घाबरायचे कारण नाही, तरी खबरदारी घ्या ; कोरोना व्हेरीयंटबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन
पुणे : कोरोनाच्या नवीन व्हेरीयंटची पूर्वी इतकी तीव्रता नाही, तरीही खबरदारी घेतली पाहीजे. घाबरुन न जाता डाॅक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
पुण्यात पत्रकारांशी बाेलताना पवार यांना काेराेनाच्या नवीन व्हेरीयंटच्या संसर्गाविषयी विचारले असता ते म्हणाले,‘ आमच्या मंत्रिमंडळातील एका सहकार्याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी काेराेनाबाबत जी तीव्रता होती ती आता नाहीये. यात काळजी घेणे, मास्क लावणे, फार जवळ येऊन न बोलणे अशी खबरदारी घेतली पाहिजे. तज्ञ डॉक्टरांच्या मते घाबरून जाऊ नये, मात्र काळजी घेतली पाहिजे.
पाण्याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, ‘गेल्यावर्षीच्या तुलनेत पाण्याचा साठा कमी आहे. राज्यात सगळीकडे अशी परिस्थिती आहे. याबाबत कॅबिनेट मध्ये पाण्याची परिस्थिती सांगितली जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आणि नंतर शेतीला पाणी द्या, अशी सूचना जलसंपदा विभागाला केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सी वोटर्सने केलेल्या सर्व्हेक्षणाबाबत ते म्हणाले की, ‘अशा सर्व्हेक्षणाला काही अर्थ नसताे. पाच राज्यात नुकत्याच निवडणुका झाल्या तेव्हा आपण पाहिले की सर्व्हेक्षण काय होते आणि प्रत्यक्ष निकाल काय लागला. तसेच त्यांनी सर्व्हे केला असेल तर आम्ही तिन्ही पक्ष काळजी घेऊ आणि वातावरण महायुतीच्या बाजूने कसे राहील यासाठी प्रयत्न करू.
वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या 48 जागा लढवणार असल्याबद्दल पवार म्हणाले, ‘अशा गाेष्टी निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत हाेत असतात. महायुतीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत. मात्र समोर कोण पंतप्रधान पदाचे उमेदवार आहे हे देखील माहित नाही. मोदी पाहिजे की समोरची व्यक्ती पाहिजे याची तुलना मतदार करतील.शेवटी आत्ता तरी नरेंद्र मोदी यांच्या शिवाय पंतप्रधान पदाचा योग्य उमेदवार दुसरा कोणी पाहायला मिळत नाही.