवाब मलिक यांचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केल्यामुळे त्यांची मदतही पाटील यांनाच होणार यात शंकाच नाही. अबू आझमी यांनी २००९ पासून तीन वेळा याठिकाणी विजय मिळविला आहे. २०१९ साली त्यांनी शिवसेनेच्या विठ्ठल लोकरे यांचा २५ हजारांच्या मताधिक्याने पराभव केला होता. महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे, इथे दोन प्रमुख प्रतिस्पर्धी असलेले अबू आझमी आणि नवाब मलिक या दोघांच्या राजकीय कारकि‍र्दीची सुरुवात समाजवादी पक्षातून झाली होती. १९९६ साली नवाब मलिक हे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्या नेतृत्वाखाली नेहरूनगर येथून समाजवादी पक्षाच्या तिकीटावर विजयी झाले होते. पण पुढे नवाब मलिक मंत्री झाले व आबू आझमी यांच्या राजकारणाला मात्र उतरती कळा लागली. त्यामुळे दोघांमध्ये मतभेद वाढले. परिणामी २००१ मध्ये अबू आझमी यांनी नवाब मलिक यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

अमली पदार्थांच्या व्यापारावर चाप आणण्याचे आश्वासन…

अबू आझमी यांची ४ टर्म झाल्यामुळे त्यांच्याविरोधात अॅन्टी इन्कबन्सी आहे. तर नवाब मलिकांकडून इथल्या मतदारांना अपेक्षा आहेत. पण त्यांच्यावर देशद्रोहाचे अारोप असून सध्या ते जामिनावर बाहेर असल्याने पुन्हा कधी तुरुंगात जातील याचा नेम नाही. त्यामुळे मतदार त्यांच्यावरही फारसा विश्वास टाकू शकत नाहीत. गुन्हेगारी, अमली पदार्थाचे जाळे, बायोमेडिकल कचऱ्याचा प्रकल्पातून होणारे प्रदूषण, शिक्षण आणि वैद्यकीय याच्या अपुऱ्या सुविधा हे मानखूर्द – शिवाजी नगर मतदारसंघातील महत्त्वाचे मुद्दे आहेत. अबू आझमी हे प्रश्न सोडवू न शकल्यामुळे त्यांच्याविरोधात नाराजीची लाट आहे, त्याचाही परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो. हे ज्वलंत प्रश्न अबू आझमी यांच्या विरोधात जाऊ शकतात. नवाब मलिक, अतिक खान आणि सुरेश पाटील यांनी मतदारसंघातील अमली पदार्थांच्या व्यापारावर चाप आणण्याचे आश्वासन दिले आहे.

2014 साली सुरेश पाटलांचा पराभव…

सुरेश पाटील आणि अबू आझमी २०१४ साली देखील आमने सामने आले होते. तेव्हा आझमी यांचा केवळ १० हजार मतांनी विजय झाला होता. दुसरीकडे बाजूलाच असलेल्या अणुशक्ती नगर मतदारसंघातून नवाब मलिक दोन वेळा आमदार राहिलेले आहेत. यावेळी त्यांची मुलगी सना मलिक याठिकाणाहून निवडणूक लढवत आहेत. आपल्याच घरात दोन- दोन आमदार रहावे या उद्देशाने नवाब मलिक यांनी शिवाजीनगर- मानखुर्द मतदारसंघ निवडला व आपला पारंपारिक अणुशक्तीनगर मतदारसंघ मुलीला दिला. सना मलिक व नवाब मलिक यांना अजित पवार गटाची उमेदवारी आहे. पण तरीही देशद्रोहाचे आरोप असल्याने नवाब मलिक यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका भाजप व शिंदेसेनेने घेतलेली आहे. अबू आझमी यांनी मतदारसंघात बरीच कामे केली असल्याचे काही लोकांचे मत आहे. तर काही मतदारांच्या मते एमआयएमचे उमेदवार स्थानिक असल्यामुळे त्यांनाच निवडणुकीत फायदा होईल, असे म्हटले जाते. पण मुस्लिमांशिवाय असलेल्या ४५ ते ५० टक्के मतदानाच्या जोरावर सुरेश पाटील हे मात्र विजय आपलाच असल्याचा दावा करतात. आता मुस्लिमबहुल मतदारसंघातून निवडून येण्याचा चमत्कार सुरेश पाटील दाखवू शकतात का? हे आपल्याला २३ नोव्हेंबर रोजीच कळू शकेल.