शरद पवारांची राष्ट्रवादी शिर्डीतून ठरवणार लोकसभेची रणनिती

मुंबई ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिर्डी येथे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ३ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणनिती जाहीर करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील म्हणाले की, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बळकट करण्याकरिता आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याकरिता शिर्डी येथे ३ जानेवारी रोजी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेत्यांसह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील. महाविकास आघाडी राज्यात आगामी निवडणुका एकत्रित लढणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना कशाप्रकारे एकत्रित येऊन काम करावे या संदर्भात देखील या शिबिरात मार्गदर्शन करण्यात येणार आहे तसेच महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी तिन्ही पक्षांनी एकत्रित कशाप्रकारे काम करावे या संदर्भात देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 

महाविकास आघाडीतील जागावाटपा संदर्भात कुठल्याही पक्षाने किती जागा लढवणार यासंदर्भात चर्चा झालेली नाही आहे. येत्या दोन आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये जागा वाटपा संदर्भात चर्चा होणार आहे. महाविकास आघाडीमध्ये आणखी काही पक्ष सहभागी होण्यासाठी इच्छुक आहे यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे.. असेही जयंत पाटील म्हणाले.