जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम; पण राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण?

आता पुढची पाच वर्षे सत्तेविना, विरोधी बाकावर बसून, आंदोलने करत काढायचीय या कल्पनेनेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. पक्ष स्थापनेपासून या राष्ट्रवादीने मधला फडणवीस सरकारचा पाच वर्षांचा कार्यकाळाचा अपवाद सोडला तर कायम सत्ताच उपभोगली आहे. आताही आपलाच एक गट सत्तेत व आपण सत्तेच्या उंबरठ्याबाहेर असल्याने हे नेते अस्वस्थ आहेत. म्हणूनच ‘अजित पवारांकडे चला’ असा घोषा त्यांनी शरद पवारांकडे लावला आहे. आता शरद पवार त्यांचा हा हट्ट मान्य करण्याच्या मूडमध्ये सध्या तरी दिसत नाहीत. या उद्वेगातून परवा मुंबईच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी किमान प्रदेशाध्यक्ष तरी बदला, तरुणांच्या हाती पक्षाची सूत्रे द्या अशी आग्रही मागणी केली. यातून अजित पवार गटात जाण्यास विरोध करणाऱ्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचे मनसुबेही उघड झाले.. काय आहे या मागचे राजकारण.. जाणून घेऊ या मिशन पॉलिटिक्समधून

पवारांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी नामुष्की…

विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाचे चिंतन शिबिर नुकतेच मुंबईत झाले. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपण कुठे चुकलो, लोकसभेतील यशाच्या भरोशावर कसे अवलंबून राहिलो अशी कारणमिमांसा मांडली. केवळ शरद पवार या एका नावाच्या करीष्म्यावर हा पक्ष अवलंबून राहिला. लोकसभेत याच नावाने त्यांना प्रचंड यश मिळवून दिले होते, तोच करिष्मा विधानसभेतही राहिल, अशी भोळी आशा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वाटत होती. पण झाले उलटेच. आतापर्यंत शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीत इतकी नामुष्की कधीच आली नाही तेवढी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पहायला मिळाली. या पक्षाचे अवघे १० आमदार निवडून आले. याउलट लोकसभेत नामुष्की ओढावलेल्या अजित पवार गटाचे मात्र विधानसभेत ४१ आमदार निवडून आले. आता हे ४१ आमदार सत्तेची उब उपभोगत आहेत व शरद पवार गटाचे आमदार, पदाधिकारी विरोधी बाकावर अाहेत.

अजित दादांचा पर्याय सध्या तरी नाही…

राष्ट्रवादी पक्षाची स्थापना १९९९ मध्ये झाली. २०१४ ते २०१९ हा पाच वर्षाच्या कार्यकाळाचा अपवाद वगळला तर १९९९ पासून हा पक्ष कायम सत्तेत अाहे. २०२२ ते २०२४ या अडीच वर्षात शिंदे सरकारच्या कार्यकाळातही याच राष्ट्रवादीतील एक गट सत्तेत जाऊन बसला होता व शरद पवारांसोबत काठावर असलेल्यांना खुणावत होता. आता मात्र पुढची पाच वर्षे आपल्याला सत्तेविना काढायची आहेत, केवळ आंदोलने करत काढायची अाहेत या विचाराने शरद पवारांसोबत राहिलेेले नेते व पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत. अापणही अजित पवारांसोबत सत्तेत जावे, पक्ष विलिन करुन टाकावा अशा मागणीचा घोषा काही आमदार, खासदारांनी शरद पवारांकडे लावला आहे. अर्थात ही फक्त आमदार, खासदारांची मागणी नसून पदाधिकारी- कार्यकर्त्यांची हीच भावना आहे. पण शरद पवार तूर्त त्याला तयार नाहीत. याचे कारण म्हणजे एका अपयशाने खचून जाणारे नेते शरद पवार नाहीत. तसेच राजकारणात गेली ५५ वर्षे कमावलेले नाव पुतण्या अजित पवारांसमोर शरण जाऊन ते धुळीस मिळवू इच्छित नाहीत. शरद पवार यांनी आतापर्यंत होते नव्हते ते सारे गमावले आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही. अन‌् आतापर्यंत त्यांनी स्वत: सर्वच प्रमुख पदे भूषवली आहेत त्यामुळे आता त्यांना नवीन काही मिळवायची नाही. फक्त चिंता अाहे ती आपल्या वारसदारांच्या पुनर्वसनाची.

तरुणांच्या हाती सूत्रे देण्याचे सुतोवाच…

सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद देण्याच्या ऑफर अनेकदा शरद पवारांकडे आल्या. पण त्यांनी त्यावर अजून तरी सकारात्मक विचार केलेला नाही. पण आता मात्र पवारांना पक्षातून दबाव वाढत आहे. दोन्ही गट विलिन करा, अजित पवारांच्या नेतृत्वात सत्तेत चला, असा आग्रह तळागाळातून होत आहे. पण स्वत: शरद पवारांसह जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांच्यासारखे नेते मात्र अजून त्यावर सहमत नाहीत. हे नेतेच शरद पवारांना विलिनीकरणाचा निर्णय घेऊ देत नाहीत, असा समज दुसऱ्या फळीत आहे. म्हणूनच या आव्हाड, जयंत पाटील यांच्याविरोधात कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे. त्याचेच पडसाद राष्ट्रवादीच्या बैठकीत उमटले. पराभवाचे मंथन करण्यासाठी बोलावलेल्या या बैठकीत आपण कुठे चुकलो हे शरद पवारांनी सांगितले. आयुष्यात प्रथमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीचे कौतुक करुन शरद पवार यांनी आपण लोकसभेच्या यशामुळे कसे गाफिल राहिलो व संघ परिवाराने लोकसभेतील अपयशानंतर कसे चिकाटीने काम करुन मतदारांना आपलेसे केले हेही पवारांनी सांगितले. अाता यापुढे तरुणांच्या हाती पक्षाची सूत्रे देण्याचे सुतोवाचही त्यांनी केले. आता पुढच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत. त्यामुळे मनपा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आता ५० % महिलांना उमेदवारी देणे बंधनकारक आहेच. पण उर्वरित जागांवर तरुणांना व प्रस्थापित घराण्यांशिवाय नव्या दमाच्या तरुणांना, ज्यांना राजकीय वारसा नाही अशा तरुणांना उमेदवारी देण्याचा निर्णय पवारांनी या बैठकीत जाहीर केला.

अन् जयंत पाटील संतापले…

मात्र त्याही पुढे जाऊन पक्षाचा प्रदेशाध्यक्षच तरुण नेमा, अशी आग्रही मागणी या बैठकीत पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.‘पक्षसंघटना वाढीसाठी पूर्णवेळ देऊ शकेल असा तरुण प्रदेशाध्यक्ष नेमा. सर्व कार्यकारिण्या बरखास्त करुन नव्याने नेमा, तरच पक्षाच नवचैतन्य येईल’ अशी आर्त भावना पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांसमोर व्यक्त केली. एकूणच जयंत पाटील यांना बदला, असाच या मागणीतील सूर होता. त्यामुळे जयंत पाटीलही संतापले. विधानसभा कोणी किती काम केले याचा आधी हिशेब द्या? मी आठ दिवसांत प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतो, अशी उद‌्विग्न विचार त्यांनी पवारांसमोर मांडले. आरेाप करणे सोपे असते, चांगला माणूस शोधणे अवघड असते, असे सांगत त्यांनी स्वत:लाच चांगला माणूस असल्याची पावतीही देऊन टाकली. प्रदेशाध्यक्ष बदलाची पक्षातून तीव्र भावना व्यक्त होत असताना शरद पवारांनी अजून आपली काहीच भूमिका मांडलेली नाही. पण ते यावर निश्चित विचार करतील, असे पदाधिकाऱ्यांना वाटते. जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवा ही मागणी तशी जुनीच अाहे. अजित पवारांच्या गटाने बंड केल्यानंतर त्यांच्या प्रत्येक नेत्याच्या बोलण्यातून जयंत पाटलांबाबत रोष व्यक्त होत होता. या पदाचा कार्यकाळ पूर्ण झाला तरी जयंतराव पद सोडायला तयार नव्हते, अशा तक्रारीही त्यावेळी जाहीरपणे मांडण्यात आल्या. पण त्याची दखल शरद पवारांनी घेतली नाही. परिणामी पक्षफुटीचे संकट त्यांना स्वत:हून ओढवून घ्यावे लागले.

अजित दादा गटाकडून विविध ऑफर्स..?

आताही राष्ट्रवादीत पुन्हा फूट पडणे अटळ आहे. अजित पवारांकडील सत्ता अनेकांना खुणावत आहे. शरद पवार व त्यांच्या निकटवर्तीयांना अनेक वर्षे सत्ता उपभोगली आहे. अापण त्यापासून वंचित का राहयचे? असे पदाधिकाऱ्यांना, पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदार- खासदारांना वाटत आहे. त्यातच अजित पवार गटाकडूनही या लोकांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ‘बाप- लेकीला सोडा, बाकीचे ८ खासदार दादांसोबत या’ अशा ऑफर्स दिल्या जात असल्याचा गौप्यस्फोट नुकताच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. यात कितपत तथ्य आहे? याबाबत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत काथ्याकूट सुरु आहे. पण आता शरद पवार गटातील सत्तेत जाण्यास इच्छूक आमदार, खासदारांना व पदाधिकाऱ्यांना फारशा आग्रहाची गरज पडणार नाही. अजित पवार गटाने नुसते खुणावले तरी ते तिकडे सत्तेच्या मैदानात उडी मारुन जाण्यास आतूर झाल्याचे दिसत आहे. यामुळे शरद पवारांनी निर्णय घेतला नाही तरी त्यांच्या गोटातील अनेक नेते अजित पवारांकडे जाणार हे अटळ आहे.

नव्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाची लागणार वर्णी..?

आता उरलेला पक्ष सांभाळण्यासाठी तरी सक्षम नेते निवडा, एवढाच पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे. तरुणाईच्या हाती पक्ष द्यायचा असेल तर आमदार रोहित पवार किंवा आमदार रोहित आरआर पाटील यांच्या हाती प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे द्या, अशी मागणीही केली जात अाहे. म्हणजे नेतृत्व बदलले तरी घराणेशाही मात्र पक्षाच कायम राहणार असेच दिसते. कारण रोहित पवार हे शरद पवारांचे नातू अाहेत तर रोहित पाटील हे दिवंगत नेते आरआर पाटील यांचे पूत्र आहेत. ते प्रथमच आमदार झालेले आहेत. आधीच शरद पवारांनी आपली मुलगी सुप्रिया सुळे यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्षपद दिलेले आहे. अाता रोहित पवार यांना प्रदेशाध्यक्ष बनवून हे पदही पवार घरातच ठेवतील का? याविषयी शंका आहे. तर रोहित पाटील हे अगदीच नवखे आहेत. त्यामुळे शरद पवार प्रदेशाध्यक्ष पदासाठी कुणाची निवड करतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.