मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २०२३ व २०२४ या वर्षात जो तीव्र लढा उभारला होता, त्यामुळे गेली वर्ष- दीड वर्षांपासून हे आंदोलन खूप गाजले. त्याला काउंटर करण्यासाठी ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके पाटील हेही रस्त्यावर उतरले होते. या आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे व हाके यांच्यात जोरदार राजकीय लढाई झाली. यात काेण जिंकलं कोण हारलं हा भाग बाजूला ठेऊ या. पण आता २०२५ नवीन वर्षात हे दोन्ही आंदोलक पुन्हा एकदा आमने- सामने आले आहेत. यावेळी निमित्त आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपींना कठोर शासन करण्याचे… या निमित्ताने पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांमध्ये आरपारची लढाई सुरू झालीय… खरंच समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी दोन्ही नेते लढत आहेत की कुणी राजकीय नेते त्यांचा स्वार्थासाठी वापर करून घेतंय.. मिशन पॉलिटिक्समधून जाणून घेऊ या आंदोलनामागे नेमकं आहे काय..
सुरेश धसांनी तापवला मुद्दा…

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा आता एकट्या बीडपुरता किंवा मराठवाड्यापुरता राहिलेला नाही. भाजप आमदार सुरेश धस यांनी हा मुद्दा इतका तापवला आहे की राज्यभर त्याचे पडसाद उमटत आहेत. या प्रकरणात ७ संशयित आरोपींना अटक झाली आहे, मात्र खरा संशय ज्याच्या आहे तो वाल्मीक कराड खंडणी प्रकरणात तुुरुंगात असला तरी अजूनही त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल झालेला नाही. व त्याला अभय देणारे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही कारवाई झालेली नाही. या दोन्ही प्रमुख मागण्यांसाठी भाजपचे आमदार सुरेश धस सध्या आक्रमक झालेले आहेत. सुरुवातीच्या काळात स्थानिक बीड जिल्ह्यातील आमदार संदीप क्षीरसागर यांच्या साथीने धस यांनी ही लढाई सुरु केली. मात्र पाहता पाहता त्याला राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, औशाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार, आमदार जितेंद्र आव्हाड इतकेच काय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची साथ मिळू लागली. देशमुखांना न्याय देण्याच्या मागणीसाठी आमदार धस यांच्या नेतृत्वात मराठवाड्यात व त्याबाहेर पुण्यापर्यंत मोर्चे निघाले, आंदेालने झाली. आता या मोर्चात मनोज जरांगे पाटील यांनीही सहभाग घेतला आहे. मराठा समाजाला त्रास देणाऱ्यांना घरात घुसून मारु, असा आक्रमक इशारा जरांगे यांनी परभणीच्या मोर्चातून दिला होता. त्यामुळे वातावरण अधिकच तापले आहे.
अन् मुख्यमंत्र्यांवर मुंडेंच्या राजीनाम्यासाठी वाढला दबाव…

असे म्हटले जाते की, दिवंगत संतोष देशमुख हे मराठा समाजातील होते. त्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी एक मराठा आंदोलक म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी यात उडी घेतली आहे. तर ज्यांच्यावर संशय आहे ते वाल्मीक कराड व इतर अटकेत असलेल्या आरोपींपैकी बहुतांश जण हे वंजारी समाजाचे आहेत. या देशमुख प्रकरणाच्या माध्यमातून ज्यांना टार्गेट केले जातेय ते कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे हेही वंजारी आहेत. ओबीसी समाजाचे नेते आहेत. तसेच मुंडे व कराड यांच्याविरोधात आंदोलन करणारे प्रमुख नेते धस, प्रकाश सोळंके हेही मराठा नेते आहेत. जरांगे तर मराठा आंदोलनाचे प्रमुख नेते आहेतच. त्यामुळे आता या लढ्याकडे जातीय दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. म्हणजे देशमुख या मराठा सरपंचाच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी पक्षीय भेदभाव बाजूला ठेऊन मराठा आमदार मैदानात उतरले आहेत. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला आहे.
लक्ष्मण हाकेंचे आरोप…

या पार्श्वभूमीवर या विरोधकांवर काउंटर अॅटॅक करण्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेही मैदानात उतरले आहेत. ओबीसी नेते धनंजय मुंडे, त्यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांचा देशमुख खून प्रकरणात काहीही संबंध नाही. केवळ राजकीय सूडबुद्धीने त्यांना अडकवले जात असल्याचे हाके सांगत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये हाके यांच्या उपस्थितीत नुकताच ओबीसी समाजाचा एक कार्यक्रम झाला. त्यात दिवंगत संतोष देशमुख व परभणीचे दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पण नंतर मात्र मुंडेंविरोधात लढणाऱ्या सर्व मराठा नेत्यांचा हाके यांनी समाचार घेतला. ‘संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण केलं जात आहे. एका समाजाच्या विरोधात गरळ ओकण्याचं काम सुरु आहे. काही तरुणांना तुम्ही टार्गेट करण्याचं काम करत आहात. एखादा व्यक्ती आमदार किंवा खासदार झाल्यानंतर ते सर्वांचे आमदार, खासदार असतात. पण संतोष देशमुख यांच्या श्रद्धांजली सभेत तुम्ही राजकीय नेत्यांना टार्गेट करता. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचं गांभीर्य सुरेश धस आणि मनोज जरांगेंनी कमी केलं आहे”, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
मराठा आणि ओबीसी आंदोलकांचे नेते पुन्हा राजकारणात सक्रिय…

ओबीसींचा आवाज असलेले पंकजा मुंडे असो किंवा धनंजय मुंडे असो किंवा छगन भुजबळ हे ओबीसींचे नेते आहेत. आमचे प्रश्न सोडवणाऱ्यांना माणसांना गुन्हेगार कसं म्हणता? त्यांच्या विरोधातले पुरावे कुठे आहेत? आता तुमची माणसं निवडून आणण्यासाठी वाल्मिक कराड चालतात. राष्ट्रवादी पक्ष संघटना वाढवण्यासाठी वाल्मिक कराड चालतात. मग अचानक तुम्हाला धनंजय मुंडे दिसतात? असा सवालही हाके यांनी आरेाप करणाऱ्यांना नेत्यांना केला. देशमुख यांच्या हत्येचे मी अजिबात समर्थन करत नाही. यातील आरेापींना शिक्षा झालीच पाहिजे, पण मला वाटतं की वाल्मिक कराड आणि मुंडे यांना यात अडकवलं जातंय…’ असेही हाके यांनी सांगितले. अशा षडयंत्राविरोधात ओबीसी समाजाने एकजूटीने लढा दिला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. एकूणच विधानसभा निवडणुकीनंतर अज्ञातवासात गेलेले मनोज जरांगे पाटील व लक्ष्मण हाके हे मराठा व ओबीसी आंदोलकांचे नेते आता पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झालेले दिसत आहेत. खरंच समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आता त्यांचा लढा आहे की एकमेकांचे जुने हिशेब चुकते करण्यासाठी ते रस्त्यावर उतरले आहेत? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. की देशमुख हत्याकांडच्या निमित्ताने पुन्हा राजकीय नेते या दोन्ही आंदोलकांना एकमेकांशी झुंजवून आपले इप्सित साध्य करुन घेऊ पाहात आहेत? अशा अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.
वाल्मिक कराडवर गेल्या काही वर्षात १५ ते २० गुन्हे दाखल…

संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे ही तमाम महाराष्ट्राची इच्छा आहे. यात जातीय राजकारण आणू नये असेही सर्वांना वाटते. पण या मारेकऱ्यांशी सातत्याने संपर्कात असणारा मास्टरमाइंट जर वाल्मीक कराड असेल व त्याच्याशी वर्षानुवर्ष निकटचे संबंध असणारे धनंजय मुंडे राज्याचे कॅबिनेट मंत्री किंवा एखाद्या समाजाचे नेते जरी असले तरी त्यांची पाठराखण करण्यासाठी ना सरकारने खटाटोप करण्याची गरज आहे ना एखाद्या नेत्याने त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. खून प्रकरणात कदाचित नसेलही पण दाेन कोटीच्या खंडणीप्रकरणात वाल्मीक कराडचा सहभाग असल्याचे आरोप झाले अाहेत,तसे गुन्हेही दाखल झाले आहेत. इतकेच नव्हे तर गेल्या काही वर्षात त्याच्यावर अशाच प्रकारे १५ ते २० गंभीर गुन्हेही दाखल आहेत. एखाद्या सत्ताधाऱ्याचा किंवा नेत्याचा आशीर्वाद असल्याशिवाय कराड सारखा माणूस इतके भयंकर अपराध करण्याचे धाडस दाखवणार नाही. त्याला पावलापावलावर धनंजय मुंडेंचे अभय असल्याचेही पुराव्यानिशी समोर येत आहे. अशा वाल्मीक कराडच्या व धनंजय मुंडेंच्या बचावासाठी लक्ष्मण हाके यांच्यासारख्या प्रामाणिक आंदोलकाने पुढे येणे ओबीसी समाजालाही पटणार नाही. कोणताही समाज अपप्रवृत्तींना पाठीशी घालण्याचा आग्रह करत नाही. त्यामुळे कराड व मुंडे या दोघांसाठी आंदोलन करण्यापूर्वी त्यांच्या समाजाची मानसिकता काय आहे, खरंच ओबीसी समाज अशा दुष्टप्रवृत्तीच्या पाठीशी उभा राहण्यास तयार आहे का? एवढाच प्रश्न लक्ष्मण हाकेंनी आधी समाजाला विचारायला हवा एवढी साधी अपेक्षा यानिमित्ताने राज्यातील जनता व्यक्त करत आहे.