चर्चा पंकजा मुंडेंच्या उपमुख्यमंत्रिपदाची

दरम्यानच्या काळात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून भाजपने पंकजा मंुडे यांना उमेदवारी दिली. आता आपल्या ताई खासदार होणार व थेट केंद्रात मंत्री होणार अशी स्वप्ने ताईंचे समर्थक पाहू लागले. त्यामुळेच ताईंच्या विजयासाठी त्यांनी जीव तोडून मेहनतही केली. पण मराठा आरक्षणाच्या प्रभावामुळे पंकजा ताईंचा अगदी काठावर पराभव झाला. त्यामुळे आता केंद्रातील मंत्रिपद सोडा पंकजाताईंना खासदारकीही संधी मिळाली नाही. दरम्यानच्या काळात लोकसभेत भाजपच्या पदरीही मोठे अपयश आले. त्यामुळे त्यांना पक्षाच्या निष्ठावंतांची किंमत कळाली. राज्यात मराठा समाज भाजपविरोधात जात असताना ओबीसी समाजाला तरी नाराज करु नये, ही जाणीव भाजपच्या नेतृत्वाला झाली. यातूनच लोकसभेच्या पराभवानंतर अवघ्या एकाच महिन्यात भाजपने पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन करुन त्यांना विधान परिषदेवर पाठवले.

पाच वर्षानंतर पुन्हा पंकजाताई आमदार झाल्याचा आनंद बीड जिल्ह्यात मुंडे समर्थकांना दणक्यात साजरा केला. आता त्यांना मंत्रिपद द्यावे, अशी मागणीही होऊ लागली. पण माजलगावमध्ये लागलेल्या एका अभिनंदनाच्या पोस्टरने मात्र संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले. या पोस्टरवर पंकजा मंुडे यांचा भावी उपमुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. खरंच ताईंना मंत्रिमंडळात घेऊन उपमुख्यमंत्री करणार का? अशी चर्चा बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर सुरू झाली. काहींना मात्र हे आवडले नाही. पंकजाताई मुख्यमंत्री होणार.. असा त्यांचा दावा होता. पण या अतिउत्साही समर्थकांच्या दाव्यांवर किंवा पोस्टरबाजीही पंकजाताईंनी मात्र बोलणे टाळले. पंकजाताईंच्या निकटवर्तीयांच्या मते, महाराष्ट्रात विधानसभेला आता फक्त तीन महिने राहिले आहेत. सप्टेंबरमध्ये अाचारसंहिता लागेल व ऑक्टोबरमध्ये मतदान होईल. सध्या राज्यात भाजपविरोधात मराठा समाजाचा रोष आहे. त्यापाठोपाठ ओबीसी समाजही सरकारविरोधात चालला अाहे. ही हक्काची व्होटबँक शाबूत ठेवण्यासाठी भाजपकडे पंकजा मुंडे यांच्याशिवाय दुसरा दिग्गज नेता नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी ज्या मतदारसंघात संघर्ष यात्रा काढली तेथे भाजपचा विजय झाला होता, हे पक्षाला माहित आहे. त्यामुळेच आता शेवटच्या तीन महिन्यांसाठी मंत्रिमंडळ विस्तार करुन पंकजाताईंना कॅबिनेट मंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्री पद दिले जाऊ शकते. या माध्यमातून पंकजांना भाजपने बळ दिल्याचा संदेश ओबीसी समाजात जाईल व त्या प्रचारासाठी संपूर्ण राज्यभर फिरुन भाजपला मतदान मिळवून देऊ शकतील.

मुंडेंच्या समर्थकांचा हा दावा क्षणभर खरा मानला तरी एक प्रश्न उरतो की मग सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काय होईल? या प्रश्नाचे उत्तर देताना काही राजकीय अभ्यासकांना असे वाटते की, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठा रोष आहे. त्याची किमत पक्षाला लोकसभेत मोजावी लागली. त्यामुळे विधानसभेपुरते फडणवीस यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढले जाईल व त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात किंवा भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीत मोठे पद दिले जाईल. मात्र महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची सूत्रे फडणवीसांच्याच हाती राहतील. असे केल्यास फडणवीस यांचा योग्य सन्मानही राखला जाऊ शकतो व पंकजाताईंच्या रुपाने ओबीसी लोकनेत्यालाही मानाचे स्थान दिल्याचा संदेश ओबीसी समाजापर्यंत पोहोचवला जाऊ शकतो.

खरे तर या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत. मात्र राजकारणात कुठलीही गोष्ट दुर्लक्षित करुन चालत नाही. कारण ओबीसी आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी नुकत्याच सुरु केलेल्या यात्रेतील एका सभेत पंकजा मुंडे यांना उपमुख्यमंत्री केले तर भाजपला जुने वैभवाचे दिवस परत येऊ शकतील, असे सुतोवाच करुन तमाम ओबीसी समाजाच्या मनातील भावनाच बोलून दाखवली आहे. या भावनांकडे आता विधानसभेच्या तोंडावर भाजपला दुर्लक्ष करुन चालणार नाही.

असे झाले तर वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अल्पकाळासाठी का होईना पंकजांना उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान होण्याचा मान मिळू शकतो. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना १९९५ मध्ये भाजप- शिवसेनेचे सरकार असताना शिवसेनेचे मुख्यमंत्री अनुक्रमे मनोहर जोशी व नंतर नारायण राणे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याचा मान मिळाला होता. या सरकारमध्ये गृहमंत्रिपदही गोपीनाथरावांकडेच होते. मुंबईतील गँगवॉरचा बंदोबस्त करण्याची धडाकेबाज मोहीम त्या काळात मुंबई पोलिसांनी फत्ते केली होती, त्या बहाद्दर पोलिसांना गोपीनाथरावांचे प्रोत्साहन होते, असेही सांगितले जाते. आज त्या घटनेला ३० वर्षे उलटली तरी उपमुख्यमंत्री म्हणून गोपीनाथरावांच्या साडेचार वर्षे उपमुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीची अजूनही महाराष्ट्राला आठवण आहे. त्यांच्याच कन्या पंकजा मुंडे यांना अल्पकाळासाठी का होईना उपमुख्यमंत्रीपद मिळाले तर त्याही वडिलांच्या नावाला साजेशी कारकिर्द करतील, अशी मुंडे समर्थकांना आशा अाहे. इतकेच नव्हे तर तीन महिन्यांसाठी जर पंकजा यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले तर भविष्यात त्या मुख्यमंत्रिपदाच्याही दावेदार राहतील.

या विधानसभा निवडणुकीत जर भाजप मोठा पक्ष ठरुन महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी- केंद्रीय मंत्री अमित शाह हे पंकजा मंुडे यांचाही मुख्यमंत्रिपदासाठी विचार करु शकतील. कारण उद्या सत्ता आलीच तर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील याची खात्री ना भाजपला आहे ना स्वत: देवेंद्र फडणवीस यांना. कायम रोखठोक विधाने करणाऱ्या पंकजा मंुडे यांनी आमदारकी मिळाल्यानंतर राखलेला संयम पाहता भाजपचे केंद्रीय नेतृत्व नक्कीच त्यांच्याविषयी काहीतरी सकारात्मक विचार करत असेल, अशी शंका राजकीय अभ्यासकांना येते. तर पंकजाताईंना उपमुख्यमंत्रिपद मिळणारच याची खात्रीही यातूनच मुंडे समर्थकांना मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Mission Politics