हलाल की झटका…राणेंच्या वक्तव्यावरुन युतीतच वादाचा खटका

काँग्रेसमधून भाजपात आलेले नितेश नारायणराव राणे हे सध्या भाजपचा आक्रमक हिंदूत्ववादी चेहरा म्हणून स्वत:चे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पक्षानेही त्यांना यासाठी मोकळीक दिलेली दिसतेय. यासाठीच विधानसभा निवडणुकीपूर्वी नितेश राणे यांच्या नेतृत्वात राज्यात ठिकठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांचे जनजागृती मेळावे काढण्यात आले. त्यात राणेंनी आपल्या स्वभावाप्रमाणे आक्रमक भाषणे केली. आता त्यांनी हिंदू व मुस्लिम खाटिक यांची ओळख पटवण्यासाठी एक अजब उपाय समोर आणला आहे. हिंदु लोकांना मांस विकत घ्यायचे असेल तर त्यांनी हिंदूंच्याच दुकानात जावे, असे फर्मान काढताना राणे यांनी ‘मल्हार’ प्रमाणपत्राची योजना आणली. त्याचे भाजपमधून अजून तरी इतर कुणी समर्थन केलेले नाही. मात्र विरोधक व आता मित्रपक्षही राणेंचा समाचार घेत आहेत. काय आहे ही योजना.. त्यामुळे महाराष्ट्रात नव्या फाळणीचे प्रयोग केले जात आहेत का? जाणून घेऊ या.. मिशन पॉलिटिक्समधून…

अन् राणेंनी केला भाजपात प्रवेश…

नारायणराव राणे हे कट्टर शिवसैनिक होते. पण पक्षांतर्गत काही वादामुळे त्यांनी शिवसेना सोडून अाधी काँग्रसमध्ये प्रवेश केला. पण तिथेही उपऱ्या राणेंना कुणी विचारले नाही, त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली नाही. म्हणून मग राणेंनी काँग्रेस सोडून स्वत:च्या स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली. या काळात त्यांची दोन्ही मुले नीलेश व नितेश राणे ही त्यांच्यासोबत होती. राणेंचा कोकणात, विशेषत: सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात चांगला दरारा आहे. मुंबईतही काही प्रमाणात त्यांचे वजन होते. पण शिवसेनेने मधल्या काळात राणेंना व त्यांचे थोरले पूत्र नीलेश राणे यांना कोकणात अन‌ मुंबईतूनही पराभूत केले तेव्हापासून त्यांचे महत्त्व कमी झाले. आता राजकीय पुनर्वसनासाठी भाजपात गेल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या दोन्ही मुलांसह भाजपात प्रवेश केला. या पक्षाने राणेंना राज्यसभेवर खासदारकी देऊन केंद्रात मंत्रीही केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राणे सिंधुदुर्गमधून खासदार म्हणून निवडून आले, पण मोदी सरकारमध्ये त्यांना पुन्हा मंत्रिपद देण्यात आले नाही. विधानसभेला राणेंचे धाकटे पुत्र नितेश हे भाजपाकडून निवडून आले. थोरले पूत्र नीलेश यांना शिंदेसेनेत जाऊन आमदार व्हावे लागले. सध्याच्या घडीला वडील नारायणराव खासदार तर त्यांची दोन्ही मुले आमदार आहेत.

राणेंचे एकमेव टार्गेट म्हणजे उद्धव ठाकरे..?

नारायणरावांना केंद्रात मंत्रिपद न दिल्याच्या मोबदल्यात मग त्यांचे धाकटे पूत्र नितेश यांना राज्यात कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. शिवसेना सोडल्यापासून राणेंचे एकमेव टार्गेट आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे. राणे पिता पूत्र अतिशय खालच्या पातळीवर जाऊन ठाकरेंवर टीका करत असतात. युती तुटल्यानंतर भाजपला ठाकरेंवर असाच हल्ला करणारा एखादा नेता हवा होता. म्हणून त्यांनी राणेंना जवळ केले. आता नारायणराव कमी पण त्यांचे पूत्र नितेश हे ठाकरेंवर जास्त टीका करताना दिसतात. इतकेच नव्हे तर एक जहाल हिंदुत्ववादी नेता म्हणून आपली प्रतिमा तयार करण्याचे काम नितेश राणे यांच्याकडून सुरु आहे. त्याला भाजप पक्षाकडून पाठिंबा दिला जात आहे. जिथे जिथे हिंदू- मुस्लिम दंगे होतात, तणाव निर्माण होतो तिथे हिंदुत्ववादी भूमिकेचा झेंडा घेऊन नितेश राणे जातात. कट्टर हिंदुत्ववाद्याची भाषणे करतात. शिवाजी महाराजांच्या काळातील दाखले देत असतात. आता तर त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता’ असे सांगून इतिहासाबाबत आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. एवढ्यावरच राणे थांबले नाहीत तर जे इतिहास अभ्यासक महाराजांच्या सैन्यात मुस्लिम होते, असे सांगत आहेत ते खोटी माहिती पसरवत आहेत’ असा आरोपही राणेंनी केला. छत्रपतींचे वंशज व भाजपचेच खासदार असलेल्या उदयनराजे भोसले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणेंचे हे वक्तव्य खोटे असल्याचे इतिहासाचा दाखला देऊन सांगितले. अर्थात राणेंच्या बोलण्याला महाराष्ट्र फार गांभीर्याने घेत नाही, करमणूक म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. त्यांनी कितीही बेंबीच्या देठापासून हिंदुत्वाचा नारा दिला तरी हेच राणे काही काळ धर्मनिरपेक्ष काँग्रेसमध्ये राहून तिथल्या सत्तेचे पाणी चाखून आलेले आहेत हे अजून महाराष्ट्र विसरलेला नाही.

‘मल्हार प्रमाणपत्र’ही नवी भानगड काय?

बरं.. हे सगळं सांगण्याचे कारण म्हणजे आता या राणेंनी हिंदु खाटिक विरुद्ध मुस्लिम खाटिक हा भेद उघड करण्यासाठी ‘मल्हार प्रमाणपत्र’ नावाची अनोखी योजना आणली आहे. आपल्या राज्यात जे लोक मांसाहार करतात त्यांना नेहमीच मांस विक्रीच्या दुकानात जावे लागते. हा व्यवसाय जसा मुस्लिम खाटिक करतात तसेच हिंदू खाटिकही या व्यवसायात आहेत. मात्र हिंदू लोकांनी फक्त हिंदू खाटकांकडूनच खरेदी करावी, असा राणे यांचा आग्रह आहे. संविधानिक मंत्रिपदावर असणारा राणेंसारखा नेता असे भेदभाव करणारे वातावरण करतो तेव्हा त्यांना कदाचित मंत्रिपदाची शपथ घेतानाची समानता आठवण नसेल.. असो..

दोन दिवसांपूर्वी राणे यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट टाकून मल्हार सर्टिफिकेशन योजनेची माहिती दिली आहे. त्यानुसार

१. हिंदू खाटकांना मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम या बेवसाईटवर नोंदणी केल्यास एक प्रमाणपत्र दिले जाईल.
२. त्यात संबंधित दुकानात झटक्याचेच मांस उपलब्ध आहे. मटणात कोणतीही भेसळ नाही. गोमांस किंवा कुत्र्याचे मांस दिले जात नाही, असे नमूद असेल.
३. हे सर्टिफिकेट लावलेले दुकान हिंदु खाटकाचे असल्याचे ग्राहकांना कळेल.
४. यातून मांस खरेदीदार आणि विक्रेता हिंदुच असल्याचे स्पष्ट होईल.
५. अधिकाधिक हिंदू खाटकांनी मल्हार सर्टिफिकेशनचा वापर करावा. जेथे हे सर्टिफिकेट नसेल तेथे मटण खरेदी करू नये. यामुळे हिंदू समाजातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, असाही दावा राणे यांनी केला आहे.

उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राणेंच्या या भूमिकेचा कडक शब्दात समाचार घेतला आहे. आपल्या राज्यात दुसरी फाळणी करण्याचा हा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘जे शाळेतच गेले नाही, त्यांनी इतिहास शिकला नाही. त्यांना केवळ मटणाचे दुकान दिसते. त्यांना पुन्हा एकदा हा देश फाळणीकडे ढकलायचा आहे. हा देश अफगाणिस्तान करायचा की हिंदू पाकिस्तान करायचा? हे मोदींनी ठरवायला हवे’ अशी टीका राऊत यांनी केली.

अजित दादांनी काढली राणेंची खरडपट्टी…

फक्त विरोधकच नव्हे तर आता मित्रपक्ष व भाजप पक्षामधूनही राणेंच्या या भूमिकेवर ताशेरे ओढले जात आहेत. छत्रपतींचे वंशज असलेले भाजपचे खासदार उदयनराजे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी केव्हाच हिंदू – मुस्लिम भेदभाव केला नाही. तो त्यांनी केला असता तर आपण मोगलांच्या गुलामगिरीत असतो. मी नॉनव्हेज खात नाही, पण ज्यांना खायचे आहे त्यांनी ते खावे.’ असा टोला त्यांनी लगावला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणेंची खरडपट्टी काढली, ‘ आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही लोक वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. ती वक्तव्ये सुसंस्कृत महाराष्ट्राला परवडणारी नाहीत. यापूर्वी यशवंतराव चव्हाणांसारख्या अनेक नेत्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करताना जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे. आपल्या वक्तव्यातून कायदा, सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. कोणत्याही विशिष्ट समाजाबद्दल वक्तव्ये टाळली पाहिजेत.

योजनेचे नाव बलणार..?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक विभागप्रमुख मुस्लिम होते, हे खोलवरच्या इतिहास संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळं राणेंनी मुस्लिम बांधवांबद्दल वक्तव्य का केले, ते कळत नाही. चारही बाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर राणे यांचा बचाव करण्यासाठी आता भाजपमधूनही कुणी पुढे येताना दिसत नाही. विशेष म्हणजे राणे यांनी या प्रमाणपत्राला जे मल्हार नाव दिले अाहे ते महाराष्ट्राचे दैवत असलेल्या खंडोबाचे नाव आहे. त्यामुळे जेजुरी येथील देवस्थानने राणेंच्या योजनेला पाठिंबा दिलाय पण श्री मल्हार म्हणजे खंडोबा ही देवता पूर्णपणे शाकाहारी आहे. त्यामुळे योजनेचे नाव बदलावे, अशी मागणी केली आहे. एकूणच, या मल्हार योजनेच्या वादात व छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात एकही मुस्लिम सैनिक नव्हता असे वक्तव्य करुन राणेंनी जो वाद ओढवून घेतला आहे त्यात त्यांची भाजपही पाठराखण करताना दिसत नाही, हे मात्र खरे.