गाैतमी पाटील यांच्या कार्यक्रमात शिंदेसेेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांचाच तमाशा

सिल्लोड : नेहमीच बेताल वक्तव्य करुन वाद ओढावून घेणारे शिंदेसेेनेचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) हे आणखी एकदा वादग्रस्त ठरले आहेत. सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त ३ जानेवारी रोजी सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील (gautami patil) यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांना खडसावताना सत्तार यांचा जिभेवरील ताबा सुटला व ते बेताल वक्तव्य करत राहिले. एकूणच गौतमीच्या कार्यक्रमाएेवजी तिथे सत्तारांनी केलेला ‘तमाशा’च जास्त चर्चेत राहिला.
गौतमी पाटील यांचा चाहता वर्ग महाराष्ट्रात वाढला आहे. त्यामुळे जिथेजिथे त्यांचा कार्यक्रम होतो तिथे युवकांची अलोट गर्दी होत असते. टाळ्या- शिट्ट्या वाजवत काही युवक हुल्लडबाजीही करत असतात. सिल्लोडमध्ये ३ जानेवारी रोजी रात्री आयोजित कार्यक्रमातही हेच चित्र होते. आयोजकांनी स्टेजवरुन वारंवार आवाहन करुनही युवक शांत बसत नव्हते. त्यामुळे कार्यक्रमात अडथळा निर्माण होत होता.
हे पाहून कॅबिनेट मंत्री व सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार (abdul sattar) यांचा पार चढला. स्टेवरज जात त्यांनी माईक हातात घेतला व अतिशय खालच्या भाषेत बोलून ते युवकांना शांत करण्याचा प्रयत्न करत होेते. सत्तारांची अर्वाच्य व शिवराळ भाषा एेकून तरुणांना आणखीच चेव चढला, त्यांची हुल्लडबाजी वाढतच गेली. अखेर सत्तार म्हणाले, ‘ गोंधळ घालणाऱ्यांना कुत्र्यासारखे मारा. इथे 1 हजार पोलिस आहेत. 50 हजार लोकांना मारण्यास काय लागते. त्यांना मारा आणि जेलमध्ये टाका’ असे फर्मान त्यांनी पोलिसांना साेडले. ‘पोलिसवाल्यांनो हाणा त्यांना, इतके मारा की त्यांचे हाड तुटले पाहिजे.’ ‘तुमच्या बापाने कधी असा कार्यक्रम पाहिला का? काही बोगस लोक इथे वाद घालण्यासाठी आले आहेत त्यांना झोडा’ असे बजावताना सत्तार (abdul sattar) यांनी उपस्थित प्रेक्षकांच्या आई- वडिलांचाही ‘उद्धार’ केला.

महायुती सरकारची हीच संस्कृती हीच भाषा

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (vijay Wadettiwar) यांनी सत्तार यांच्या या कृतीवर कठोर शब्दात टीका केली. ते म्हणाले, युती सरकारची हीच संस्कृती हीच भाषा… मंत्री अब्दुल सत्तारांचे आभार मानतो की, त्यांनी महायुती सरकारचा खरा चेहरा स्वतः जनतेसमोर आणला. हजारोंच्या गर्दी सामोर पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे तोंडी आदेश देऊन लोकांना फोडून काढायची भाषा वापरतात. हे मंत्री पोलिसांना स्वतःच्या टोळीतील “गुंड” समजतात का?… सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनाच्या नावाखाली कार्यक्रम घेऊन उपस्थितांच्या आई बापांवर अश्लील भाषेत टिपणी करत हजारो माता भगिनींना मान शरमेनं खाली घालायला लावणारे हे कसले मंत्री?, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

२०१० मध्ये कार्यकर्त्याला मारहाण केल्याने गमावले होते मंत्रिपद

अब्दूल सत्तार (abdul sattar) हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे. २०१० मध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी सत्तार यांना मंत्रिपद दिले होते. त्यावेळी छत्रपती संभाजीनगर शहरात आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात सत्तार यांनी एका कार्यकर्त्याला मारहाण केली होती. या घटनेमुळे सत्तार यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.